माने घराण्याचा संक्षिप्त इतिहास
प्रा. डॉ. सतीश कदम
महाराष्ट्रात जी काही नामांकित लढवय्यी घराणी झाली त्यात माने घराण्याचा समावेश असून राष्ट्रकूटांचे वंशज असणाऱ्या मानेंचे गरुड हे देवक असून माण देशाचे नेतृत्व करणाऱ्या राजाला माने हे नाव मिळाले असावे. सिद्धनाथाच्या वास्तव्याने पावन झालेल्या म्हसवड नगरीतून माने घराण्याच्या पराक्रमाला सुरुवात झाली असून बहमनी कालखंडात पाठकोजी हे माने घराण्याचे मूळ पुरुष असून ते देशमुखी वतनदार होते. त्यांचे पुत्र सिदोजी माने हे इब्राहीम आदिलशाहच्या कालखंडात मोठ्या हुद्यावर पोहोचले. सिध्दनाथाला कुलदैवत मानणाऱ्या सिदोजीसोबत नेहमी देवाच्या पादुका आणि बटवा असायचा. सिदोजीला चिलोजी आणि नरसिंहराव ही दोन मुले तर नरसिंहरावाला सिदोजी, चिमोजी, अग्नोजी, खेत्रोजी आणि रथाजी असे पाचपुत्र असून यातील रथाजीची कारकीर्द फारच गाजली. रतोजीला नागोजी नावाचा मुलगा असून मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीच्यावेळी ते मोगलाकडे गेले, तेव्हा औरंगजेबाने त्यांना राजे हा किताब आणि म्हसवड, दहीगाव, अकलूज, भाळवणी, कासेगाव, ब्रम्हपुरी, सांगोले, आटपाडी, नाझरे, वेळापूऱ, कण्हेर, हिंगणी, गरवाद गावच्या देशमुखीचे वतन दिले.
मात्र संताजीच्या खून प्रकरणामुळे नागोजी माने फारच बदनाम झाले. तरीपण शेवटी छत्रपती राजाराममहाराज जिंजीच्या वेढ्यात असताना नागोजीने स्वराज्यसेवा केल्याने राजांनी त्यांना परंडेवगैरे हवेलीतील 27 महालांची सरदेशमुखी दिली. म्हसवडच्या मानेंची माहिती देणारे 1939 चे भारत इतिहास संशोधन मंडळाचे त्रैमासिक उपलब्ध असून त्यानुसार संताजी घोरपडेंच्या हत्येचा आरोप झाल्यानंतर या घराण्याने छत्रपतीसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याने छत्रपती शाहू, दुसरे शिवाजीच्यावतीने ताराबाई यांनी मानेंना इनामपत्र दिल्याचे दिसून येतात. त्यात 26 डिसेंबर 1702 चे पत्र, 25 मार्च 1704 चे पत्र देताना नागोजी मानेचा उल्लेख जहागीरदार व फौजदार व देशमुख व पाटील अशा सर्वच पदांनी केलेला आहे. त्यात नागोजीशिवाय 1757 ला यशवंतराव मानेचे तर 29 मार्च 1853 चे नरसिंगराव मानेंची पत्र आहे. याशिवाय राधाबाई आणि सकवारबाई मानेची पत्रे 1752 सालची.असून त्यानुसार यांनी प्रत्यक्ष कारभार केल्याचे दिसते. नागोजी वतनासाठी कधी मोगलांना जावून मिळालेतरी शेवटी स्वराज्यासाठी सिंदखेड येथे त्यांना मरण आले. महाराष्ट्र पुरालेखागार कार्यालय, मुंबई याठिकाणी राजेमाने म्हसवड दफ्तर असून यात एकूण 18 रुमाल आहेत.
या घराण्याच्या रहिमतपूर, मांगुर, खानापूर, आंधळी, बाळेखिंडी, भिलवडी, जमखिंडी, बडोदा, मळेगाव, अळसंद, अकलूज, वेळापूऱ इत्यादी शाखा तयार झाल्या. पेशवेकाळात रहिमतपुरच्या मानेची कारकीर्द उठावदार असून तेथील कै. मारूतीराव मानेकडील कागदपत्रानुसार रहिमतपूरच्या मानेचे मुळ नाव टेके असून 1545 च्या कालखंडात मलजीना येथील पाटिलकी होती. त्यामुळे 1545, 1605 ला आदिलशाहकडून मानजीचे वंशज विठोजी, चांगोजी, सूर्याजी, महलोजी, राघोजी यांना कौलनामे दिलेले आहते. मानेंच्यामुळेच रहिमतपूरला घोड्याची मोठी जत्रा भरायची. रहिमतपुरवर अधिक संशोधन करायचे असेलतर मुंबईच्या पुरालेखागार कार्यालयात माने दफ्तर रहिमतपूर नावाने स्वतंत्र एक रुमाल असून त्यात जवळपास 1465 अस्सल कागद उपलब्ध आहेत. ज्यात वतनपत्रे, वंशावळी, मोहिमा, मानपान, मोकासा, जंत्री, कौटुंबिक तंटे यांचा समावेश असून यावर संशोधन झाल्यास मराठ्यांच्या इतिहासाला एक नवीन दिशा मिळू शकेल.
