Home जीवनसार धार्मिक स्त्रिया आणि त्यांचा फुसका फेमिनिझम

धार्मिक स्त्रिया आणि त्यांचा फुसका फेमिनिझम

0
धार्मिक स्त्रिया आणि त्यांचा फुसका फेमिनिझम

 

Lebanese Christians next in line for Islamic State

ज्या वयात मुलींना हिजाब म्हणजे काय माहित नसतं, त्या वयापासून कित्येक ‘आया’ आपल्या मुलींना तो घालायला लावतात, त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स घेऊन देतात. जणू ते आभूषण आहे असं ‘फॅशन स्टेटमेंट’ त्याभोवती निर्माण करतात.. मग त्या मुलीची आपोआपच ती ‘आवड’ बनून जाते..

अगदी लहानपणापासून मुलींना घेऊन “हळदी-कुंकू” वगैरे सारखे धडे गिरवताना कित्येक आया दिसतात.. वर वटसवित्री अन हरतालिका हे तर थोर आहेतच..!!

टेक्नॉलॉजी येऊनही काहीही फरक पडला नाही, उलट त्याच रूढी परंपरांचे फोटो नटूनथटून अपलोड करतात, आणि ‘हौस’ या गोंडस नावाखाली अभिमानानं ही गुलामीची प्रतीकं मिरवतात.. आणि यावर बोललं लिहिलं की स्त्रियाच जास्त डिफेन्ड करायला पुढे येतात..
फार मजेशीर आहे हे..

“घरच्यांना बरं वाटावं म्हणून पाळते मी प्रथा”.. हे सगळ्यात कॉमन तुणतुणं ऐकायला मिळतं…
“छान वाटतं हे केल्यावर, मग जास्त विचार करायचा नसतो ओ” असंही लॉजिक लावलं जातं.. आणि वर, “हे केल्याने तोटा काय आहे मला सांगा!” असेही अकलेचे तारे तोडले जातात..
… मग ह्याच स्त्रिया स्वतःला फेमिनिस्ट समजतात.. कोणी त्यांची अक्कल काढली की धावून येतात.. पण अक्कल गहाण ठेवणाऱ्या प्रथा, अकलेचे दिवाळे काढणाऱ्या परंपरा, आणि त्यांना पाठबळ देणारा धर्म, यावर मात्र चकार शब्द काढत नाहीत!

“ए गप्प बस तुला काय अक्कल आहे!” असं जर कोणी समजा एखाद्या स्त्रीला म्हणाला तर तिला राग येईल.. हेच जर फेमिनिस्ट स्त्रीला म्हणाला तर ती अधिकच चवताळून उठेल.. आणि हे सार्वजनिकरित्या झालं तर सगळीकडून निषेध होतील, स्क्रीनशॉट्स शेअर होतील, कदाचित मोर्चेही निघतील.. पण हेच वाक्य प्रत्येक धर्म पावलोपावली म्हणतोय, युगानुयुगे म्हणतोय, आणि प्रत्येक धर्मग्रंथाच्या पानापानावरून म्हणतोय, पण त्याबाबतीत मात्र कोणी स्त्री चकार शब्द काढणार नाही, किंवा तितकीशी आक्रमक भूमिका घेणार नाही..
हा कसला अर्धवट फेमिनिझम?

4 members of a family converted their religion from hindu to muslim in jaunpur | लखनऊ के बाद अब जौनपुर में धर्म परिवर्तन का मामला, एक ही परिवार के 4 लोग बने

कित्येक मुस्लिम स्त्रिया म्हणतात, आम्हाला नवऱ्याकडून किंवा घरातुन अजिबात बळजबरी नाही.. मलाच आवडतं हिजाब घालणं..
मग मला सांगा, हिजाब घालणं स्त्रियांना स्वतःलाच आवडत असेल, तर एकाही हिंदू मुलीची ही आवड का नसेल बरं?

अन बळजबरी ही काय फक्त नवऱ्याकडून किंवा कुटुंबातूनच होत असते का?.. बळजबरी सांस्कृतिक देखील असते. तो एक अदृश्य सामाजिक दबाव असतो. या अदृश्य दबावामुळेच आपल्याकडे कित्येक मुस्लिम स्त्रिया मंगळसूत्र घालतात.. नाहीतर बाहेरच्या देशांत कोणीही मुस्लिम स्त्री मंगळसूत्र घालत नाही.. असो..

