प्राचीन काळापासून भारत निसर्गपूजक देश असल्याने सूर्य पूजेचे उल्लेख ऋग्वेदात आलेली आहेत. सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर नाग आणि सूर्याच्या अनेक कथा गुंफण्यात आलेल्या आहेत. नाग हा सूर्या प्रमाणेच गायब होतो, सूर्या प्रमाणेच विद्युल्लता नागाच्या ठायी दिसते, सूर्याची दाहकता व नागाचे विष यांची तुलना, सूर्याचे तेज व नागाचा लखलखीतपणा यातील साम्यस्थळे पाहून नाग आणि सूर्य यांचे एकत्रीकरण पौराणिक कथेतून शिल्पकलेत उतरलेले दिसते. त्यासोबतच नागाचा लिंग सदृश्य आकारही त्यास लैंगिक प्रतीक बहाल करते.
www.janvicharnews.com
नाग पूजेची सुरुवात सर्वप्रथम इजिप्तमध्ये झाली असे मत सी. एफ. ओल्डहॅम यांनी आपल्या The sun and the Serpent a contribution to the History of Serpent Worship या ग्रंथात मांडले आहे. तर ग्राफिटन एलीएट स्मिथ यांनी, ‘Geographical Distribution of the Practice of Mummification.’ यात संशोधनपर अभ्यास करताना सूर्य पूजा आणि सर्प पूजा यांचा जन्म ईजिप्तमध्ये झाला असल्याचे सूचित केले आहे. जगात जिथे जिथे या पूजा केल्या जातात. त्या इजिपशीयन प्रभावातून केल्या जातात असेही ते मानतात. परंतु या मताला लायन कॅप यांनी मात्र विरोध दर्शविला आहे. ते Lost continent’s the Atlantis the me in History science and literature या ग्रंथात असे म्हणतात, “संस्कृतीचे एकच एक केंद्र असते व तिथून ती संस्कृती जगात प्रसरण पावते असे समजणे योग्य नाही. वास्तविक संस्कृतीचे विशेष जगात अन्यत्र पसरत असतात. म्हणून इजीप्तच्या लोकांना किंवा अन्य कोणत्याही लोकांना अशी श्रेय देणे योग्य होणार नाही.”
ll भीती मधून नाग पूजा ll
जगभरातील सर्वच प्राथमिक धर्मामध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात होती. मोहोनजोदाडो येथील उत्खननामध्ये सुद्धा नाग मूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते. ऋग्वेदामध्ये नागाचा उल्लेख ‘अहि’ या शब्दाने केला असून तेथे त्याची क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केलेली आहेत. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले तर त्यापासून भय राहणार नाही. या कल्पनेने यजुर्वेदात नाग स्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी. शतपथ ब्राह्मणात नाग माता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे. सर्प वेध या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे. त्यात सर्पाचे विष उतरविण्यासाठी, त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. करकोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे असे मानले जाते. नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबळी , नागबळी इत्यादी विधी गृह्यसूत्र मध्ये सांगितलेले आहेत. अशाप्रकारे नागापासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली आहे.
www.janvicharnews.com
मराठीत नागशीला म्हणून संबोधन केल्या जाणाऱ्या या शिला सारा भारत नागपूजक होता हे सिद्ध करतात. नागाला विषारी दंश असल्याने मानवजातीला त्याची प्रारंभी पासूनच भीती होती. त्याचे हे अस्त्र किती घातक आहे. याची प्रचिती सातत्याने मानवाने घेतलेली असल्याने तो या नागां पासून दूर राहात असे. भीतीतून आकर्षणाचा जन्म झाला. या सर्प योनीची भीती इतकी जबरदस्त होती की, त्यातून तो नागपूजेकडे वळला. नागाचे जमीन आणि पाण्यात ही वास्तव्य, कात टाकून द्विजत्व प्राप्त करून घेणे, त्याच्या द्विजिव्हा, हस्त – पाद – पंख विरहित शरीर, आश्चर्यकारक संभोग, अप्रतिम नागफना, त्याचा फुत्कार, त्याची भेदक नजर या सर्वांमुळे नाग मानवजातीत कुतूहल आणि आदराचा विषय बनला व त्यातूनच वेगवेगळ्या समजुती प्रचलित होऊन नागपूजा अस्तित्वात आली असावी. लोक धर्मात नागांचा उल्लेख अर्धमानव रूप आणि इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करणारा अशी ही तयार झाली. लोकपरंपरेत नाग पूजनाची असलेल्या प्रबळ लोकप्रियते मुळे नाग शिव, बौद्ध आणि जैन तीर्थनकार सारख्या महत्वपूर्ण देवते सोबत संबंध जोडला गेला. ही प्रक्रिया शुंग – कुशान काळापर्यंत पूर्ण झाली होती. सृष्टीच्या संहार कार्याशी संबंधित म्हणूनच शिवाच्या गळ्यात तसेच हातातील भूषणाच्या रूपात नागाला विशिष्ट स्थान प्राप्त झाले. शिवा सोबत असलेला नाग हा काल किंवा मृत्यूचा सूचक म्हणून एक चेतावनीच्या रूपाने पाहता येते. बौद्ध परंपरेत नंद, उपनंद् आणि मुचलिंद या नागांचा उल्लेख येतो. तर जैन परंपरेत सुपार्श्वनाथ आणि पार्श्वनाथ यांचे लांछन नाग आहे. पार्श्वनाथाची यक्ष, यक्षिणी हे सुद्धा नागराज धरणेद्र आणि त्याची राणी पद्मावती यांच्या रूपाने आहेत. मथुरा, भरहुत, सांची आणि अमरावती येथे शुँग, कुषाण, सातवाहनकालीन बौद्ध स्तूपावर नागांचे प्रचुर अंकन मिळते.