रहिमतपूरचे पाटील विश्वासराव उर्फ आप्पासाहेब मानेची कन्या जमुनाबाईचा विवाह इ.स. 1866 साली बडोद्याचे खंडोजी राव गायकवाड यांच्यासोबत झाला होता. त्यामुळे जमुनाबाईचे बंधु मारूतीराव माने हे बडोद्याच्या गायकवाडांचे सरदार राहिले. रहिमतपूरच्या माने घराण्याच्या आश्रयानेच सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री हिराबाई बडोदेकर पुढे आल्या. मध्ययुगात रूपाजी माने नावाचे एक संतही होऊन गेले. एकंदर माने घराण्यातील अनेक पुरुषांनी आदिलशाही, सातारा, कोल्हापूर, शिंदे, होळकर, पंतप्रतिनिधी, अक्कलकोट, बडोदा इत्यादि ठिकाणी आपली तलवार गाजविली.
शाहू दफ्तरातील सूची क्रमांक 592 नुसार छत्रपती शाहूमहाराजांनी दत्ताजी माने, विठोजी माने, बाळकोजी माने यांना इनाम जमीन दिल्याचे उल्लेख आहेत. विठोजी मानेंनी छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात विशेष कामगिरी केल्याने महाराजांनी त्यांना 1716 साली दोन घोडी बक्षीस दिल्याचे दिसते. यातील विठोजी माने यांचे एका लढाईत निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र दत्ताजीला दानपत्र दिलेले आहे. तर शाहूमहाराजांनी राणोजी माने यांना मराठवाड्यातील आलूर परगण्याची जहागीर दिली. शाहू महाराजांच्याच कालखंडात रहिमतपुरच्या टांकसाळीत पैसे तयार केले जायचे.
मांगूर आणि सांगाव येथील माने घराण्यानेही मोठा पराक्रम दाखविल्याचे आढळून येते. त्यानुसार करवीर संस्थानात रघुनाथराव माने यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्दल छत्रपतीकडून भिमबहाद्दर हा किताब मिळालेला असून निपाणीकर देसायांनी 1808 रोजी करवीर संस्थांनावर चाल केली तेव्हा रघुनाथराव माने यांनी मोठा पराक्रम केला, मात्र यात त्यांना वीरमरण पत्करावे लागले. त्यानंतर यशवंतराव यांच्यासह पुढील पिढ्यांनी भीमबहाद्दर किताब चालूच ठेवल्याने आजही मांगूर गावातील माने भीमबहाद्दर सरकार नावाने ओळखले जातात. माजीमंत्री विजयसिंह मोहितेपाटील यांच्या पत्नी याच घराण्यातून येतात.
पेशवे कालखंडात फत्तेसिंह माने हे गाजलेले व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यानुसार ते राहिमतपूरचे पाटील असून होळकरांककडे सेनापती म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे स्वत:ची 15000 फौज असून याबदल्यात त्यांना कर्नाटकचा 15 लाखाचा वराता ( आगाऊ धनादेश ) होता. दरम्यानच्या काळात होळकर आणि पेशवे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याने होळकरांच्या फौजेने सर्वत्र लुटालूट करण्यास सुरुवात केली. फत्तेसिंह मानेंना फोडल्यानंतर होळकराची ताकद कमी पडेल म्हणून पेशव्याने फत्तेसिंहाला जहागिरीचे आमिष दाखवून आपल्या बाजूला वळविले. त्यामुळे होळकर उत्तरेत गेले आणि पेशव्यांनी शब्द फिरविला. याचा राग मनात धरून फत्तेसिंहाने आपले भाऊबंद जमा करून पंढरपूर परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत सुभानजी माने, पाटलोजी माने, नारायणराव माने, आबा बक्षी, मार्तंड प्रभू इत्यादि सरदार होते. वसंतगड ताब्यात घेऊन फत्तेसिंहाने कराड गावास खणत्या लावून भरपूर पैसे उकळले. हा भाग पटवर्धनाच्या ताब्यात असल्याने त्यांचे कारभारी फडणीस आणि सोबतीला सांगलीकरांची फौज घेऊन त्यांनी पंढरपूरनजीक कासेगाव याठिकाणी 17 जुलै 1803 रोजी फत्तेसिंहाच्या फौजेवर जोरदार आक्रमण केल्याने गोळी लागून फत्तेसिंह माने ठार झाले. तर नारायण माने, पाटलोजी माने, सुभानजी माने यासारख्या मानेंच्या कत्तली झाल्या. त्यानंतर पटवर्धनाच्या फौजेने रहीमतपुरास जाऊन फत्तेसिंहाच्या वाड्याचे बांधकाम थांबविले. सर्व मान्यांची घरेदारे लुटून त्यांच्या बायकपोरांना कैदेत टाकले. यावेळी आणखी एक सुभानराव माने म्हसवडकर पटवर्धंनाच्या बाजूने लढत होते. सांगलीकराच्या फौजेने कडलास ता. सांगोला याठिकाणी सुभानराव यांनाही ठार केले. अशारितीने अलिकडे रहिमतपूरच्या मानेंचा पराक्रम उठून दिसतो. तरीपरंतू म्हसवड, खानापूर, राहिमतपुरसह अनेक गावात पुढेही माने घराण्याकडे पाटिलकीच्या सनदा कायम होत्या. आंदकाजी, नेताजी, सयाजी, आनंदराव, मलकोजी, काळोजी आणि धावजी यासारखे मानेसरदार पानिपतावर शहीद झाले. तर दत्ताजी, विठोजी, महादाजी, उदाजी, तिमाजी, विराजी, भगवानराव, संकरोजी अशा माने सरदारांनी आपले मनगट गाजविल्याचा इतिहास आहे. एकंदर नागोजीचे प्रकरण वगळता मानेंची मान कधी झुकली नाही, हा इतिहास आहे.
. प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मुंबई