Home इतिहासाच्या पाऊलखुणा कुर्डूवाडी गावाचा इतिहास

कुर्डूवाडी गावाचा इतिहास

0
कुर्डूवाडी गावाचा इतिहास

कुर्डूवाडी गावाचा इतिहास

www.janvicharnews.com

 

मुंबई हैद्राबाद लोहमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्टेशन म्हणजे कुर्डूवाडी जंक्शन, त्यातच नागपूर ते पंढरपूर मार्गही याचठिकाणाहून जातो. आज येथून रात्रंदिवस रेल्वे जात असल्याने कुर्डूवाडी हे गजबजलेले ठिकाण असलेतरी कधीकाळी हा परिसर म्हणजे निर्जन ठिकाण होते. इंग्रजांनी रेल्वे आणली आणि या जागेचे भाग्य उजळले. कुर्डुवाडी हे कुर्डू गावाच्या हद्दीत असल्याने वाढत्या वस्तीला नाव मिळाले कुर्डुवाडी. आज रेल्वेमुळे सर्वांना परिचित असणाऱ्या ” कुर्डूवाडी ” गावाचा इतिहास फार मनोरंजक असून शंभर वर्षाचा इतिहास उलगडून पहिलातर केवळ रेल्वेमुळे निर्माण झालेले गाव म्हणूनसुद्धा आपणाला याच्याकडे पाहता येईल. मुंबई- बेंगलोर, कोल्हापूर- नागपूर अशा मोठ्या महामार्गावरील एक महत्वाचे जंक्शन म्हणून कुर्डूवाडीला महत्वाचे स्थान असलेतरी गावाचा इतिहास शंभर वर्षापलीकडचा नाही. मुळातच या गावाची आणि नावाची निर्मिती ही केवळ रेल्वेमुळे झालेली असल्याने रेल्वेचा इतिहासही मोठा मनोरंजक असल्याचे दिसून येतो.

www.janvicharnews.com

कधीकाळी देवाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारसी लाईट रेल्वेच्या इतिहासावर संशोधन करत असताना अनेक नवीन बाबी पुढे आल्या आहेत. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली. भारतात रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी ‘ ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ नावाने एका रेल्वे कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यानुसार हळूहळू तिचा सर्वत्र प्रसार सुरू झाला.

www.janvicharnews.com

त्यानुसार मुंबईवरून खाली दक्षिणेत जाण्यासाठी रेल्वेचे काम सुरू होवून 6 जुन 1860 ला ही रेल्वे सोलापूर पर्यन्त आली. पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण असा रेल्वेमार्ग प्रस्तावित असलातरी त्यामुळे बाजूलाच असलेले बार्शी आणि त्यालगतचा लातूरवगैरे निजामाचा प्रदेश तसाच बाकी राहणार होता. खासकरून बार्शी ही मोठी बाजारपेठ असल्याने त्यासाठी एका स्वतंत्र रेल्वे स्थानकाची गरज होती.

बार्शी ते पंढरपूर हा रस्ता कुर्डूलगतच्या गोसाव्याच्या वस्तीवरून जायचा. त्यामुळे मुंबई ते सोलापूर दरम्यानच्या रेल्वेला बार्शीकडे जाणार्या् प्रवाशासाठी याच वस्तीवर एक थांबा देवून त्याचे नाव बारसी रोड ठेवण्यात आले. त्यानुसार 23 आक्टोंबर 1859 साली पुणे ते ‘बारसी रोड’ ही रेल्वे सुरू झाली. याच बारसी रोड नावात कुर्डूवाडीचा इतिहास दडलेला आहे. सोलापूरकडे रेल्वे नेताना इंग्रचांचे लक्ष बार्शी या गावावर होतेच. कारण त्याकाळी बार्शी हे मोठे व्यापारी केंद्र असून तेथे कपडा, कडधान्ये आणि ऑइल मिलही होत्या. बार्शीमुळे हा थांबा गजबजू लागला. सुरूवातीला लोक त्याला गोसायाची वस्ती म्हणायचे. रेल्वेच्या कागदोपत्री मात्र याला ‘ बार्शी रोड’ हेच नाव होते.