www.janvicharnews.com
नाग पूजेचा प्रारंभ नेमका कधी झाला याचा निश्चित पुरावा अद्याप सापडलेला नाही. नाग पूजा निर्मिती पाठीमागे मनोवैज्ञानिक भीती, पौराणिक साहित्यातील उल्लेख तर कुठे जनजातीय संस्कृती आणि तांत्रिक प्रतिकाच्या रूपातून तर कुठे भौगोलिक परिस्थितीच्या कारणाने भारतात नागपूजा अस्तित्वात आली असावी. लोक धर्मात ज्या स्थानीय देव- देवता असतात. त्यात नागाने आपले अस्तित्व नेहमीच टिकून ठेवले आहे. भारतीय तंत्रशास्त्रात नागाचे विशिष्ट महत्त्व असून योगातील ‘कुंडलिनी’ शक्तीचे प्रतीकही नागाला समजले जाते. नाग पूजेचे धागेदोरे शोधत असताना एक बाब निश्चितपणे जाणवते ती ही की, नागाची पूजा हा भारतीयांचा आत्मा असावा. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेकडून पश्चिमे पर्यंत, मैदान असो की उंच पर्वते, लोक परंपरेचे आद्यरूप एक सारखीच दिसून येतात. मानवी हतबलता आणि प्राण्यांमध्ये असलेलं बल यामुळे प्राण्या मधल्या असलेल्या अज्ञात शक्तीला घाबरून त्याची पूजा अर्चना सुरू झाली असावी असे वाटते. नागपूजा कदाचित अतिप्राचीन पूजेमध्ये येत नसावी. तरी नाग पूजेचे पदचिन्ह जगातल्या सर्वच संस्कृतीत आणि कानाकोप-यात पाहायला मिळतात. आणि भारतात तर मूर्ती पूजेच्या स्वरूपात नाग पूजेचे विशेष महत्त्व आहे. भारतीय साहित्यामध्ये तीन प्रकारचे स्वरूप पाहायला मिळतात.
1. देवता गंधर्व अप्सरा हे सात्विक प्रकारात येतात.
2. यक्ष, किन्नर आणि दैत्य हे राजस प्रकारांमध्ये मोडतात
3. राक्षस, नाग, प्रेत हे तामस प्रकारांमध्ये मानले जातात.
