इतिहास जसा आहे तसा !
श्री राजा शंभू छत्रपती म्हणजेच आपले श्री संभाजी महाराज! जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर श्री शंभूराजांसारख वीर, पराक्रमी, व्यक्तिमत्व झालं नाही हे समजून येते. शंभूराजांनी जे हौतात्म्य पत्करलं ते एका धर्मासाठी होतं की स्वराज्यासाठी होतं? याचा निकाल आपण इतिहासाची साधने अभ्यासल्यानंतर घेऊ शकतो. शंभूराजांच्या हौतात्म्या विषयी औरंगजेबाच्या दरबारातील इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. ज्या वेळेला बहादूरगडामध्ये दिवाने आम मध्ये शंभूराजांना औरंगजेबाच्या समोर कैद करून आणले गेले त्यावेळेला महाराष्ट्राच्या, सह्याद्रीच्या , शिवरायांच्या या छाव्याने तसूभरही आपली मान औरंगजेबासमोर झुकवली नाही. औरंगजेबाला ताजीम दिली नाही. अशा नोंदी औरंगजेबाच्या इतिहासकारांनीच लिहून ठेवल्या आहेत. औरंगजेबाने शंभूराजांना पकडल्यानंतर त्यांच्याकडे तीन प्रमुख मागण्या केलेल्या होत्या.
1 – तुला माझ्याकडचे कोण कोण फितूर झाले ते सांग.
2 – तुझा खजिना कुठे ठेवला आहे तो सांग.
3 – तुझे सगळे गडकोट माझ्या स्वाधीन कर.
अशा अटी औरंग्याने शंभूराजांच्या पुढे ठेवलेल्या होत्या. पण पराक्रमी आणि स्वाभिमानी शंभूराजांनी यातली कुठलीही अट मानण्यास नकार दिला. आणि त्याच क्षणी आपल्या या स्वराज्याच्या छत्रपतींचे डोळे काढले. इतिहासाच्या संदर्भ साधनांमध्ये कुठेही शंभुराजांनी इस्लाम धर्म स्वीकारावा मग तुझी मी मुक्तता करतो असा औरंगजेब म्हटला अशी नोंद नाही. ही घटना घडल्यानंतर दीडशे वर्षानंतर मल्हार रामराव चिटणीस नावाच्या एका बखरकाराने शंभूराजांचे चरित्र लिहिलं. हा बखरकार म्हणजे ज्या बाळाजीं आवजीना संभाजी महाराजांनी अण्णाजीपंताबरोबर हत्तीच्या पायी देऊन शिक्षा दिलेली होती, त्याचा हा चिटणीस वारस! आपल्या पंजोबाला दिलेल्या शिक्षेची सल मनात ठेवून या मल्हार रामराव चिटणीसाने शंभूराजांचे चरित्र जेवढं होता होईल तेवढं बदनाम करायचं अशा पद्धतीने अत्यंत खोट्या आणि कुठलेही पुरावे नसणाऱ्या गोष्टी शंभूराजांच्या चरित्रामध्ये घुसडल्या. या चिटणीसाने औरंगजेबाच्यासमोर शंभूराजे आल्यानंतर औरंगजेबाने त्याला तू इस्लाम धर्म स्वीकार मग तुला मी सोडून देतो, तुझे राज्य परत देतो असं लिहून ठेवलं. पुढं हा चिटणीस लिहितो की शंभूराजे औरंगजेबला असे म्हटले की मी बाटत नाही, पण जर तू तुझी बेटी (मुलगी)जर मला दिलीस तर मी बाटतो म्हणजे मी इस्लाम धर्म स्वीकारतो. असा मनघडत इतिहास चिटणीसाने लिहला आणि यातूनच पुढे संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून केली; अशा वंदतांची महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर पेरणीची सुरुवात झाली. शंभूराजांची बदनामी करून ही त्यांच्याविषयी असणारे महाराष्ट्राच्या मनातील प्रेम कमी होत नाही. असे पाहिल्यानंतर संभाजी महाराजांच्या चरित्राचा उपयोग आपल्या विचारधारेला करण्यासाठी संभाजी महाराजांची धर्मवीर अशी प्रतिमा निर्माण करण्याची सुरुवात झाली. याविषयी पुन्हा कधीतरी मी सविस्तर आपल्यासमोर मांडेनच.
संभाजी महाराजांच्या इतिहासाची प्रथम दर्जाची संदर्भ साधने औरंग्यानं संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन कर असं सांगितलं होतं का? तर याचे उत्तर नाही! असं देतात आणि जर चिटणीसाचं म्हणणे आपण मानायचे ठरवले तर शंभूराजांसारखा महान पराक्रमी स्त्री दाक्षिण्य पाळणारा राजा हा औरंगजेबाची मुलगी दिल्यानंतर आपला धर्म बदलायला तयार होतो, हे सुद्धा आपल्याला मान्य करावे लागते. हे आपण मान्य करणार का?
