राशन,आरक्षण चे स्कैंडल
गरीब लोकांनी भुकेले मरु नये म्हणून स्वस्त किंवा फुकट धान्य सरकार देते.यात वरकरणी दयाभाव,उदारभाव दिसत असला तरी हे एक प्रकारचे नियोजन बद्ध भ्रष्टाचाराचे राखीव कुरण आहे.शेतकऱ्यांकडून लेव्ही दराने धान्य सरकार बळजबरीने घेते.किंवा खजिन्यातून पैसा खर्च करून धान्य घेते.ते धान्य पुरवठा खात्यामार्फत गरीबांना दिले जाते.जेथे एकेकाळी छगन भुजबळ नावाचे माणूस मंत्री होते.पुरवठा मंत्री वरून कळते कि पुरवठा खाते काय काय खाते ,कसे कसे खाते? चेअरमन चोर असेल तर कंपनी डुबणारच.तसाच हा प्रकार.
जे जे स्वस्त किंवा फुकट दिले जाते तेथे भ्रष्टाचार होणारच.कारण फुकटाची कोणाला ही किंमत नसते.ज्याला फुकट मिळते त्याला कष्टाची किंमत नसते.ते मुद्दाम गरीब बनून असतात.फुकट मिळते तर का काम करायचे ?अशी मानसिकता तयार होते.त्यामुळे शेतमजूर किंवा इतर बांधकाम मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.शेती आहे,पीक तयार झाले आहे.पण मजूर कामावर येत नाहीत.म्हणून शेती उत्पन्नाचे शेतातच नुकसान होते.अनेकांनी शेती व साधने असूनही मजूर अभावी शेती करणे सोडून दिले.स्वताची शेती असूनही शेतकरी मजूरीकडे वळले आहेत.कारण शेतमालकापेक्षा शेतमजूराची जास्त गरज आहे,उणिव आहे.म्हणून महत्त्व वाढले आहे.मग कशाला करायची शेती? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेती विकली.शहरात जाऊन झोपडपट्टीत राहू लागले.स्वताला गरीब, कंगाल,भिकारडे लेबल लावून सरकार कडे अनुदान मागू लागले.तिच शेती शहरातील अधिकारी व कारखानदारांनी घेतली.गरज नसतांना शेती असलेले शहरातील लोक जास्त आहेत.गरज नसल्यामुळे ते शेती कसत नाहीत.या दोन्ही कारणांमुळे शेती व्यवसाय बंद पडत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चौकशी केली असता त्यांचा राग कांग्रेस सरकार वर आहे.कांग्रेसने शेतकरी कडून काढून फुकटे लोकांना वाटप केले.त्याचा राग कांग्रेस वर काढला.म्हणून पर्याय शोधला भाजप.भाजपची राजकीय ध्येय धोरणे माहिती नसतांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भाजपला मतदान केले.कारण कांग्रेस ने त्यांचे उत्पन्नाचे साधन बिघडवले,अर्थकारण बिघडवले.असा त्यांचा आरोप आहे.याचा कोणताही कांग्रेस नेता अभ्यास करायला तयार नाही.
गरीबी हटाव,असा इंदिरा गांधींचा नारा होता.गरीबी हटली पाहिजे.बरे वाटले.पण गरीबी तर हटली नाही.उलट गरीब ऐतखाऊ बनला.गरीबांना सरकार स्वस्त देते,फुकट देते, अनुदान देते म्हणून गरीब होण्याची चढाओढ सुरू झाली.शेतकरी आता मजूरांच्या, गरीबांच्या लाईनीत कटोरा धरून उभा आहे.हे फुकट पाहिजे.हे माफ पाहिजे.सर्वत्र फुकटासाठी ,माफीसाठी आंदोलने सुरू झाली.
आर्थिक कमकुवत जाती जमातींना शिक्षण, आरोग्य सोबत नोकरीत आरक्षण दिले.फुकट शिक्षण, वरून नोकरी.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती सोडून आता गरीबीकडे, नोकरीतील आरक्षणकडे जास्त लक्ष घातले आहे.यात काही निम्नवर्गीय, मध्यमवर्गीय जातींना ओबीसी त आरक्षण दिल्याने आता उच्चवर्णीय जाती सुद्धा आरक्षण मागत आहेत.ज्या मराठा समाजाचे महाराष्ट्रात स्वराज्य होते, देशात साम्राज्य होते ते सुद्धा आरक्षण मागत आहेत.एकिकडे छत्रपतींचा गवगवा करायचा,आणि त्यांचाच फोटो किंवा पुतळा दाखवून आरक्षण मागायचे म्हणजे गळ्यात देवी देवतांचा फोटो किंवा कडेवर मरगळलेले, आंघोळ न केलेले, मुद्दाम भुकेले ठेवलेले पोरगं घेऊन "आई भाकर दे "म्हणायचे, विचित्र वाटते.