भारतीय साहित्यात नाग हा शब्दप्रयोग देवत्व प्राप्त झालेल्या सापांसाठी वापरला असावा असे वाटते. श्रीमद् भगवद् गीतेतील दहाव्या अध्यायात 28 आणि 29 व्या श्लोका मध्ये सर्प आणि नाग असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. काही जण अनेक फणा असलेल्यांना नाग, तर एक फणा असलेला सर्प असे मांनले आहे. महाभारतातील आस्तिक उपाख्याना नुसार हे समानार्थी शब्द असावेत असे वाटते. नाग आणि सर्प यात विषधर आणि विषहीन असाही भेद असावा असे काही जणांचे म्हणणे आहे. नागवंशी हा शब्दप्रयोग त्या राजवंश यांनी केला असावा जे स्वतःचा वंश नाग माता – पित्यापासून निर्मित मानतात. किंवा जे नागपूजेशी संबंधित आहेत त्यांनाही नाग लोक म्हणत असावेत. काहीही असले तरी शेवटी भारतीय राजनेतिक इतिहासात नागांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
www.janvicharnews.com
II नाग पूजा स्वरूप II
भारतात कोब्रा सापाला नाग मानले जाते. पौराणिक कथेनुसार नाग सामान्य सर्प जाती नसली तरी आज व्यवहारिक रूपाने कोब्रालाच नाग मानले जाते. उत्तर भारतात काही ठिकाणी नाग म्हणजे पूर्वज असे मानले जातात. नागाचे रूप घेऊन ते आपल्या घर परिवाराची सुरक्षा करीत असतात. नागपंचमीच्या दिवशी घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात वाटीभर दूध ठेवले जाते. यासोबतच काही भागात पुत्र प्राप्ती नंतर बाळाचे जावळ काढल्यानंतर घरात किंवा घराच्या बाहेर पाच सर्पाकृती काढल्या जातात. दुसऱ्या पुत्र प्राप्ति नंतरच हे प्रतीक मिटवून नवीन प्रतीके निर्माण केली जातात. राजस्थानातील काही भागात ऋषीपंचमीच्या दिवशीच नाग पूजा केली जाते. गढवाल लोक परंपरेनुसार अलकनंदा नदीच्या परिसरात नाग वास्तव्य करतात, असे मानतात. इलाहाबादच्या दारागंज मध्ये वासुकी नागाचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्रतिवर्ष नागपंचमीला येथे यात्रा भरते. बिहारमधील नालंदा परिसरात अनेक नागमूर्ती आढळून आले आहेत. इथेच चतुर्मुखी नागफणा असलेली स्त्री मूर्ती मिळाली आहे. तामिळनाडूमध्ये शेष नागाची पूजा केली जाते. नागपंचमी पश्चात जन्मलेल्या मुला, मुलींची नावे नागराज किंवा नागमणी असे ठेवली जातात. काठीयावड मध्येही मंदिरे आहेत. औरंगाबाद जवळील पैठण ही क्षेत्रही नाग वंशाची संबंधित आहे. ब्राह्मण कन्या गोदावरी नदीत स्नानाला गेल्यावर शेषनाग तिच्या सौंदर्यावर मुग्ध झाला. त्यांच्या प्रेमाचा परिणाम म्हणजे राजा शालिवाहन चा जन्म होय. नाग पूजेच्या संदर्भाने बत्तीस शिराळा या गावी घडलेली घटना महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. नाग पंचमीला शेतात नांगर फिरविल्याने नागाची पिल्ले दगावली. त्यामुळे क्रोधित नागिन संबंधिताच्या घरातील सर्वांनाच दंश केला. सासरी असलेल्या मुलीला ही दंश करण्यासाठी ती गेली असता. ती नाग पूजेत भक्तिभावाने मग्न असलेली दिसून आली. तेव्हा नागीनीने प्रसन्न होऊन सर्वांना जिवंत केले. नागपंचमीला महाराष्ट्रात मुलीला सासरी ठेवत नाहीत. लोकपरंपरेत असे म्हटले जाते की,
आता नागपंचमीच I
नाग आल्याची खेळायला I
मी ग भैय्याला सांगयितु I
बारा सणाला नेऊ नको I
पंचमीला र ठेवू नको I
तर
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
बांधिले ग सख्यांनी झाडाला हिंदोळे ( तारा भवाळकर, लोक संचित ) हे सारे नाग पंचमीचे महत्व अधोरेखित करतात.
ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, गृहसूत्र, रामायण, महाभारत, मैत्रेयी सहिता आणि पुराणात नागांचे अनेक उल्लेख आढळतात. ते ही वेगवेगळ्या समानार्थी शब्दाने. नाग पूजेच्या संदर्भाने भारतीय साहित्यात विविध विधी सांगितलेल्या आहेत. अथर्ववेदात नागाला चारी दिशांचा दिक्पाल म्हटलेले आहे. ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात नागाला लोकपाल रुपात मान्यता दिलेली दिसते. नागराजा तक्षकाने स्वेच्छेने राजा परिक्षितला दंश केला नव्हता. तर ऋषीच्या शापाला पूर्ण करण्यासाठी तो दंश होता. असे नारदाने परीक्षित पुत्र जनमेंजय यास सांगून सर्पसत्र किंवा नागयज्ञ बंद करावयास लावला. त्यावेळी राजा जन्मेजय याने प्रायश्चित करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा नारद मुनी ने सांगितले की, ” सामूहिक रुपाने तुझ्या प्रजेने प्रतिवर्ष नागांची पूजा करावयास हवी. ” असे म्हणतात की तेव्हापासून नागपंचमीला सुरुवात झाली. नाग संबंधी अनेक मिथके आपल्याला पाहावयास मिळतात. पंचतंत्राच्या कथित नागा संबंधी भरपूर लिखाण आढळून येते. नल दमयंती कथेत ही नल राजाने नागाची केलेली प्राण रक्षा आणि त्यातून नागाने केलेले सहकार्य वाचावयास मिळते.
