या देशात पूर्वापार दोन संस्कृत्या चालत आल्या आहेत – एक ब्राह्मणी व दुसरी अब्राह्मणी. सर्वप्रथम अशी सांस्कृतिक मांडणी महात्मा फुलेंनी केली. या मांडणीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही दुजोरा दिला. तर कॉ. शरद् पाटलांनी तिला शास्रीय आधार देऊन ती पक्की केली.
या मांडणीने अनेकांच्या भृकुट्या उंचावल्या. खरंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशी जातवर्गीय विभागणी त्यापूर्वी आणि आजही केली जाते. या जातवर्गीय विभागणीला मात्र कोणाचाही आक्षेप नाही. परंतु ब्राह्मणी-अब्राह्मणी या सांस्कृतिक विभागणीला मात्र अनेकांचा आक्षेप आहे.
या आक्षेपाचं कारण ही विभागणी सांस्कृतिक आहे. संस्कृती हा मोठ्या मानवसमूहाला बांधणारा रेशमी धागा असतो. या विभागणीमुळे ब्राह्मणेतर भारतीय समाज एका सांस्कृतिक धाग्याने बांधला जाऊन, त्यात एकजूट निर्माण होते. (अशी एकजूट जातवर्गीय विभागणीतून निर्माण होत नाही.) या सांस्कृतिक विभाजनामुळे ब्राह्मणांचं उपरेपणही अधोरेखित होते. तसंच ब्राह्मणी म्हणजे विषमतावादी व अब्राह्मणी म्हणजे समतावादी हा अर्थही त्यांना ‘अनर्थकारक’ वाटतो. सांस्कृतिक विभागणी हा असा कळीचा मुद्दा आहे.
ब्राह्मणी छावणीचा आक्षेप ब्राह्मणेतर जातींच्या एकजूटीला आहे. हा समाज जाती-पोटजातीत विभाजित असल्यामुळेच त्यांना त्यांच्यावर वर्चस्व गाजवता आलं. तसंच जातींच्या आधारे पाडलेल्या या फूटीचा त्यांना स्वतःच्या जात्योन्नतीसाठीही मोठा लाभ झाला.
ब्राह्मणी-अब्राह्मणी ऐवजी वेदांच्या आधारे वैदिक-अवैदिक अशीही एक विभागणी केली जाते. वेद मानणारी वैदिक संस्कृती आणि वेद न मानणारी ती अवैदिक संस्कृती. तथापि ही मांडणीही सांस्कृतिक अंगानेच जाणारी असल्यामुळे, तिलाही ब्राह्मणी छावणीचा तितकाच प्रखर विरोध आहे.
ब्राह्मणी छावणी जरी महात्मा फुलेंच्या ब्राह्मणी-अब्राह्मणी या नामकरणावरुन आदळापट करीत असली, तरी हे बारसं वेदातच घातलं गेलं आहे. त्याच्या पुष्टिसाठी कॉ.शरद् पाटलांनी थेट ‘वेदप्रमाण’च प्रस्तुत केल्यामुळे वेद प्रमाण मानणा-यांची गोची झाली. त्यात कॉ. शरद् पाटील हे प्राच्यविद्यापंडित व पाणिनीय संस्कृत व्याकरणाचे प्रकांडपंडित असल्यामुळे प्रतिवादाची सोयही नाही. त्यात शपांनी अब्राह्मण शब्दप्रयोगाचे एक नाही तर अनेक पुरावे सादर केले आहेत. परिणामी ब्राह्मणी छावणीने मौन पत्करणेच पसंत केले. असो!
पहिलं उदाहरण ऐतरेय ब्राह्मणातील आहे. सरस्वती नदीकाठी ऋषींनी यज्ञसत्र आरंभले होते. त्यात सहभागी होऊ इच्छिणा-या कवष ऐलुश या मातृवंशक ऋषीची आर्य ऋत्विज ‘हा दासीचा पुत्र, कितव, अब्राह्मण आमच्यात दीक्षित झाला तरी कसा’ अशी निर्भत्सना करुन त्याला सोमपानाच्या पंगतीतून हाकलून लावतात. कारण मातृवंशक हे त्यांच्या लेखी अनार्य होते.
