-प्रा. डॉ. डी. एन. मोरे, प्रा. डॉ. अशोक भिमराव चिकटे
www.janvicharnews.com
शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास, समाज विकास आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास होत असतो. त्यामुळे शिक्षणाकडे समाज परिवर्तनाचे महत्वाचे माध्यम म्हणून बघितले जाते. त्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण असते. तो अमूर्त ज्ञानाला मूर्त स्वरूप देऊन समाजनिर्मिती करण्याचे काम करत असतो. विद्यार्थ्यांना विद्यादान करणे तर त्याचे आद्यकर्तव्यच असते. त्यासोबतच समाज एका सन्मार्गाच्या वाटेवर चालण्यासाठी त्याची धडपड चालू असते. त्यामुळे शिक्षकाला समाजाचा मार्गदर्शक/वाटाडया असे म्हटले जाते. त्यासाठी शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी केंद्री सुधारणा करणे अपेक्षित असते. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षणव्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. ते केले गेले पाहिजेत यात दुमत नाही. परंतु, शिक्षकाविना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नाही व शिक्षणसुधारणाही होणे नाही. प्रस्तुत लेखात याचा उहापोह केला आहे.
www.janvicharnews.com
प्रचलित शिक्षणव्यवस्थेपुढे अध्यापकांच्या रिक्त जागा, शिक्षकीय पदात होत असलेली कपात, ऑनलाईन शिक्षणाचा बागुलबुवा, शिक्षणावर कमी आर्थिक गुंतवणूक आणि ती प्रत्यक्षात खर्च न होणे, जनसामान्यांना न परवडणारे शिक्षण, शिक्षणाचे झपाट्याने होत असलेले खाजगीकरण व बाजारीकरण, विद्यार्थ्यांची होणारी गळती, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, संशोधन व कल्पकतेला मिळणारे अपुरे वित्तीयसहाय्य, रखडलेल्या शिष्यवृत्त्या, खाजगी व अल्पसंख्याक शिक्षणसंस्थेत नाकारले गेलेले आरक्षण, शिक्षित होऊनही बेरोजगार राहण्याची शक्यता इत्यादी मुलभूत समस्या आहेत. त्यातली त्यात शिक्षक आणि आर्थिक निधी हे दोन घटक शिक्षण सुधारणेतील अतिशय कळीचे आहेत.
www.janvicharnews.com
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये चीनच्या धर्तीवर ‘कोडींग’ची तोंडओळख विद्यार्थ्याना बालपणीच करून देणे, यूरोपच्या आणि विशेषतः जर्मनीच्या धर्तीवर मातृभाषेतून शिक्षण, आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) अभ्यासक्रमाला प्राधान्य, व्यावसायिक शिक्षणाची सांगड परंपरागत शिक्षणासोबत घालणे, कौशल्य केंद्रीत (Skill oriented) अभ्यासक्रमावर भर इत्यादी सुधारणा सुचविल्या आहेत. परंतु, खरा प्रश्न आहे या सुधारणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी लागणारया पात्रताधारक आणि गुणवान शिक्षकांचा. आपल्याकडे ते उपलब्ध नाहीत असे नाही. तर गेल्या एका दशकापासून विद्यापीठ अनुदान आयोग, मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वारंवार निर्देश देऊनही शासनाने रिक्त पदांची भरती केली नाही. परिणामी, नव्याने स्थापन केलेल्या केंद्रीय विद्यापीठात सरासरी ५० टक्के, आयआयटी मध्ये ३५ टक्के आणि राज्य विद्यापीठे व महाविद्यालयात ४० टक्के जागा भरतीविना रिक्त आहेत. तर ६० ते ७० हजाराच्या घरात सेट/नेट, एम.फिल, पी.एचडी पात्रताधारक बेरोजगार आहेत. त्यामुळे सध्या पात्रताधारक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. काहीजण तासिका/कंत्राटी तत्वावर अल्पशा वेतनावर शिक्षक म्हणून तर काहींनी उदरनिर्वाहासाठी चक्क व्यवसाय/उद्योग निवडला आहे. शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष करून शिक्षणक्षेत्रात अपेक्षित सुधारणा होणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण समाजातील सर्व घटकांना मिळणे शक्य आहे काय? अशा प्रकारचा शिक्षक-प्राध्यापकांचा अनुशेष (बॅकलॉग) हा महासत्ता होणाऱ्या देशाला परवडणार आहे का? शिक्षण क्षेत्रातल्या अशा अधोगतीकडे धोरणकर्ते व राज्यकर्ते ज्या साळसूदपणे बघत आहेत तेही तितकेच शोचनीय आहे. एक तर शासनास रिक्त जागा भरायच्या नाहीत आणि भरल्याच तर शिक्षण संस्था बोली लावून (काही अपवाद वगळता) डोनेशन घेतात हे सर्वश्रुत आहे.
