Home इतिहासाच्या पाऊलखुणा पत असूनही पदापासून वंचित राहिलेले बाबूजी नाईक बारामतीकर

पत असूनही पदापासून वंचित राहिलेले बाबूजी नाईक बारामतीकर

0
पत असूनही पदापासून वंचित राहिलेले बाबूजी नाईक बारामतीकर

पत असूनही पदापासून वंचित राहिलेले बाबूजी नाईक बारामतीकर

प्रा. डॉ. सतीश कदम

मध्ययुगीन कालखंडापासून लष्करीठाणे राहिलेल्या बारामतीला वेगळी ओळख देणारे बाबूजी नाईक बारामतीकर पेशवे काळातील रोखठोख व्यक्तिमत्व असून त्यांचा इतिहासही तेवढाच रंजक आहे. त्यांचा मूळ पुरुष केसोबा जोशी (नाईक) हे कोकणातील केळशीचे रहिवासी असून सावकारी करत ते थेट काशीपर्यंत जाऊन पोहोचले. त्यांना सदाशिव, कृष्णाजी आणि अंतोबा ही तीन मुले असून पैकी सदाशिवनेही सावकारीत जम बसवत काशीतील दुर्गाघाटावर स्वत:चा टोलेजंग वाडा बांधून वस्ती बसविली ज्याला ‘नाईकजीका मोहल्ला’ म्हणतात. काशी ते दक्षिणेपर्यंत त्यांच्या अनेक पतपेढ्या असल्याने 1707 ला औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराष्ट्रात आले तेव्हा सदाशिव नाईकही त्यांच्यासोबत महाराष्ट्रात आले. आर्थिक सहकार्य केल्याने 1720 साली छत्रपती शाहूंनी त्यांना हवेली, वानवडी परिसरातील काही गावे इनाम दिली.

सदाशिवला गोविंद, महादबा उर्फ बाबूजी आणि आबाजी ही तीन मुले असून यातील बाबूजीने नाईक घराण्याचे नाव अजरामर केले. चतुर राजकारणी आणि सावकार असणार्याी बाबूजीला छत्रपती शाहूनी 1743 साली बारामतीची जहागिरी दिली. त्यात बारामतीचा महाल आणि परिसरातील सांगवी, गुणवाडी, मालेगाव, कटफळ, गोजुबावी व कन्हेरी ही सहा गावे इनाम दिली. त्यावेळी बारामती छोटासा कसबा असून बाबूजीने याठिकाणी कर्हा नदीतीरावर शनिवारवाड्याच्या धर्तीवर गढीवजा टोलेजंग वाडा बांधला. सोबतच त्यांचा हत्तीखाना, घोड्याची पागा, दफ्तरखाना आणि उपाध्ये, शास्त्री, दिवाणजी यांनाही वस्ती करून बसविले. नदीच्या पश्चिम तीरावर श्री सिध्देश्वराचे देखणे मंदिर बांधले. बाबूजीचे भाऊ आबाजीला बाजीरावाची सख्ख्या बहीण भिऊबाई दिलेल्या असून भाऊबीजेला बाजीराव बारामतीत आल्याची नोंद आहे. पेशव्यांची कुठलीही स्वारी बाबूजीच्या पैशाशिवाय पार पडत नव्हती. 1733 ला बाजीरावने उत्तरेत काढलेल्या मोहिमेसाठी पुरविलेला पैसा वेळेवर परत न आल्याने बाबूजी नाईकाने त्यांना फैलावर घेतले होते. 1740 ला बाजीरावाचे निधन झाल्यानंतर दमाजी गायकवाड आणि रघोजी भोसलेंनी बाबूजी नाईकाला पेशवेपद मिळवून देण्यासाठी सातारा दरबारात भरपूर वजन वापरले. शाहूच्या दोन्ही राण्या बाबूजीला अनुकूल असूनही बाबूजीला पेशवे म्हणजे पंतप्रधानपद मिळाले नाही. याउलट पेशवेपदाची संधी मिळालेले बाजीरावपुत्र नानासाहेब पेशवे बाबूजीच्या कायम विरोधात गेले. तर नाईकांनी सातारला ताराबाईंची भेट घेऊन नानासाहेबाची तक्रारतर केलीच शिवाय त्यांच्या विरोधात सेनापतींनाही भडकावल्याने बाबूजी आणि पेशवे यांच्यात नेहमी वितुष्ट राहिले.

ताराबाईंची भेट म्हणजे शाहू विरोधाचा भाग असलातरी नाईक घराण्याने पडत्या काळात मदत केल्याने छत्रपतींनी सालिना सात लाखाच्या महसुलावर बाबूरावांना कर्नाटकची सुभेदारी दिली. त्यामुळे निजाम, सावनूर, कित्तूर, नवलगुंद, शिरहट्टी इत्यादि नबाबासोबतच फ्रेंच, इंग्रजासोबतही त्यांचे संबंध आले. नांनासाहेब पेशव्यांनीमात्र बाबूजीला सुभेदारी काही पचू दिली नाही. चिमाजीआप्पा आणि भाऊसाहेबाला अंगावर घातल्याने तिथला महसूल बुडाला. एवढेच नाहीतर त्यांची जप्ती करून बायकामुलांना अटक करून मंगळवेढ्याच्या किल्ल्यात ठेवले. व्याही परशुराम पटवर्धंनाच्या माध्यमातून कशीबशी त्यांची सुटका झाली. यावेळी कर्जबाजारी झाल्याने बाबूजीने सातारा गाठून शाहूच्या कानावर ही गोष्ट घातली. छत्रपतींनी आश्वासन देऊनही त्यारात्री बाबूजी नाईकाने विष घेतले. मात्र छत्रपतींनी स्वत:च्या हाताने औषध आणि दुधाचा प्याला देऊन त्यांची समजूत काढली. सावकार असलेतरी बुद्धी आणि सैनिकी अंग असल्याने सलग आठ महिने स्वारीवर राहून मराठ्यांच्या अनेक मोहिमेत त्यांनी भाग घेतला. दमाजी गायकवाडसोबत माळव्याच्या स्वारीत त्यांनी भरपूर धनही जमा केले होते. शाहूनंतर छत्रपती रामराजांनीही त्यांना 18 लक्षाची जहागिरी आणि परंडा तर्फेतील 12 गावचा सरंजाम दिला. पाच दहा हजाराची फौज आणि माणसाचा वाढता राबता राहिल्याने त्यांच्यामुळे बारामतीला शहराचे रूप आले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