www.janvicharnews.com
ll नाग नगरे ll
भारताचे अतिशय प्राचीन नगर जे वायव्य सीमेवर भारताच्या प्रवेशद्वारावर वसलेले नगर म्हणजे तक्षशिला होय. जगातील विद्या अभ्यासाचं प्राचीनतम केंद्र, भारतीय लोक परंपरेनुसार ही नागराजा तक्षकाची नगरी. उत्तर प्रदेशातील अहिच्छत्र नगरी ही परंपरेने नागांची जोडल्या जाते. तिचे नावच अही म्हणजे नाग. हा तिचा नागाची संबंध सांगणारे आहे. मध्य प्रदेशात गोलियर जवळ हे शहर होते. प्राचीन पद्मावती नगरी ही पुराण प्रसिद्ध नगर. पुराणात येथील नागवंशी राज्यांची विस्तृत वर्णने आहेत. येथील नागसेन नामक राजाचा उल्लेख सम्राट हर्षवर्धन याचा राजकवी बाणभट्ट याने आपल्या हर्षचरित्रात केला आहे. नागद, नागपूर, नागापूर, नागग्राम, नागठाणा, नाग हल्ली, नागुर, नागझरी अशी नाग नामक गावे भारतात सर्व प्रांतात आहेत. हल्लीचे पद्म पवया हे ग्वालियर जवळ आहे. पूर्वी पद्मावती या नावाने प्रसिद्ध होते. येथे वृषनाग, भीम नाग, स्कंद नाग, वसू नाग, व्याग्र नाग आदी राजांची नाणी सापडली आहेत.
ll नाग वंश ll
नाग वंशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा तील ही एक कथा आहे की, कश्यप ऋषी ला कद्रू व वनिता नावाच्या पत्नी होत्या. कद्रूच्या पोटी जी संतान झाली ती नाग या नावाने प्रसिद्ध झाली. अनेक पुराणांमध्ये थोड्याफार फरकाने आली आहे. वासूकी हा नाग राजा होता त्याची राजधानी भोगावती नगरी होती. या वासुकी नंतर देवदत्त पर्यंत अनेक महान नागराजे होऊन गेले. या नागांना विविध पुराणानुसार एक, पाच किंवा सात पासून हजार पर्यंत फणा असल्याचा उल्लेख मिळतो. अनंत हा सहस्त्र फणा असलेला नाग होता. त्यावर विष्णू झोपलेला आहे असे मानतात. विष्णू त्यावर झोपला म्हणजे नागा वर विष्णूने वर्चस्व निर्माण केले असेही मानले जाते. तर नाग शिवाच्या गळ्यात असल्याने नाग लोकांचा आणि शिवाचा अनन्यसाधारण संबंध स्पष्ट होतो. नंदीवर शिव प्रसन्न झाल्यावर नंदीचा सन्मान करण्यासाठी आलेल्या नाग मंडळींची यादी वराहा पूराणात दिली आहे. नागांच्या संबंधाने सर्वात विस्तृत वर्णन माया शिल्प या ग्रंथामध्ये उपलब्ध होते. या ग्रंथात वासुकि, तक्षक, कारकोटक, पद्म, महापद्म, शंखपाल आणि कुलिक या सात प्रमुख नागांच्या लक्षणांचे वेगवेगळे उल्लेख केलेले आहेत. तक्षकाच्या मस्तकावर स्वस्तिक आणि महापद्म याच्या मस्तकावर त्रिशुल असायला हवा. अंशुमदभेदागम मध्ये चतुर्भुज आणि त्रिनेत्र नाग देवतांचे उल्लेख आढळून येतात.