www.janvicharnews.com

इकडे बार्शीचा व्यापार वाढल्याने बार्शी रोडची गर्दी वाढायला लागली. त्यामुळे एव्हरार्ड काल्थरॉप नावाच्या इंजिनीअरने भारतीय रेल्वेचा राजीनामा देऊन बार्शी रोड ( गोसायाची वस्ती) ते बार्शी हा 34 किमीचा नवीन रेल्वेमार्ग काढण्यासाठी ‘ बार्सी लाईट रेल्वे’ नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन करून 1 मार्च 1897 ला बारशी रोड ते बारशी अशी स्वतंत्र रेल्वे सुरू केली. तिचा विस्तार पुढे लातूरपर्यंत झाला. तर 1927 ला तिकडे मिरजपर्यन्त बार्सी लाइट रेल्वे वाढली. बार्सी लाईट रेल्वे ही एक स्वतंत्र कंपनी असून मुंबई किंवा बेंगलोरकडे सहज जाते यावे म्हणून इंग्रजांनी कंपनीचे मुख्यालय हे बार्सी रोड याठिकाणी ठेवले. मुंबई सोलापूर आणि बार्शी मिरज या रेल्वेमुळे बारसी रोड आता जंक्शन तयार झाले. बार्शीच्या व्यापारामुळे हळूहळू करून या बार्सी रोडला महत्व यायला लागले. थोड्या अंतरावर असणाऱ्या गोसाव्याच्या वस्तीमुळे तेथे हळूहळू वस्तीही वाढायला लागली.

 

पुढे वाढलेल्या गोसायाच्या वस्तीला लोक कुर्डूवाडी म्हणायला लागले, तरीपण इंग्रजांच्या कागदोपत्री याचे नाव बार्सी रोड हेच होते. यावेळी इंग्रजी कागदपत्रात बार्शीचे स्पेलिंग Barsee असे लिहिले जायचे. त्यात बदल करून 1870 साली ते Barsi याप्रमाणे लिहिण्याचे आदेश काढण्यात आले. इंग्रजांनी बार्शी हा शब्द शेवटपर्यन्त बारसी ( Barsi ) असाच लिहिला. तर पुढे बार्सी रोडला वाढलेली गर्दी पाहून रेल्वे विभागाने 23 आक्टोंबर 1914 ला एक परिपत्रक काढून बार्सी लाईट रेल्वे अंतर्गत येणाऱ्या बार्सी रोडचे नामांतर कुर्डूवाडी असे केले. त्यामुळे खर्याकअर्थाने 23 आक्टोंबर हा कुर्डुवाडी गावाचा वाढदिवस आहे. पुढे 1930 ला कुर्डूवाडी येथे बार्सी लाईट रेल्वेचा वर्कशॉप निघाला. तर 1920 ला इंग्रजांनी येथे शाळा सुरू केली. 1922 पासून इंग्रज अधिकार्याअना राहण्यासाठी मोठ्या वसाहती बांधल्या जाऊ लागल्या. तर चिंक हिल ( माकडाची टेकडी ) याठिकाणी रेल्वे पोलिसांचे ट्रेनिंग सेंटर सुरू झाले. अशारितीने कुर्डूवाडीची स्थापना आणि विस्तार ही रेल्वेची देन आहे असे म्हटल्यावर वावगे ठरू नये. यामध्ये काही ठळक बाबी ध्यानात ठेवण्यासारख्या आहेत.

www.janvicharnews.com

1. बार्शी ईट रेल्वे ही स्वतंत्र कंपनी असून तिचा भारतीय रेल्वेशी काहीही संबंध नव्हता. 1897 ला एव्हरार्ड काल्थरॉप नावाच्या इंग्रजाने सुरू केलेली ही कंपनी पुढे 1953 पर्यन्त चालली. मीरज ते लातूर असा 325 किमीवर धावणाऱ्या बार्शी लाईट रेल्वेचे मुख्यालय हे बार्शी रोड म्हणजे आजच्या कुर्डूवाडी ता. माढा, जिल्हा सोलापूर याठिकाणी होते.

2. इंग्रजांच्या कागदोपत्री कुर्डूवाडीचे नाव हे बार्शी रोड असे होते. केवळ रेल्वे जंक्शनमुळेच कुर्डूवाडी गावाची निर्मिती झालेली आहे. 23 आक्टोंबर 1914 ला इंग्रजांनी स्वतंत्र परिपत्रक काढून बार्शी रोडचे नामांतर कुर्डूवाडी केले आहे.

3.बार्शी लाईट रेल्वेसाठी प्रवासाचे दर प्रथम वर्ग – 24 पैसे प्रती मैल, द्वितीय वर्ग – 12 पैसे, तृतीय वर्ग – 8 पैसे आणि चतुर्थ वर्ग- 3 पैशाला प्रती मैल म्हणजे मिरज ते पंढपूरचे तिकीट होते फक्त 1 रुपया 12 पैसे 3 आणे एवढे होते. मालाला 4 पैशाला मन दर होता. तर घोड्याला 24 पैसे तर कुत्र्याला 8 आणे प्रती मैल वाहतुकीचा दर होता. काही बाबतीत इंग्रजांचा असाही फायदा झालेला आहे. इंग्रजांनी रेल्वे आणली नसती तर कदाचित कुर्डुवाडी हे गाव निर्माण झाले नसते.

प्रा डॉ सतिश कदम