www.janvicharnews.com

बाबूजी नाईकांना लक्ष्मी उर्फ ताराबाई आणि कमळा उर्फ आबई अशा दोन पत्नीपासून पांडुरंग, कृष्णराव, नीलकंठ अशी तीन मुले असून नीलकंठराव चुलते आबाजीला दत्तक गेले. मुलामध्ये वाटण्या होऊन कृष्णरावकडे बावडे, नीलकंठ मेडदला जहागिरीवर गेले. तर पांडुरंगराव बारामतीतच राहिले. कृष्णरावचे वडील आणि पांडुरंगसोबत कधी पटले नाही. बाबूजीने मुलांच्या सोयरीकही तोलामोलाच्या घरात करत पांडुरंगाला राघोबदादाची कन्या दुर्गाबाई आणि नीलकंठरावला परशुराम पटवर्धंनाची मुलगी केली होती. पुण्याच्या शनिवार आणि शुक्रवार पेठेतही त्यांचे टोलेजंग वाडे होते. भावजय भिऊबाईंच्या स्मरणार्थ पुण्याच्या चित्राव यांच्या जागेवर सिद्धेश्वराचे मंदिर बांधले. पुणे दौर्याात ताराबाईसाहेबांचा मुक्काम त्यांच्या शुक्रवार पेठेतील वाड्यावर राहिल्याने त्यांची पोहोच ध्यानात येते. त्यांचे चुलत बंधु नारायणराव नागपूरकर भोसलेकडे तर पुतण्या केशवराव हे मराठ्यांच्यावतीने हैदरअलीकडे वकील होते.

सोलापूर आणि चंदन वंदनचा किल्लाही त्यांच्या ताब्यात असून कट, कारस्थान आणि मुत्सद्दीपणा त्यांच्या अंगात ठासून भरलेला होता. निजामाने जेव्हा पुण्यावर स्वारी केली तेव्हा निजामाचा सेनापती असलेल्या धनाजीचा नातू रामचंद्र जाधवला फोडून मराठ्याकडे आणले. आपणाला पेशवेपद न मिळाल्याने बाबुराव नेहमीच राघोबादादाच्या पक्षात राहिले. राघोबाने नारायणराव पेशव्यांचा खून केला तेव्हामात्र त्यांनी याचा उघडपणे विरोध करत नाना फडणवीसाच्यासोबत बारभाई मंडळीत सामील होऊन कारभारात मदत केली. बाबूजी नाईक हे मोठे आश्रयदाते असून कवि मोरोपंतांना बारामतीत आणून त्यांना आश्रय दिला. 1777 साली त्यांना सरकारवाडा म्हणून मोठा वाडाही बांधून दिला. पंत ज्यावेळी बारामतीत असत त्यावेळी भलामोठा दरबार भरवीत, त्यावेळी शेकडो लोकांच्या पंक्ति उठत. एवढेच नाहीतर नाईक स्वत:ही गणेश मंदिरात बसून भजनात तल्लीन होत. शिंदे, होळकर, भोसले यांच्यासह पेशवे आणि छत्रपतीसोबतही अतिशय जवळचे संबंध असून बाबूराव नाईक म्हणजे देशापातळीवरचे एक भारदस्त व्यक्तिमत्व होते. इ.स. 1780 मध्ये बाबूजी नाईकांचे निधन झाले. सलग पन्नास वर्षे बारामतीच्या मातीत राहून बाबूजी नाईक यांनी महाराष्ट्रात आपला दबदबातर राखलाच, शिवाय बारामतीला हिंदुस्थानच्या पटलावर आणण्याचे कामही अतिशय निष्ठेने केले.

कर्ता पुरुष गेला की, दुनिया बदलायला वेळ लागत नाही. दुर्दैवाने थोड्याच दिवसात नाईकांचे तीनही पुत्र वारले. तेव्हा त्यांच्या वाड्यावरून नांगर फिरला. पांडुरंगाची मुले काशीला गेली, तर रामकृष्णपंत यांना पंढरपूर नेले. अशावेळी आज पंढरपूर, सातारा, बावडा, पुणे, काशी याठिकाणी नाईकांचे वंशज राहतात. त्यांच्याकडे पैसा, प्रतिष्ठा, नातेसंबंध असे सर्वकाही असूनही केवळ नशिबाने त्यांना पेशवे म्हणजे पंतप्रधान पदाने हुलकावणी दिली. तरीपण त्यांच्यारुपाने बारामतीचे नाव जगाच्या पटलावर पोहोचले. मात्र नियतीने बाबूरावांना काय दिले? आज नाईकांचा वंशजसुद्धा शोधावा लागतो. अर्थात काळ काळच असतो.

प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मुंबई