धार्मिक ग्रंथानुसार, कुण्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा करावी. असा उल्लेख आढळून येतो. या अर्थी नाग ही देवता सामाजिक, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही रूढ झाली म्हणावी लागेल. हिंदू धर्म मान्यतेनुसार पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर विराजमान आहे. पौराणिक मान्यतेनुसार असलेल्या प्रमुख नागांचा तपशील पुढील प्रमाणे –
शेष – अनंत या नावानेही शेष नागाचा ओळखले जाते. शेषनागाने गंधमादन पर्वतावर तपस्या केल्यानंतर ब्रह्माजीच्या वरदानाने पृथ्वीचा भार सांभाळण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले. हरिवंश पुराणानुसार ब्रह्मदेवाने वासुकीला नागांचा राजा, तक्षकाला सापांचा राजा आणि शेषाला सर्वच विषदंती प्राण्यांचा राजा बनविला. यावरून शेषनागाचे महत्त्व सिद्ध होते. धार्मिक ग्रंथानुसार लक्ष्मण आणि बलराम शेषनागाचे अवतार रूप आहेत. हाच शेषनाग विष्णू चा सेवक म्हणून क्षीरसागरा मध्ये आहे. विष्णू विश्राम मुद्रेत शेष नागच्या वेटोळ्यावर झोपलेले असतात. श्रीकृष्ण जन्म समयी वासुदेव कृष्णाला यमुना पार करत असताना प्रचंड वर्षा होत होती. त्यावेळी शेषनागाने आपला फणा कृष्णा वर धरून यमुना पार करण्यास मदत केली होती.
वासुकी – हा समस्त नागांचा राजा. वासुकी हा शिवाच्या कंठास लपेटलेला असतो असेही म्हणतात. समुद्रमंथनाच्या वेळी दोरीच्या रूपाने वासुकीचा उपयोग केला गेला होता. शिवाच्या त्रिपुरांतक अवतारात शिवाने एकाच बाणात असुरांची तीन पुरे नष्ट केली होती. त्यावेळी धनुष्यबाणाची प्रत्येंचा वासुकी बनला होता. कथासरित्सागर या ग्रंथानुसार लता देशाचा राजा वासुकीच्या संबंधाने आदर भाव प्रकट करण्यासाठी प्रति वर्ष उत्सव करीत असे.
तक्षक – शृंगी ऋषीच्या शापाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्षक नागाने राजा परीक्षिताला डसले होते. त्यामुळे तक्षकाचा बदला घेण्यासाठी परीक्षित पुत्र जनमेंजयने सर्प यज्ञ केला होता. तेव्हा सर्व साप यज्ञात येऊन पडू लागले. त्यावेळी आस्तिक मुनीने तक्षकाची रक्षा केली. तक्षकच शिवाच्या गळ्यात असलेला नाग आहे असे ही मानले जाते. तक्षकाचा पुत्र अश्वसेन पाताळात राहत असे. खांडव वन अग्निकांड पासून तो अर्जुनाचा विरोधी होता. त्यामुळे कुरुक्षेत्र रणभूमीवर अश्वसेन कौरवांच्या बाजूने सामील झाला होता. अथर्व वेदा नुसार तक्षक हा सर्वाधिक विष असलेला नाग होता असे म्हटले आहे. कौशिक सूत्रानुसार गृहरक्षे साठी तक्षका समोर बळी द्यावा असे म्हटले आहे. असे म्हटले जाते की, तक्षशिला येथे तक्षक संप्रदायाचा प्रभाव होता. मध्यप्रदेशात तक्षकेश्वर या नावाने इंदोर जवळ नवाली गावात एक मंदिर आहे.
करकोटक – यास शिवाचा गण असेही म्हणतात. हरिवंश पुराणात या नागाचा विशेष उल्लेख मिळतो. नल-दमयंती कथेतही करकोटक येतो. आपल्या आईच्या शापातून मुक्त होण्यासाठी महाकाल वनात शिवलिंगाची पूजा केली होती.
कालिया – याचा निवास आपल्या कुटुंबासह यमुना नदी मध्ये होता. त्यामुळे यमुने मध्ये विष पसरले होते. कृष्णाने कालियाला युद्ध करून यमुना सोडण्यास भाग पाडले.
सिंधू संस्कृतीत नागांची असलेली शिक्के, भरहुत सांची आणि अमरावती येथील नागांचे शिल्पांकन यासोबतच पुढे गुप्त काळामध्ये नाग मूर्तीचे तीन प्रकारे शिल्पांकन व्हायला सुरुवात झाली.
1) मानवाकार मूर्ती ( डोक्यावर नागफणा )
2) मानव सर्प विग्रह ( कमरेच्या वर मानव रूप )
3) पूर्ण नाग रूप.
