Home इतिहासाच्या पाऊलखुणा छत्रपतींच्या सेवेसाठी स्वतः चे लग्नही विसरलेला मावळा….

छत्रपतींच्या सेवेसाठी स्वतः चे लग्नही विसरलेला मावळा….

0
छत्रपतींच्या सेवेसाठी स्वतः चे लग्नही विसरलेला मावळा….

www.janvicharnews.com

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी करून जीवाला जीव देणारी माणसं निर्माण केली, म्हणूनच त्यांच्या नंतरही स्वराज्याचा गाडा पुढे 150 वर्षे चालत राहिला. स्वराज्याचा मावळा हा जसा हत्तीच्या बळाचा तसा हरणाच्या काळजाचाही होता. या स्वराज्यासाठी कुणी प्राणाची तर कुणी उभ्या आयुष्याची आहुति दिली, म्हणूनच हे स्वराज्य उभे राहिले आणि टिकले. असाच एक दुर्लक्षित मावळा म्हणजे ज्योत्याजी केसरकर… ज्योत्याजी हा संभाजीराजांचा विश्वासू सेवक, अंगरक्षक, मित्र सर्वकाही होता. मोगलांचा सेनापती मुकर्रबखानाने संभाजीराजांना संगमेश्वर याठिकाणी पकडून औरंगजेबाकडे घेऊन जात असताना त्याने राजांना अपमानजनक वागणूक दिली, त्यावेळी मोगलांच्या महाकाय ताकदीचा अंदाज असतानाही ज्योत्याजीने मुकर्रबखानावर हल्ला चढवून राजेंना सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.त्यात त्याला अपेक्षित यश आले नाही. तरीपण तो खचला नाही. राजे मोगलांच्या कैदेत अडकले म्हणून तो हरला नाही, आपली रणनिती घेऊन पुढे वाटचाल करायला लागला.

www.janvicharnews.com

11 मार्च 1689 ला औरंगजेबाने संभाजीराजेंची क्रूरपणे हत्या केली. आणि लगेचच झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा घालून छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी महाराणी येसूबाई, शिवरायांच्या एक पत्नी सकवारबाई आणि युवराज शाहूराजे तसेच शिवरायांच्या एक पत्नी सकवारबाई यांना अटक केली. संभाजीराजेंचे कुटुंब जीवघेण्या संकटात असताना आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावे म्हणून या पठ्ठयाने त्यांच्यासोबत स्वत:लाही अटक करून घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मोरोपंत सबनीस, उद्धव योगदेव राजाज्ञा यासारखी मंडळी होती.

www.janvicharnews.com

शाहूराजेंचे वयतर काय ? सात आठ वर्षाचे. तब्बल अठरा वर्षे छत्रपतींचा हा राजपरिवार मोगलांच्या कैदेत असताना तो त्यांच्या पाठीमागे सावलीसारखा उभा राहिला. याविषयी वा. सी. बेंद्रे म्हणतात, #‘ ज्योताजी केसरकर हे संभाजी महाराज यांजपाशी सेवा करून इतबारी व कर्ते शहाणे होते. शाहू महाराज बाळवय असता त्यांस खेळवणे, शिक्षा लावणे याजकरिता ठेवले होते. ते महाराजाबरोबर गेले होते. बेगमेकडे जाणे, बोलणे करणे व बादशहाकडे जाणे येणे वगैरे इतबारी कामात तेच राहिले’ शाहू महाराजांचे जे काही थोडेफार शिक्षण झाले तेच मुळी ज्योत्याजीमुळे. औरंगजेबासोबत मराठ्यांचा कबिला सारखे इकडून तिकडे फिरायचा, अशावेळी लाखोच्या फौजेत त्यांचे बरेच हाल व्हायचे. एकदातर मोठ्या पावसात खायला काही नव्हते, तेव्हा त्याने तेलात काकडे भिजवून बाल शाहूना भात खाऊ घातला होता. कैदेत असताना शाहू महाराज आणि येसूबाई यांचा पत्र व्यवहार तोच पाहायचा. मोगलांच्या कैदेतच शाहूराजांचे दोन विवाह करून देण्यात त्याने मोठी जबाबदारी पार पाडली होती. याकरिता शिंदे घराण्यातील अंबिकबाई आणि जाधव घराण्यातील सवित्रीबाई अशा दोन नामांकित घराण्यासोबत वैवाहिक संबंध जोडण्याचे काम ज्योत्याजीच्या माध्यमातून करण्यात आले.

www.janvicharnews.com

20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा आजमशहाने मोगलांची गादी हस्तगत केली. तेव्हा त्याने शाहूराजांची सुटका केली, तरीपण येसूबाई यांना कैदेतच ठेवले. बाहेर आल्यानंतर शाहूराजांनी सातारा याठिकाणी मराठ्यांची नवीन राजधानी निर्माण करून राज्यकारभार सुरू केला. यावेळी दक्षिणेत हैद्राबादचा निजाम मीर कमरूद्दीनखान हा मोगलांचा सुभेदार होता.त्यांच्या मध्यस्थीने छत्रपती शाहुंच्यावतीने पेशवा बाळाजी विश्वनाथसोबत ज्योत्याजी केसरकर हा बादशहाला भेटायला दिल्लीला गेला. आणि 3 ऑगस्ट 1707 ला त्याने मराठ्यांना मोगली प्रांतातून चोथाई आणि सरदेशमुखी वसुलीच्या सनदा आणल्या. पुढे येसूबाई आणि छत्रपतींच्या परिवाराची मोगली कैदेतून सुटका करण्यातही त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. एकंदरच कायतर लहानपणापासून शाहूराजांना त्याने हाताच्या फोडाप्रमाणे जपले.