स्त्रीला वाटतं आपण मुक्त आहोत, आपल्या मनानेच आपण निर्णय घेतोय. जर मी ठरवलं, ‘मी हिजाब घालणार नाही, उपवास/रोजे करणार नाही, तर मला कोणाची बळजबरी नसणार आहे’.. पण तूला कळतंय का ताई , तू हिजाब घालतेय, तू त्या गोष्टी करतेय म्हणून चार जण तुझे कौतुक करतात, चांगलं म्हणतात, ती कौतुक करण्याची किंवा किमान दखल घेण्याची ‘सोय’ ह्या सांस्कृतिक दबावाने आधीच करून ठेवलेली असते.

तुला हिजाब मध्ये ‘सेफ’ वाटावं, याची तरतूद तुझ्या मनात निर्माण करायची ताकद देखील हा अदृश्य सांस्कृतिक दबाव बाळगून असतो.. आणि तुला वाटतं, ‘मी माझ्या मनानंच करतेय!’

पतंगालाही असंच वाटत असतं. मी मुक्त आहे, मी आकाशात किती भराऱ्या मारतोय! पण त्याची दोर मात्र या सांस्कृतिक दबावाने पितृसत्तेच्या हाती ठेवलेली असते.. हा सांस्कृतिक/ सामाजिक दबाव झुगारल्याशिवाय, अन ही धार्मिक बंधनं तोडल्याशिवाय पतंगाला खऱ्या अर्थाने मुक्त होता येत नसतं..

प्रत्येक धर्माने (note it, प्रत्येकच धर्माने) स्त्रीला एक वस्तू (object) मानले आहे.. पुरुषांना सुख देणारी आणि पुरुषांसाठीच राबणारी वस्तू.. त्याचं बीज जपणारी आणि वंश पुढं वाढवणारी एक हक्काची वस्तू..

मग *ही ‘वस्तू’ उतू नये, मातु नये म्हणून प्रत्येक धर्मानं तिच्यावर बंधनं घातली..
ह्या बंधनांचाही अभिमान बाळगायला तिला परंपरांनी शिकवलं.. तिच्याकडून व्यवस्थेनं व्यवस्थितपणे करून घेतलेल्या त्यागाचं मग सगळ्यांनीच ग्लोरिफिकेशन केलं..*
संसारासाठी, रितिरिवाजांसाठी, कुळाचारासाठी, स्वतःच्या इच्छा आकांक्षा भावना यांचा त्याग करणारीच खरी स्त्री असते, आणि ‘तेच तिच्या जीवनाचं सार्थक!’ वगैरे नॅरेटिव्ह पद्धतशीरपणे सेट केले.. आणि यालाच घरंदाजपणा म्हटलं जाऊ लागलं.. ‘मॅडम अमुक पदावर आहेत, पण तरीही मुलाबाळांकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही’ या वाक्यातच तिला सौख्य सामावायला लावलं..

काही धर्मानी तर स्त्री ही वस्तू चक्क ‘अमिष’ देण्यासाठी वापरली.. योग्य धर्माचरण करणाऱ्या पुरुषाला 72 हूर ची गॅरंटी देताना स्त्रीला मात्र पतीसेवेतच आपलं सगळं सुख मानायला लावलं.. मग या वस्तूकडे बघून इतर पुरुषांची नजर चाळवू नये म्हणून तिलाच पदर/घुंगट/हिजाब/बुरख्यात झाकून टाकलं.. आणि वर त्याचंही भूषण मानायला तिला शिकवलं..

बुरखा, घुंगट, हिजाब, मंगळसूत्र, हळदीकुंकू असं कशाकशाला डिफेन्ड करणाऱ्या अडाणी तर सोडा, पण बुद्धिवादी स्त्रियाही इथं लाखोंनी आहेत..

वटसावित्री काय, हळदी-कुंकू काय, ‘पती के लंबी उमर के लिये’ व्रत काय.. आणि काय काय… कुठल्याही स्त्रीला विचारा,.. ती हेच् म्हणते – मलाच आवड आहे म्हणून मी करते!!.. आणि या दळभद्री आवडीला ‘संस्कृती’ म्हणतात… ‘स्वत:च्या फायद्यासाठी समाजानं बायकांवर लादलेली बंधनं’ म्हणजे संस्कृती!! अशीच खरी आतली व्याख्या आहे..