महाराष्ट्रातील काही वंशाची नावे ‘शेष’ अशी आहेत. प्रख्यात शिंदे घराणे हेही नागपूजकच होते. कर्नाटक, महाराष्ट्रात अनेक शिंदे घराणे आहेत. राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय याच्या नेसरी ताम्रपटात त्याचा सामंत नाग हस्ती याचा उल्लेख येतो. कर्नाटक राज्यातील चंद्रवल्ली, बागलकोट, भैरवमट्टी, हरिहर, मात्रहल्ली येथील शिलालेखात नागवंशी राज्यांचे अनेक उल्लेख येतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे ही नागवंशीय शिंदे यांची एक शाखा राज्य करीत होती. पैठणचे सातवाहन हे नाग वंशियच राजे होते. महाराणी नागनिका ही नाग कन्याच.
ll नाग प्रतीके ll
भारतीय कलेने भावना प्रकट करण्यासाठी प्रतीकांना जन्म दिला. जसे नाग कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र असल्याचे पुराणात उल्लेख आहेत. पौराणिक नाग लोकांमधील अनंत, वासुकी, शेष हे नाग मानवा अनुकूल होते. तर तक्षक, कारकोटक, कालिया हे मानव वैरी होते. नाग हा वारूळात राहतो आणि वारूळ हे भू देवतेचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे भूमीच्या सृजन शक्तीशी त्याचा संबंध जोडला गेला. शिव आणि विष्णु या दोघांचाही नागाशी संबंध आहे. नागफणी धारण करणारी कालिकादेवी आहे. त्याचप्रमाणे गणेशाच्या पोटावर ही नागबंध आवळलेला असतो. कंसाच्या कैदेतून बाहेर पडल्यानंतर पावसापासून रक्षण करण्यासाठी वासुकी नागाने कृष्णावर फना छत्र धरलेले होते. बुद्धांच्या जन्मानंतर नंद व उपनंद या नागांनी स्नान घातले होते. तर ज्ञान प्राप्ती नंतर मुचलिंग नागाने त्यांच्यावर आपला संरक्षक असे फनाछत्र धरले होते. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे नाग हेच अभिज्ञान चिन्ह आहे. कामठा किंवा मेघमालि हा पूर्वजन्मीचा पार्श्वनाथाचा भाऊ जो वैरी बनला होता. त्याच्या हल्ल्यापासून यक्ष धरणेद्र हा आपल्या सात फण्याचे छत्र पार्श्वनाथच्या डोक्यावर धरले असल्याचे शिल्प वेरूळ लेणीत आहे.
श्रवणबेलगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रचंड मूर्ती भोवती अनेक वारुळे निर्मिले असून त्यातून नाग बाहेर येत आहेत असे शिल्पात दाखवले आहे. नाग हे योगाचे ही प्रतिक मानले जाते. त्या कारणाने शिवाची योगी राजत्व दाखविण्यासाठी नाग शिवा जवळ सातत्याने दाखविला जातो. अशी ही पौराणिक मान्यता आहे.
ll आयुध रूपातील नाग प्रतीक ll
बहुतांश देवतेसमोर नाग हे चिन्ह आयुध म्हणून दाखवण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात शिवा सोबत सर्प / नाग हे लांछान कायमस्वरूपी जोडले गेलेले आहे. प्रतिमा लाक्षणिक विवरण पाहता विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण, मानसार, मयमत, कामिकागम, अंशुमतभेदागम, देवता मूर्ती प्रकरण, आदी शिल्प शास्त्रीय ग्रंथात शिवाच्या आयुधात कृष्णमृग, खडग, खेटक, वज्र, परशु, त्रिशूल, खट्वांग, डमरू, पाश, हस्ती चर्म, दंड, कपाल, अक्षमाला, धनुष्य, शंख, चक्र, गदा आणि सर्प किंवा नाग सांगितला आहे.
