मराठेशाहीतील तीन फाकडे
प्रा डॉ सतिश कदम
फाकडा हा शब्द वेगळा असलातरी तो मराठा सैनिकासाठी दिला जाणारा एक सन्मान आहे. मध्ययुगीन कालखंडात हंबीरराव, दिनकरराव, हिंमतराव, प्रतापराव, विश्वासराव, सुलतानराव इत्यादी पदव्या असून फाकडा हीसुद्धा पदवीच आहे. त्यानुसार उत्तर मराठेशाहीत असामान्य कामगिरी करणार्या सैनिकाला सन्मानाने फाकडा म्हणायचे. इंग्रजीत याला Gallant म्हणता येईल. संस्कृतमधील फक्किका शब्दावरून आलेल्या फक्कड शब्दाचा फाकडा हा अपभ्रंश आहे. त्यानुसार युद्धात फक्कड म्हणजे चांगली कामगिरी करणार्या शिलेदार किंवा घोडेस्वाराला सन्मानाने फाकडा ही पदवी दिली जायची. फाकडा समारंभप्रसंगी दिली जाणारी पदवी नसून त्याच्या अचाट कर्तुवामुळे लोकांनी दिलेला तो एक बहुमान आहे. त्यानुसार मराठेशाहीत एकूण तीन सेनापतीला हा सन्मान मिळालेला असून त्यात कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे, मानाजी शिंदे व इंग्रज कॅप्टन जेम्स स्टुअर्ड या तिघांचा समावेश होतो.
कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे
www.janvicharnews.com
कोन्हेरराव एकबोटे हे पुरंदरचे रहिवाशी असून नानासाहेब पेशवांच्या कालखंडात अनेक लढाईत महत्वपूर्ण कामगिरी बजावल्यामुळे पेशव्यांनी त्यांना शिलेदाराचे स्वतंत्र पथक दिले होते. मराठ्यातील दुहिचा फायदा घेऊन निजामाने मराठ्यावर स्वारी केली. यात स्वत: निजामासोबत नासिरजंग आणि फ्रेंच सेनापती बुसी हजर होता. निजामाने पुणे परिसरात धुमाकूळ घालत तळेगाव ढमढेरे उद्ध्वस्त केले. यावेळी निजामाला पुण्याकडे जाण्यापासून रोखण्यात मराठ्यांना यश आले त्यात एकबोटे हजर होते. तर मराठा फौजेचा मुक्काम पारनेरनजीक पडला असता 21 नोव्हेंबर 1751 रोजी गृहण असल्यामुळे नानासाहेब पेशवे हे पूजेअर्चेत गुंतल्याचे पाहून निजामाने अचानकपणे मराठ्यावर आक्रमण केले. मराठ्यांची भांडीकुंडी व देवसुद्धा लुटले. तेव्हा मराठ्यांनी प्रतीआक्रमण करून निजामाला पळताभुई थोडी केली. 22 डिसेंबरला निजाम मांडवगणास पोहोचला तेव्हा पुन्हा एकदा मराठ्यांनी आक्रमण करून त्याला पिटाळून लावले. यात एकबोटे यांची कामगिरी मराठ्यांच्या बखरीतील याप्रमाणे आहे. त्यानुसार ‘ या लढाईत कोन्हेर त्रिंबक एकबोटे नामे मराठ्यांचा एक सरदार होता. त्याने असा पराक्रम केला की, त्या दिवसापासून तो ‘फाकडे’ असे नाव पावला. त्याच्या घोड्याच्या पायात रुपयाचे कडे असे. 1756 साली मराठ्यांनी निजामाविरोधात लढलेल्या सावनूरच्या स्वारीत बुसीच्या तोफेचा गोळा लागल्याने कोन्हेर एकबोटे युद्धभूमीतच मरण पावले.
मानाजी शिंदे
www.janvicharnews.com
दुसरा फाकडा मानाजी शिंदे मुळचे महादजी शिंदेच्या घराण्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेडच्या साबाजी शिंदेचे नातू असून मराठ्यांनी जे अटकेपार झेंडा फडकाविला त्यात साबाजीचा समावेश होता. पुढे राणोजी शिंदेच्या घराण्यात महादजी शिंदे पराक्रमी निघल्याने मानाजी काहीसे झाकाळले गेले असलेतरी 1764 -68 च्या दरम्यान ते ग्वाल्हेर संस्थानचे प्रमुख होते. महादजी नाना फडनविसाचा तर मानाजी राघोबाच्या पक्षाचा असल्याने त्यांनी नेहमी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचे दिसून येतात. त्यामुळे राघोबादादाने जेव्हा नारायणराव पेशव्याला मारायचा कट केला त्यात मानाजी सामील झाले नाहीत. तरीपरंतु 15 जुलै 1764 च्या एका पत्रांनुसार राघोबाने शिंदेच्या फौजेची सरदारकी काहीकाळ मानाजीला दिली होती. मानाजी हा अतिशय धिप्पाड असून पेशव्याबरोबर इंग्रजही त्याला वचकून असत. 1791 साली इंग्रज अधिकारी चार्लस मॅलेट जेव्हा पेशवे दरबारी आले होते तेव्हा त्यांनी आपल्या डायरीत मानाजीच्या रुपाचे वर्णन करताना म्हणतात, धिप्पाड असणारा मानाजी म्हणजे अमेरिकेतील निग्रोप्रमाणे बलदंड असून भीती हा शब्दच त्याला माहीत नसून तो उलट्या काळजाचा माणूस म्हणून प्रसिद्ध आहे. नारायणराव पेशव्याच्या मृत्यूनंतर जेव्हा बारभाई नावाने नाना फडनविसाच्या नेतृत्वाखाली काही मंडळी एकत्रित झाली. या बारभाईला त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. बाल वयात पेशवा म्हणून गादीवर बसविलेल्या सवाई माधवरावला भेटायला मानाजी येणार म्हटल्यावर नानाने पेशव्याभोवती अतिशय कडक बंदोबस्त लावलेला होता. त्याच्या भीतीने नानासह अनेकांनी काहीदिवस पुणे सोडले होते. यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज येतो. 