बुद्धिमत्ता, माया, धडाडी आणि हिंमत या आणि अशा महत्वाच्या गुणांपेक्षा तिला नवरा असणं किंवा तिचं धार्मिक असणं हेच जास्त महत्त्वाचं, असं सूचित करणाऱ्या आहेत या प्रथा अन ही प्रतीकं..

बरं, या सगळ्या संस्कृत्या फक्त बायकांभोवतीच का फिरतात बरं? पुरुषांनी पाळावयाची असली कुठली ‘संस्कृती’ आहे का?

लग्न झाल्याची खूण म्हणून पुरुष कोणता दागिना घालतो? स्वतःचे सो कॉल्ड ‘पावित्र्य’ जपायला कोणता नकाब हिजाब बुरखा घालतो? बायकोसाठी कोणते व्रत उपवास करतो? बायकोला तीन तलाक किंवा बहुपतीत्व असे कोणते अधिकार तो देतो?

खरंतर, सगळे रीतिरिवाज चुपचापपणे पाळणारी एखादी बकरी शोधणं’, एवढीच पुरुषसत्ताक संस्कृती आहे..!! मग संस्कृतीनेच असं पिढीजात लाभार्थी बनण्याची केलेली सोय सहजासहजी कोण पुरुष नाकारेल? पण स्त्रियाही याला स्वतःच मनापासून ‘फॉर’ असतात..

*नवऱ्यानं शिळी चपाती खायला सांगितली तर ती अजिबात खाणार नाही, पण परंपरा शेण खायला लावते, ते तिला भूषण वाटतं.. आणि वर, ‘मी हौस म्हणून करते, मला कोणाची बळजबरी थोडीच आहे!’.. हे उत्तर!
“अगं ताई, पण तुझ्यावर ही अदृश्य आणि अप्रत्यक्ष सांस्कृतिक बळजबरीच आहे, हे तुझ्या लक्षात येतंय का? आणि हे सगळं पुरुषसत्ताकतेच्या भोवतीच फिरतंय हे तुला कळत नसेल तर तुझा फेमिनिझमच फुसका आहे..

*आणखी किती दिवस तू फेमिनिझमच्या नावाखाली फक्त पुरुषांनाच झोडपत राहणार आहे? पुरुषांना ‘पुरुष’ बनविणाऱ्या, अन तुला अडवू पाहणाऱ्या धार्मिक व्यवस्थेला कधी बोलणार? या पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पोथ्यापुराणांना कधी झोडपणार?

*अगं, इथं ‘फेमिनिझम आणि धार्मिकता’ हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असावेत इतकी योजनाबद्ध परिस्थिती आहे, हे कळतंय का तुला? तुला व्यवस्थेनं एका बैलगाडीला जुंपलंय, त्यात तुझ्या खांद्यावर धर्माचं जोखड आणि नाकात पुरुषसत्ताकतेचं वेसण घातलंय.. यातून तुला मुक्त व्हायचं असेल तर खांद्यावरचं धर्माचं जोखड आणि पुरुषसत्ताकतेचं वेसण हे दोन्ही तुला एकत्रच काढावं लागेल! हे तुला लक्षात येतंय का?

जो अश्रू देतो, त्याच्याच रुमालानं डोळे पुसायची वेळ तू स्वतःवर का आणते?
म्हणजे, ज्या पुरूसत्ताकतेच्या माध्यमातून धर्म तुला अश्रू देतोय, त्यावर उपाय/विरंगुळा म्हणून तू त्याच्याच परंपरागत रितिरिवाजांतुन मनोरंजन (किंवा स्वतःचा अवकाश) शोधत असशील, तर तू ही त्याच अश्रूंच्या लायकीची आहेस, हे नक्की!!”

काहीही म्हणा, धर्म हे गुलामांना त्यांची गुलामी ‘साजरी’ करायला लावण्यातही यशस्वी होतात, आणि हेच त्यांच्या यशाचं गमक असते..

– डॉ सचिन लांडगे.