ll नाग आणि लैंगिक काम प्रतीक ll
नाग किंवा साप यांना लैंगिक भावनेचे प्रतीक मानण्यात येते. ज्यावेळी एखादा साप खांबाला वेढा देऊन बसतो तेव्हा तो खांब प्रेरित झालेले लिंग वाटतो. साप हा पुरुषवाचक शब्द म्हणून वापरला जातो. या सरपटणाऱ्या प्राण्यात लिंगाची रचना असल्यामुळे ते वासनेचे प्रतीक आहे. त्यासाठी त्याला वैशेयिक मन, संभोग इच्छा आणि संभोग इच्छा कमी होणे इत्यादीचे प्रतिनिधित्व सरपटणारे प्राणी करतात. ज्या वेळी स्त्री व पुरुष उत्तम परिस्थितीत व तंदुरुस्त शरीराने एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यावेळी त्यांच्या लिंगाची व योनीची स्थिती एखाद्या वळवळणाऱ्या प्राण्या सारखी होते. ग्रीक कथेत एडम व इव्हा यांच्याजवळ साप हे प्रतीक यामुळेच दाखवण्यात येते. प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइड याने सुद्धा नागाला काम प्रतीक मानले आहे. त्यांच्या मतानुसार, आदिम समाजातील स्त्रिया नागाची पूजा काम प्रतिकाच्या रूपानेच करत असत. कदाचित यामुळेच जगभरात आणि विशेषतः भारतामध्ये नागपूजा या स्त्रियाच करतात. नागाची पुत्रप्राप्तीसाठी आराधना करणे किंवा शिवा सारखा श्रेष्ठ पती मिळावा यासाठी शिवपूजन करणे या पाठीमागे ही कामभावना प्रेरित असावी असेही मानले जाते. वांझ स्त्रिया पुत्र प्राप्ती साठी नागशिळेची पूजा करतात. नागाच्या काम रूपा संदर्भाने कश्मीरी लोक कथेनुसार, सुरिनसर किंवा सुनासर ही झील अध्यात्मिक बाबतीत पवित्र मानली जाते. हा संदर्भ महाभारत काळाशी जोडला जातो. वनवासात असतांना पांडव जम्मू येथे गेले होते. ज्यावेळी नागकन्या उलुपी सोबत अर्जुनाचा विवाह झाला होता. तसेच माणिपूर राज्याची राजकन्या चित्रगंधा हिच्यासह ही अर्जुनाने विवाह केला होता. कालांतराने त्यांना बब्रुवाहन नामक वीर पुत्र जन्माला आला. अर्जुनाचे वास्तव्य तिथे अल्पकाळ असल्याने पुत्र जन्माची वार्ता अर्जुना पर्यंत पोहोचली नाही. महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला होता. यज्ञाचा अश्व बब्रुवाहन यांनी रोखून धरला होता. तो सोडविण्याचा प्रयत्न अर्जुनाने केला असता. युद्ध कौशल्यात अर्जुन कमी पडला. त्यामुळे अर्जुनाला मूर्च्छा आली. ही वार्ता चित्रगंधा हिला कळाली असता ती रणभूमीवर आली आणि पुत्र बब्रुवाहन यावर ती क्रोधित झाली. वडिलाला जिवंत करण्यासाठी बब्रुवाहन यांनी वैद्यची मदत घेतली. वैद्यांनी उपचार सांगितला की, पाताळ लोकातून नागमणी (वनौषधी) आणावी लागेल. त्यासाठी बब्रुवाहन याने पाताळ लोकात बाण मारला. त्या बाणाने इच्छित नागमणी आणला. त्या साठी नागकन्या उलुपीने साह्य केले. त्या नागमणीच्या सह्याने अर्जुन जागा झाला. ज्या मार्गाने बाण गेला आणि ज्या मार्गाने बाण परत आला तिथे दोन्ही बाजूने झील तयार झाली असे मानले जाते. तेव्हा पासून नवविवाहिता या झीलची तीन वेळा परीक्रमा करून नाग देवतेचा आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला प्रारंभ करते.
वारूळ हे भूमीचे – भूमीच्या सृजनेंद्रीयचे याचे प्रतीक आहे. नर नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे. त्याची उपासना प्राधान्याने संतान दाता देव म्हणूनही होते. दक्षिणेत अनेक जमातीत वधूने व विवाहित स्त्रियांनी नाग पूजा करण्याची चाल आहे. काही ठिकाणी विवाहित स्त्रिया वारुळाची पूजा करतात. संतान प्राप्तिची अपेक्षा करणाऱ्या स्त्रिया नागाच्या अथवा नाग युगालाच्या मूर्तीची पूजा करतात. नवस फेडण्यासाठी नागमूर्ती तयार करून मंदिराच्या आवारात अथवा झाडांच्या पायथ्याशी प्रतिष्ठित करतात.