www.janvicharnews.com
नव्या शिक्षण धोरणाने ‘मिश्र अध्ययन-अध्यापन’ पद्धतीला प्रोत्साहन देउन शिक्षक कपातीची एक प्रकारे सुवर्णसंधीच शासनाला दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकल्पना पत्रात सुरुवातीला ३० टक्के आणि पुढे ७० टक्यापर्यंत अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविला जावा असे म्हटले आहे. हे ७० टक्के ऑनलाईन व ३० टक्के ऑफलाईनचे धोरण शिक्षक कपात वाढविण्यास अधिकचा हातभार लावणार आहे. अगोदरच शिक्षक भरती करण्यास शासन उदासीन आहे. त्यात ऑनलाईन अध्यापनाच्या या नवीन मॉडेलमुळे तर त्यांना अधिक पाठबळ मिळाले आहे. तसे पाहता ऑनलाईन शिक्षण हे खरेच प्रभावी, परिणामकारक आणि व्यवहार्य आहे काय? कोरोना काळात व्हर्च्युअल क्लास, गुगल क्लासरूम, झूममीट इत्यादीच्या माध्यमातून ऑनलाईन अध्यापन केले गेले. परंतु, त्याचा पुरता फज्जा उडाल्याचे आपण अनुभवले आहे. समोरासमोरील अध्यापनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षक महत्वाची भूमिका निभावत असतो. प्रत्यक्ष शिक्षकाविना ऑनलाईन अध्यापनात एक प्रकारची कृत्रिमता येते. प्रत्यक्ष अध्यापनात शिक्षकांची हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव, बॉडी लँग्वेज इत्यादी मधून विद्यार्थी खूप काही शिकत असतो. ऑनलाईन शिक्षणात तंत्रज्ञानाला दिलेले अधिकचे महत्व आणि शिक्षकाला दुय्यम स्थान खरेच शिक्षणात आमुलाग्र बदल घडवून आणण्यास सहाय्यभूत ठरेल काय?
www.janvicharnews.com
१९९१ नंतर देशाने उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे शिक्षणव्यवस्थेत खाजगी उच्च शिक्षण संस्थाचे पीक अमाप आले. अलीकडच्या काळात तर स्वंयअर्थसहायित महाविद्यालये आणि विद्यापीठे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. ‘या संस्था ‘सेवेपेक्षा नफ्यावर डोळा ठेवून बसल्या आहेत. शिक्षण हे सेवा क्षेत्र आहे; नफा कमाविण्याचे साधन नाही. परंतु, बाजारूपणाच्या वृतीमुळॆ ते सेवा क्षेत्र न राहता उद्योग झाला असल्याची खंत मा. सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात व्यक्त केली आहे. या खाजगीकरणाचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर व एकूणच गुणवत्तेवर झाला. नवीन शिक्षण धोरणात तर खाजगी शिक्षणाला (प्रायव्हेट एज्युकेशन) अधिक राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, सार्वजनिक शिक्षणव्यवस्था मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे. अशा खाजगीकरणाच्या रहाटगाड्यात शिक्षकांचे स्थान काय असेल? खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षकांची परवड काही नवीन नाही. तेथे आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील काय? तेथील शुल्क बहुतेकांच्या विचार-परिघाच्या पलिकडचे असेल. परिणामी, शिक्षणापासून ते वंचित राहण्याचीच दाट शक्यता आहे. त्यातून विद्यार्थी गळती वाढेल. हे भारतीय संविधानातील सर्वाना समान संधीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या तत्वाशी विसंगत ठरेल. शिक्षणाची दारे बंद झाल्याने होणारे दूरगामी परिणाम महात्मा फुलेंच्या पुढील ओवीतून अधोरेखीत होतात.
“विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली
गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले”.
www.janvicharnews.com
शिक्षकाविना शिक्षणसुधारणा होणे जसे दुरापास्त आहे तसे अर्थाशिवाय (पैसा) शिक्षणात बदल घडवून आणणेही दिवास्वप्नच ठरते. नवीन शिक्षण धोरणात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर करण्याची तरतूद केली आहे. प्रश्न आहे ती तरतूद प्रत्यक्ष त्याच घटकावर त्या त्या वर्षी खर्च केली जाण्याचा. कोठारी आयोगाने (१९६६) व राष्ट्रीय शिक्षण धोरण १९८६ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर करण्याची शिफारस केली होती. परंतु, ती आजही प्रत्यक्ष अंमलात आली नाही. शिक्षणावरील खर्च सरासरी ३ ते ३.५ टक्क्याच्या आसपास केला जात आहे. शिक्षण धोरणात अनेक बाबी सुचविल्या आहेत. परंतु, आर्थिक निधीविना त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करणे अशक्य आहे.
बोगस शिक्षक प्राध्यापक भरतीत करोडोची माया जमवणारे चटर्जी-मुखर्जी ईडीच्या विळख्यात…
थोडक्यात, समाज व राष्ट्राच्या उत्कर्षासाठी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थातील अध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याकडे व त्यांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत करण्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. येत्या काळात भारताला ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे, विद्यार्थी, पालक व शिक्षक या तिन्ही शिक्षणाच्या प्रमुख लाभधारकांना धोरणात्मक निर्णयात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. शिक्षणात खरया अर्थाने बदल घडवून आणायचा असेल तर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास प्राधान्य देणे हा रामबाण उपाय ठरेल. त्याशिवाय शिक्षणसुधारणा होणे अवघड आहे.
(डॉ. डी. एन. मोरे हे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राध्यापक तर डॉ. अशोक भिमराव चिकटे हे महाराष्ट्र नॅशनल युनिव्हर्सिटी, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत dnmore2015@gmail. chakrashok1@gmail.com