दुसरं उदाहरण – पतंजलि (२ रे शतक) हे ऋषी १.४.१ या पाणिनीय सूत्रावर भाष्य करताना तत्कालीन भारताची,
१) ‘अब्राह्मणको देश:’ व
२) ‘अ – वृषलको देश:’
अशी वर्गवारी करतात. तर मनुस्मृतीने ही वर्गवारी गृहीत धरुनच बजावले आहे, की ‘शूद्र राज्यांत राहू नये’—‘न शूद्र-राज्ये निवसत्…।४.६१।’
तिसरे उदाहरण म्हणजे कर्णाने अ-ब्राह्मण देशांची केलेली व्याख्या होय. कर्ण म्हणतो, ‘जेथे लोक यज्ञ करीत नाहीत, जे वैदिक धर्मबाह्य असतात, वेदांना जे पारखे असतात, मालमत्तेचे वारस त्यांचे स्वतःचे पुत्र होत नाहीत तर भगिनीपुत्र होतात ते देश अ-ब्राह्मण.’
चौथे उदाहरण दीघनिकायातील अग्गञ्ञसुत्तातील वासेट्ठ – बुद्ध संवादाचे आहे. वासेट्ठ व भारद्वाज हे ब्राह्मणद्वय बुद्धांकडे भिक्खू म्हणून उपसंपदेसाठी येतात तेव्हा बुद्ध त्यांना विचारतात की, तुम्ही भिक्खू होण्याचा जो निर्णय घेतला, त्याचा ब्राह्मणांनी निषेध व टिंगल केली काय? त्याचं ते होकारार्थी उत्तर देतात. तेव्हा बुद्ध विचारतात की, ते कशाप्रकारे निषेध व टिंगल करतात? तेव्हा वासेट्ठ म्हणतो, ‘भगवन! ते म्हणतात केवळ ब्राह्मणच श्रेष्ठ वर्ण आहेत, बाकी वर्ण हीन आहेत. केवळ ब्राह्मणच गौरवर्णीय आहेत, बाकी वर्ण काळे आहेत. आणि केवळ ब्राह्मणच शुद्ध आहेत, अ-ब्राह्मण नाहीत.
याखेरीज शपा म्हणतात, वैराज्योत्तरकाळात झालेले वर्णविरोधी आणि वर्णजातीविरोधी संघर्षही अब्राह्मणी पक्ष व ब्राह्मणी पक्षातच झाले. परिवर्तकांना वा उलथवणा-यांना अब्राह्मणी पक्ष तर परिवर्तन विरोधकांना ब्राह्मणी पक्ष म्हटले जाई.
हा भेद राजांच्या वर्तनातही दिसून येत असे. बौद्ध राजे हे अब्राह्मणी व ब्राह्मणी दोन्ही, साहित्यिक व कलावंतांना आश्रय देत, पण ब्राह्मणी राजे मात्र अब्राह्मणी साहित्यिक व कलावंतांना वगळत.
अब्राह्मणी राजके व ब्राह्मणी राजके यांचे तोंडी गणधर्म (समय—घटना) ही वेगवेगळे होते. कारण अब्राह्मणी राजकांत वैश्य वर्ण नव्हता, ब्राह्मण वर्ण दुय्यम होता व उत्तराधिकार मातृवंशक होता, तर ब्राह्मणी राजकात वैश्य वर्ण होता, ब्राह्मण वर्ण प्रधान होता व उत्तराधिकार पूर्ण पितृवंशक व पुरुषसत्ताक होता.
सत्करी मुकर्जींनी भारतीय दर्शनांचे विभाजनही ब्राह्मणी व अब्राह्मणी असे केले आहे. त्यानुसार न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व वेदान्त या सहा आस्तिक दर्शनांचा समावेश ब्राह्मणी दर्शनांमध्ये, तर लोकायत, जैन व बौद्ध या तीन नास्तिक दर्शनांचा समावेश अब्राह्मणी दर्शनात होतो.
शपा म्हणतात ब्राह्मणी गुरुकुलं आणि बौद्ध महाविहारातील शिक्षणपद्धतीही भिन्न होती. ब्राह्मणी गुरुकुलात फक्त ब्राह्मणी तत्त्वज्ञाने व विज्ञानात आयुर्वेद शिकवला जाई. तर महाविहारात सर्व तत्त्वज्ञाने व विज्ञाने शिकवली जात. यातूनच भारताचे सांस्कृतिक पुनरुत्थान झाले.
अशारितीने शपांनी ब्राह्मणी व अब्राह्मणी संस्कृती प्रवाह समांतरच नव्हे तर एकमेकांच्या विरुद्ध दिशांना वाहणारे समांतर प्रवाह आहेत, यावर प्रखर प्रकाश टाकला आहे.
सुभाषचंद्र सोनार,