www.janvicharnews.com
नागाचे संतान दायी सामर्थ्य भारतीय जनमानसातील अनेक धारणांमधून व्यक्त होत असते. दक्षिणेतील सर्व प्रमुख क्षेत्रपाल देव आपले नागरूपात्व सांभाळून आहेत. ग्रामीण भागातून आजही अशी दृढ समजूत आहे की, एखाद्या गर्भवती स्त्रीने साप पाहिला असता, त्याचे तत्क्षणी डोळे जातात आणि ती स्त्री प्रसूत झाल्यावर तिच्या नान्ही घराचा गंध अनुभवल्यावर तो नाग पुन्हा डोळस होतो. ती गरोदर असताना त्या स्त्रीचा आणि पुरुषाचा संबंध येऊ नये किंवा समागम घडू नये, असा निषेध त्यात अभिप्रेत असावा. सर्व पुरुष नागाचे प्रतिनिधी आहेत आणि नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे. म्हणून वारुळाची पूजा भूमीच्या सृजनेंद्रीयचे प्रतीक म्हणून केली जाते. वारूळास पृथ्वीची योनी म्हणतात. योनी रूपिनी भुदेवी आहे. योनी प्रतीक म्हणून नैसर्गिक वारूळची उपासना अति प्राचीन काळापासून आजपर्यंत दक्षिण भारतात तरी अखंड प्रचलित आहे. वारूळ ही फारच नाजूक असल्यामुळे वारूळ सादृश्य घडीव शीला मूर्तीचे प्रचलन क्वचित कोठे असल्याचा पुरावा उपलब्ध आहे. वारुळाच्या शीला रूप प्रतिकृती नंतर नाभी पर्यंतच्या योनी मूर्ती घडविल्या जाऊ लागल्या. तसेच प्रसवा बरोबरच पोषणाचा ही मातृत्वाशी संबंध असल्यामुळे योनि प्रमाणेच स्थानांना उठाव देणाऱ्या स्कंदा पर्यंतच्या मूर्तीची निर्मिती होत गेली. भू देवीच्या सर्जक आणि पोषक इंद्रियांच्या मूर्तीचा हा वारूळ ते योनी – स्तन – युक्त मूर्ती पर्यंतचा क्रमविकास श्री रा. चि. ढेरे यांनी सिद्ध केला आहे.
II काम शास्त्रीय ग्रंथानुसार नाग II
कल्याणमल्ल, कोक्कोक, दीक्षित श्यामराज, श्री प्रोढदेवराज, मथुरा प्रसाद दीक्षित यांनी नायिकेच्या माणस प्रकृतीचा ही उल्लेख केलेला आहे. देव सत्वा, यक्ष सत्वा, मनुष्य सत्वा, पिशाच्च सत्वा, नाग सत्वा, काक सत्वा, वानर सत्वा आणि खर सत्वा असे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. सत्व या शब्दाचा अर्थ शील असा होतो. अर्थात नायिकेच्या चारित्र्य आणि वागणुकीवरून हे सत्वाचे प्रकार दिलेले आहेत. त्यानुसार जी नेहमी एखादी घटना किंवा काम विसरते, विसराळू स्वभावाची जी नेहमी व्याकुल, घाबरलेली असते, सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेणारी, नेहमी निद्राधीन राहणारी, नेहमी जांभळी देणारी ती नाग सत्वा जाणावी. असे म्हंटले आहे.
वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की,
1) सर्वच प्राचीन मानवी सभ्यतेत नागा विषयी भीतीतून आदरभाव निर्माण झाला.
2) नाग सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर सूर्या सोबत संबंध जोडून कथा निर्मिती केल्या गेल्या.
3) नाग हे अत्यंत जहाल विष बाळगून असल्यामुळे आमचाही वंश नागसम आहे. हे दाखविण्यासाठी कुळवंश प्रतिकाच्या रूपाने नाग हे ‘कुलचिन्ह’ म्हणून ज्या जमातींनी किंवा राज वंशानी स्वीकारले त्यास नागलोक या नावाने ओळखण्यात येते.
4) नागाची शरीर रचना ही पुरुष लिंगाप्रमाणे असल्यामुळे आणि वारूळ स्त्री लिंग अथवा भूमिचे / सृजनाचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले असावे.
5) दक्षिणेतील अनेक क्षेत्रपाल देवता आपले नागरूप प्रकट करताना दिसतात.
6) आशीर्वाद देत असताना हाताची मुद्रा ही पाच फडा असलेल्या शेषनागाची मुद्रा मानली जाते. यज्ञोपवीतातील एका सूत्राचे नाव नाग तंतू असे आहे.
( संदर्भ ग्रंथ कर्त्यांचे आभार, फोटो स्त्रोत :- गुगल )
डॉ. अरविंद सोनटक्के,
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. जि. नांदेड.
©