1777 साली पेशव्यांनी हरिपंत फडकेच्या नेतृखाली हैदरअलीवर स्वारी केली तेव्हा मानाजी काही मराठ्यांना घेऊन थेट हैदरला जाऊन मिळाला होता. तेव्हा अनेक सरदारांना याची झळ पोहोचून हरिपंताने म्हसवडच्या यशवंतराव मानेला नाहक तोफेच्या तोंडी दिल्याने हे बंड शमले, मात्र पुढाकार घेऊनही मानाजीला कोणी हात लावला नाही हे विशेष आहे. घासीराम कोतवाल हा नानाच्या मर्जीतला असून पुण्याची कोतवाली करताना घासीरामने व्यापारी असणार्या 25 -30 तेलंगी ब्राम्हनांना चोर समजून एका बंदिस्त अंधारकोठडीत कोंडले. अन्नपाण्याचा अभाव आणि पुरेशी हवा न मिळाल्याने त्यातील छोट्याशा झरोक्याकडे आल्याने त्यातील केवळ दोन ब्राम्हण वाचले. रस्त्यावरून जाणार्या मानाजीने ही घटना पहिली तेव्हा त्याने त्या दोघांची सुटकातर केलीच शिवाय घासीरामला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षासुद्धा दिली. नेहमी बंडखोरी करणार्या मानाजीला शेवटी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले होते. महादजी शिंदेबरोबर काही मतभेद असलेतरी त्यांचा वारसदार असणार्या दौलतराव शिंदेला गादीवर स्थिर करताना मानाजीचा मुलगा आनंदराव शिंदे याने दौलतरावला त्रास देणार्या सर्जेराव घाडगेच्या भर दरबारात खांडोळ्या केल्या होत्या. एकंदर कुठल्याही प्रसंगात जिवाची पर्वा न करणार्या मानाजीच्या घराण्याला फाकडे हा बहुमान मिळाला. मानाजीतर शिंदेऐवजी मानाजी फाकडा नावानेच ओळखला जातो.
कॅप्टन जेम्स स्टुअर्ड
www.janvicharnews.com
तिसरा फाकडा मात्र एक इंग्रज अधिकारी असून त्याचे पूर्ण नाव कॅप्टन जेम्स स्टुअर्ड असून तो ब्रिटीशांच्या फौजेत अधिकारी म्हणून कार्यरत होता. पेशवेपद मिळावे म्हणून राघोबा थेट इंग्रजांना जाऊन मिळाले. तेव्हा वॉरन हेस्टिंग्जने कलकत्त्याहून फौज मागवून पुण्यावर हल्ला करण्याचा बेत आखला. यावेळी ब्रिटिश फौजेत कर्नल के, हार्टली, इगर्टन यांच्यासह उत्साही असणारा जेम्स स्टुअर्ड हजर होता. राघोबासह ब्रिटिशफौज पुण्याच्या रोखणे निघाली. तर बारभाईतील सर्वजण एकत्र आल्याने महादाजी शिंदेच्या नेतृत्वाखाली नागपूरकर भोसले, तुकोजी होळकर, हरिपंत फडके, बाजीपंत बर्वे, भीमराव पानसे इत्यादि सरदार एकत्र येऊन त्यांनी मुंबईहून येणार्या सैन्याला रोखण्याकरिता तळेगाव ढमढेरे, वडगाव परिसरा तळ ठोकला. इंग्रजांची फौज पनवेल, कर्जत, खंडाळामार्गे पुढे सरकत होती. गनिमी काव्याचा वापर करत मराठ्यांनी इंग्रजांना पुरते बेजार करून सोडले. तेव्हा इंग्रजांचा बिनीचा म्हणजे आखाडीचा सेनापती स्टुअर्डने वेगळ्या वाटेने थेट कार्लागावापर्यंत धडक मारली. पानसेच्या तोफखान्यामुळे इंग्रजांची पंचाईत झाली होती. त्यात कर्नल के मारला गेला तर स्टुअर्डने मराठ्यांचा घाम काढायला सुरुवात केली. कमी सैन्यबळाच्या जोरावर त्यांने मराठ्यासोबत निकराची लढाई सुरू केली. झाडावर चढून परिस्थितीची पाहणी करत असताना मराठ्यांनी त्याला हेरून पानशाने आपल्या तोफेला बत्ती दिली. मराठ्यांच्या तोफगोळ्याने अचूक वेध घेत स्टुअर्डला यमदानास पाठविले. मात्र आठवडाभरातील त्याची चुणूक पाहून मराठा फौजेने त्याला फाकडा म्हणून संबोधले. तेव्हापासून तो इष्ठुर फाकडा या नावाने ओळखला जाऊ लागला. मराठ्यांच्या पत्रव्यवहारात तसा उल्लेख केलेला आढळतो. आज मावळ तहसील कार्यालयाच्या आवारात स्टुअर्डची समाधी असून लोक तिला फक्कडबाबा म्हणतात. अशारितीने पुरंदरचा एकबोटे, ग्वालियरचा मानाजी आणि ब्रिटनचा स्टुअर्ड असे तीन फाकडे मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत.
प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मुंबई