स्वराज्याची गादी सातारा याठिकाणी निर्माण करून शाहुंचा कारभार अतिशय सुरुळीतपणे सुरू झाला, साम्राज्यविस्तारासह मराठ्यांच्या गादीला आता स्थिरता आली होती. शाहूराजे म्हणजे काय तर जाणता माणूस. ज्यांनी ज्यांनी आपणाला मदत केली त्यांना त्यांनी सन्मानाने वागविले, मानाच्या जागा दिल्या, नेमणुका केल्या. त्यात विरुबाई, बसवंतराव कासुरडे, विठोबा खोजे, इन्द्रोजी कदम, शेट्याजी संकपाळ, मायाजी फडतरे, मेगोजी हुकेबारदार आणि ज्योत्याजी केसरकर यांचा समावेश होता.

त्यानुसार ज्योत्याजीला सरदेशमुखीचे वतन देवून 18 कारखान्यावर अधिकारी म्हणून नियुक्ती केली, छत्रपतींच्या स्वारीच्यासोबत पुढे जरीपटका म्हणजे स्वराज्याच्या भगवा झेंडा घेऊन ढालगज हत्तीवर बसण्याचा मान ज्योत्याजीला देण्यात आला, होळीच्यादिवशी सातरमधील सरकारवाड्यापूढे होळीला पोळीचा नेवैद्य दाखवून तिची पूजा ज्योत्याजीने करायची असा संकेत सुरू झाला. ज्योत्याजीने सातारच्या राजधानीत गुरुवार पेठ नावाची नवीन वस्तीही बसविली, सरकारातून पेठेची जकात माफ करून घेतली आणि तिथले कायदे कानून आपल्या जबाबदारीने चालविले.

 

छत्रपती संभाजी राजापासून सुरू झालेली सेवा करत करत छत्रपती शाहू महाराजापर्यंत येऊन ठेपली. हे सर्व करत असताना पाच पन्नास वर्षाचा कालावधी कसा गेला हे कळाले देखील नाही. एवढेच कायतर ज्योत्याजीने राष्ट्रकार्याला वाहून घेतल्यामुळे तो आपले खाजगी जीवन विसरून गेला होता. सगळे काही स्थिरस्थावर झाल्यानंतर असेच एकेदिवस शाहूराजांनी ज्योत्याजीला बोलावून घेऊन विचारणा केली की, की, ‘ ज्योत्याजीबाबा आतातरी लग्न करावे’ तेव्हा या मानी सेवकाने सांगितले ‘ माझे म्हातारपण, ऐंशी वर्षाची उमर, आता लग्न नको’. स्वराज्य हेच माझे जीवन, आणि त्याची स्थिरता हाच माझा संकल्प, तिथं लग्नाची काय कथा. संभाजीराजांची सेवा केली पण त्यांच्या अकाली निधनाने एक पोकळी निर्माण झाली ती आपल्या रूपाने भरून निघाली, बस्स अजून काय हवे ? राजेमात्र आता ऐकायला तयार नव्हते. छत्रपतींचा वंशवेल वाढविण्या कामी आपले संपूर्ण जीवन पणाला लावणाऱ्या व या सेवेकर्यानबाबत छत्रपती शाहूमहाराजही तेवढेच जागरूक होते. त्यामुळे ज्योत्याजीचे आता काही ऐकायचेच नाही हे ठरवून शाहूराजांनी त्यांना लग्न करण्याचा जणू आदेशच दिला. राजेंची आज्ञा म्हणून ज्योत्याजीने वयाच्या ऐंशीव्या वर्षी लग्न केले, पुढे त्यांना मुलेही झाली. परंतु स्वराज्याच्या धगधगत्या कुंडात ज्योत्याजी केसरकरसारख्या निस्वार्थी मावळ्यांनी स्वत:ला झोकून दिले म्हणूनच तो अग्निकुंड सतत तेवत राहिला. अशा या स्वाभिमानी वीरांच्या शौर्यगाथा मराठी दफ्तर रुमाल क्रमांक एकमध्ये छान शब्दात वाचायला मिळतात.

ज्योत्याजींचे मुळ गाव सावंतवाडीजवळचे केसरी, त्यावरून त्यांना केसरकर हे नाव पडले असावे असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. तर पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुनाळ हे गाव त्यांच्या जहागिरीचे गाव राहिले. आज या दोन्ही गावात केसरकर आडनावाचे अनेक लोक राहतात. त्यांच्या पुढील वंशजाकडे गावची पाटीलकी होती. त्यामुळे ते पाटील केसरकर असे आडनाव लावतात. सध्या सरदार मारुती पाटील केसरकर आणि विलास बाबुराव पाटील केसरकर व इतरही बरीच भावकी आपल्या पूर्वजाचा ऐतिहासिक वारसा घेऊन पुढे वाटचाल करत आहे. तर पन्हाळा किल्ल्याजवळील #पुनाळ याठिकाणी# “ज्योत्याजी केसरकर” या निस्वार्थी मावळ्याची समाधी मोठ्या डौलाने उभी आहे. ज्योत्याजीबाबा, धन्य तुमचा त्याग आणि त्या त्यागाला आमुचा मानाचा मुजरा !!

प्रा डॉ सतिश कदम