महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठ
महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन शक्तीपिठ असून त्यात माहुरची रेणुका , कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची श्री तुळजाभवानी ही तीन पूर्ण पीठं आहेत तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धपीठ आहे .देवी भागवतीत या पिठांची शब्दरचना पुढीलप्रमाणे वर्णन केलेली आहे:
कोल्हापूर महास्थानं सब लक्ष्मी सदा स्थिता ।
मातृःपुरी द्वितीयंच रेणुकाधिष्ठितं परम् ।।
तुळजापूर तृतीय स्थात् स्पतशृंगं तयेचच ।
www.janvicharnews.com
नामाभिदानात फरक असला तरी देवीच्या उत्पत्ती मागची संकल्पना सारखीच आहे . भक्ताच्या हाकेला त्वरीत धावून येणारी ती त्वरिता , तुरजा ते तुळजाभवानी अशी तुळजाभवानीच्या नावाचा इतिहास आहे . महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजाभवानीचे महात्म हे अगाध असून भक्ताच्या हाकेला त्वरीत धावून येणारी ती तुळजाभवानी या नावाने तुळजापूरची देवी प्रसिध्द असून कलयुगात अनुभूतीसाठी , त्रेतायुगात श्री रामचंद्रासाठी , द्वापारयुगात धर्म राजासाठी तर कलियुगात राजा शिवछत्रपतीसाठी देवी भक्ताच्या मदतीला धावून आलेली आहे . तुळजापूरचं प्राचीन नाव चिंचपूर असून नावाप्रमाणेच या गावात भरपूर चिंचेची झाडे होती . देवी हा शब्द सर्व समावेशक असला तरी प्रत्यक्ष तुळजाभवानी असे लिहिलेला पहिला उल्लेख शके १३२० मध्ये कोरलेल्या मौजे काटी सावरगावच्या मारुती मंदिरावरील शिलालेखावर सापडतो .
बरीदशाहीतील एक सेवक परसराम गोसावी याने तुळजाभवानीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्याने देवीची मूर्ती दिली आणि मंदिराचा बऱ्याच सुधारणा केल्याचा उल्लेख या शिलालेखात केला आहे . त्यानंतर शके १५१० ला विजापूरच्या आदिलशाहाने तुळजाभवानीच्या मंदिराची व्यवस्था चोखपणे बजावावी असे सर्वांनाच आवाहन केलेले आहे . तर दस्तुरखुद्द औरंगजेब बादशाहा देवीच्या शेजारील गरीबनाथाच्या मठात मुक्कामाला असून त्याने दिलेले दानपत्र उपलब्ध आहे . छत्रपती शिवरायांनी देवीला अर्पण केलेली माळ आजही घातली जाते . तर पानिपतावर जाण्यापूर्वी पेशव्यांनी अर्पण केलेला नगारा आजतागायत वाजतो आहे . छत्रपती शाहु , ताराबाई ,मिर्झाराजा जयसिंह , पहिले बाजीराव , धनाजी जाधव , महाबतखान यांच्याबरोबरच मेडोज टेलर हा इंग्रजही तुळजापूरला आलेला आहे तर १९९४ ला एका जर्मन इतिहासकाराने तुळजाभवानीवर पीएचडी केलेली आहे .
देवी आणि राक्षसातील युध्द म्हणजे सद्गुणांनी दृष्ट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय आहे . त्यानुसार महिष म्हणजे रेडा आणि रेडा म्हणजे सतत फक्त सुख भोगणारा प्राणी , माणसातील या दृष्ट प्रवृत्तीचे निराकरण करायला लावणारा हा उत्सव , म्हणूनच या दिवसात स्वच्छतेच्या महत्त्वाबरोबरच पलंग , पायतान , मैथुन , उपवास , आराध्या , तांबुल , सावळे यासारख्या बाबी सांगितल्या आहेत . प्रत्येकाने ध्यानात ठेवावे की , कुठल्याही धर्मातील चालीरिती या शास्त्राला धरुनच असतात . देवी महात्म्यात नवरात्र आणि घट स्थापनेला महत्व असून नवरात्र म्हणजे देवीचे आसुराशी चाललेल्या युध्दाचा नऊ दिवसांचा कालखंड तर घट म्हणजे देवीच्या शक्तीतून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडळाचे प्रतिक आहे . घटासमोर सतत नऊ दिवस दिवा तेवत ठेवतात . हा दिवा देवीच्या शस्त्रास्त्रातून निर्माण झालेल्या शक्तीचे प्रतिक आहे . तुळजापूरच्या नवरात्र महोत्सवातील फरक म्हणजे घटस्थापनेपूर्वी तुळजाभवानीची मूर्ती पलंगावर झोपवली जाते . अशाप्रकारे सिंहासनावरुन मूर्ती उचलून झोपवण्याचा प्रकार अन्यत्र कुठेही आढळून येत नाही हे वेगवेगळे आहे . परंतु , नवरात्र हा सुध्दा शेतकऱ्यांचा उत्सव असून वर्षा ऋतु संपल्यानंतर खरिपाची पिके काढणीला आलेली असतात . रब्बीची तयारी सुरू करावयाची असते , याच्या दरम्यानचा हा एक ब्रेक आहे . वर्षाऋतूमुळे या दिवसात मोठ्या प्रमाणात डोळ्याचे आणि त्वचेचे आजार होतात . आता शरद ऋतुमुळे भरपूर ऊन पडून ते आजार घालवण्यासाठी हे वातावरण पोषक असते . तर घटागाठी बियाणांची झालेली देवघेव हा कृषिप्रधान राष्ट्रासाठी महत्वाचा धार्मिक विधी आहे . तुळजापुरातील घट स्थापनेच्या वेदिकेकरता लागणारी माती आणि घट आणण्याचे काम कुंभार , धान्य आणण्याचे काम शेटे , माळा आणण्याचे काम महंत चिलोजीबुवा करतात . घटापुढे धर्मग्रंथाचे पठण करणारे ब्राम्हण आहेत . घटस्थापनेनंतर नऊ दिवस देवीच्या महाकाली , महालक्ष्मी आणि महासरस्वती या स्वरुपानुसार तमागुणी , रजोगुणी आणि सत्वगुणी या रुपात पुजा करावी , अन्याय होत असताना हात बांधून भागणार नाही तर थोड्याफार प्रमाणात तमोगुणाची आवश्यकता असते , तर उपजिवीकेकरिता महालक्ष्मी प्रसन्न असावी ही प्रत्येकाची अपेक्षा असते . परंतु , लक्ष्मीच्या प्रसन्नते पापीभरु वृत्ती निर्माण होते . यासाठी महासरस्वतीची उपासना महत्वाची असते . त्यामुळे निसर्गातील सर्व शक्तीवर विजय मिळू शकतो .
घरामध्ये घटाची स्थापना केल्यानंतर पहिली माळ विड्याच्या पानाची असून त्यानंतरच्या माळा या देवीच्या रुपाप्रमाणे लावतात . त्यामुळे पहिल्या माळेनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच्या घटाच्या माळेत रक्तवर्ण पुष्पे असावीत . त्या नंतरच्या तीन दिवसात झेंडू , सोनचाफा , शेवंती , मंजिऱ्या आणि शेवटी सुवासिक फुले याप्रमाणे घटाच्या प्रत्येक गोळीत फुलांचा वापर करावा . पुष्पमालेचा संबंध देवीच्या नऊ दिवसातील रुपाशी घेतला असून देवीची शैलपुत्री , ब्रम्हचारिणी , चंद्रघंटा , कुष्मांठा , स्कंदमाता , कात्यायणि , कालरात्री , महागौरी , आणि सिध्दीदात्री ही नऊ रुपे सांगितली आहेत . त्यानुसार आपल्या तेजाद्वारे आदिमाया आदिशक्ती ही आपल्या नऊ शस्त्रासह सर्वत्र बिहार करत असते . त्यामुळे सप्तपाताळातून पृथ्वीवर येणाऱ्या त्रासदायक लहरीचे समुळ उच्चाटन माळेशी साधर्म्य साधते . अशा रितीने नवरात्र महोत्सवात घटाचे महत्त्व आहे . त्याप्रमाणे स्वच्छतेचेही महत्त्व आहे . पूर्वीच्या कालखंडात येणाऱ्या संसर्गजन्य रोगाचं समूळ उच्चाटन व्हावे यासाठी घटस्थापनेपूर्वी घराची संपूर्ण स्वच्छता कशी असे सांगितले आहे . त्यामुळे हिंदू धर्मातील धार्मिक विधी जाणून घेताना त्यामागचे विज्ञानही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे दिसून येते . आपले घर बांधल्यानंतर त्याचा छानसा फोटो आपण घरामध्ये लावतो . त्याप्रमाणे घट म्हणजे निसर्गरुपी शक्तीमुळे नटलेल्या हिरव्यागार शेतातील पिकांचे प्रतिक आहे आणि शेतकरी जगाचा अन्नदाता आहे म्हणून त्याच्यारुपाने जगाच्या कल्याणासाठी या सिध्दी मंत्राची गरज आहे .
देव्य यथा ततमिदं जगदात्मशक्त्या । निःशेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या ।।
तामम्बिकामश्रिचलदेवमहर्षि पूज्यां ।
भक्त्या नताः स्म विदधातु शुभानि सानः ।।
प्रा . डॉ सतिश कदम अध्यक्ष, महाराष्ट्र इतिहास परिषद