एकिकडे ग्रामीण भागातील उत्पन्नाची साधने शेती ,दुध वगैरे व्यवसाय बंद पडून तो लोंढा शहराकडे वळला आहे.मुंबईत आधी व्यापारी व नोकरवर्ग राहात असत.आता जास्त झोपडपट्टी वाढली आहे.त्याचा आर्थिक ताण सरकार वर पडतो.महानगरपालिका व राज्यात सत्ता हवी, म्हणून बहुमत हवे, म्हणून झोपडपट्टी दादांना सत्तेत वाटा हिस्सा द्यावा लागतो.परिणामी कालपर्यंत चोरी, मारामारी, बलात्कार , खून करणारी माणसे सरळ मंत्री पदावर जाऊन बसलीत.हे आजचे वास्तव आहे.शिवसेना जरी मराठी माणसांच्या रक्षणासाठी, हक्कासाठी तयार झाली असली तरी चोरी, हाणामारी, बलात्कार,खुनी माणसे सोबत घेऊन सत्तेवर आली.सत्ता आल्याने ही अशी सुमार बुद्धी ची माणसे सरकार बनवू लागली.मुंबईवर , महाराष्ट्र राज्यावर कमांड करू लागली.याच सत्तेसाठी, संपत्ती साठी शिवसेना अनेक वेळा फुटली.फुटत राहिल.शिवसेनेतील फूट ही राजकीय ध्येयधोरणांसाठी नसून फक्त सत्ता आणि संपत्ती साठी झाली आहे,होत आहे, होणार आहे.मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाऊन भेटलो.सांगितले कि तुम्ही गुन्हेगार, भ्रष्टाचारी, बलात्कारी खुनी आमदाराला मंत्री बनवू नका.तर ते महाशय म्हणाले,कि असा कोणीच आमदार माझ्या सोबत नाही कि त्याने हा असा गुन्हा केला नाही.एकनाथ शिंदेंनी माझ्या समक्ष, प्रत्यक्ष कबुली दिली आहे.ती कोणालाही खोटे ठरवता येत नाही.शिंदेंना ,ठाकरेंना सुद्धा नाही.आजचे शास्वत, वास्तव सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
माझे जळगाव आधी कृषी व व्यापार क्षेत्रात अग्रेसर होते.येथे एकेकाळी स.ना.भालेराव सारखे नेते , आमदार होते.आता मात्र गुन्हेगार आहेत.जळगांव नगरपालिकेत ७५पैकी एकही सज्जन किंवा प्रामाणिक माणूस नाही.डायसवर जाऊन एकमेकांना मारणारी माणसे महापौर, उपमहापौर बनली आहेत.कारण आहे.आमदार सुद्धा दारू विक्रेता आहे.यावरून आम्ही जळगावकरांची मानसिकता कळते.जळगांवची दिशा कळते.जळगांव शहर व्यापारी व नोकर वर्गाचे शहर होते.आता शहराच्या चारही बाजूंनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर येऊन राहात आहेत.त्याच भागातून निवडून आलेले नगरसेवक महापौर, उपमहापौर बनत आहेत.कोणताही राजकीय लवलेश नसलेले,रेती,राशन,सावकारी, हाणामारी करणाऱ्यांची संख्या वाढली.परिणामी जळगाव महानगरपालिका ही महागुंडांचा अड्डा बनलेली आहे.वीस लाख मताचे वाटप केले कि सहज नगरसेवक बनतो.कोणी डांबर खातो, कोणी गटार खातो,कोणी कचरा खातो,कोणी भुखंड खातो.ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुराचा लोंढा शहरात आल्याचा परिणाम मुंबई आणि जळगाव मधे उघड डोळ्यांनी दिसतो.
या परिस्थितीवर काबू करण्यासाठी फुकटचे आणि स्वस्ताचे सरकारी खिराफत वाटणे बंद केले पाहिजे.माणसाला ईश्वराने जन्म दिला तर फक्त तोंड नाही , हातपाय ,डोके सुद्धा दिले आहे.हातपाय कष्ट करून खाण्यासाठी आणि डोक्यातील मेंदू विकासासाठी दिला आहे.कोणताही माणूस ईश्वराच्या दृष्टीने गरीब नाही.कमकुवत नाही.त्याने प्रत्येकाला सारखीच शरीर संपत्ती दिली आहे.शरीर संपत्ती हिच खरी जगण्याचे साधन आहे.आपला हात जगन्नाथ! इतर भौतिक साधने ही क्रय, विक्रय ,लय ,विलय होणारी आहेत.
… शिवराम पाटील