पण वास्तव इतिहास असा नाही. वास्तव इतिहास तो आहे की जो मोगलांच्या इतिहासकारांनी लिहून ठेवला, की संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर त्याच्या दरबारात आल्यानंतर त्यांनी तसूभरही ही आपली मान झुकवली नाही. या छाव्याने डोळे काढल्यानंतरही औरंगजेबासमोर मान झुकवली नाही, आणि औरंगजेबाच्या अटी मान्य केल्या नाहीत. आपले गडकोट स्वाधीन केले नाहीत. खजिना कुठे आहे ते सांगितलं नाही. आणि स्वतःचे रक्त सांडून, मरण पत्करून इथल्या मराठ्यांना शंभूराजांनी औरंगजेबासारख्या सम्राटासमोर मान झुकवायची नाही! स्वाभिमानाने कसं उभ राहायचं आणि शत्रूसमोर न घाबरता निडरपणे मृत्यूला सुद्धा कसे सामोरे जायचे याचा धडा घालून दिला. आणि म्हणूनच शंभूराजांच्या क्रूर हत्ये नंतर महाराष्ट्रातल्या मातीत उगवणाऱ्या गवताला सुद्धा भाले फुटले. आणि औरंगजेबासारखा महाशत्रू ला 27 वर्षे मराठ्यांशी झुंजावं लागलं आणि मराठ्यांनी औरंगजेबाला – दिल्लीच्या या बादशहाला महाराष्ट्राच्या मातीतच गाडले. हा इतिहास आहे. शंभूराजांचा हा दैदिप्यमान – धैर्यशाली इतिहास सांगत असताना आपण खोट्या असत्य इतिहासाच्या आहारी न जाता संभाजी महाराजांचे हौतात्म्य हे जगामध्ये झालेल्या, कुठल्याही मानवाने दिलेल्या हौतात्म्यापेक्षा उच्च दर्जाचे आहे. त्या हौतात्म्याचा आदर करायचा असेल महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल तर आपण संभाजी महाराजांना एका संकुचित चौकटीमध्ये न बांधता इतिहासाचा अभ्यास करुन संदर्भ साधनांचा आदर राखून जे सत्य आहे ते वारंवार सांगितलं पाहिजे. .
जोहार!!!
इंद्र्जित सावंत
कोल्हापूर
डॉ सतीश कदम
1911 ते 1948 ला सातवा निजाम मीर उस्मानअली गादीवर असून ते जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होते. या दरम्यान हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणिताबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यात नापास झालातर त्याला नाकाम अखलियात असा शेरा मिळायचा. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.
खिचर की उम्र हो तुझको
आना बख्त सिंकदर हो |
याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.”
राज्यकर्ते मुस्लिम असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निस्पक्क्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्याक महायुद्धांनंतर संपूर्ण देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती. 1946 पर्यन्त सर्वकाही व्यवस्थित चालू होते.
तत्पूर्वी 1927 च्या दरम्यान मजलीसे इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेच्या माध्यमातून पुढे रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. खरंतर रझाकार या शब्दाचा अर्थ होतो स्वयंसेवक, परंतु कासिम रझवीने 1946 ला या संघटनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर रझाकारांनी तालिबाण्याप्रमाणे सर्वत्र हैदोस घातला. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला होरपळून गेली. गावोगाव अन्याय अत्याचाराला सीमा राहिली नाही. स्वातंत्र्यानंतर केलेल्या पाहणीत सरकारी आकडेवारीतून रझाकारांच्या अत्याचाराने मराठवाड्यातील एकूण 40 गावे जाळपोळ आणि लुटालुटीला बळी पडली. यात जिल्हानिहाय गावे आणि नुकसान पुढीलप्रमाणे – औरंगाबाद 5 गावे 19,89,300 रुपये, परभणी 10 गावे 8,86,535, नांदेड 6 गावे 10,68,400, बीड 1 गाव 11000 आणि सर्वात जास्त नुकसान उस्मानाबाद जिल्ह्यातील असून यात 13 गावचे 10,68,400 रुपयाचे नुकसान झाले. अशारितीने मराठवाड्यातील तत्कालीन 5 जिल्ह्याचे मिळून 73,39,945 रुपयांचे नुकसान झाले. यात तुळजापूर तालुक्यातील नंदगाव पुर्णपणे जाळून बेचिराख केल्याने त्यांचे एकट्याचे 10,36,600 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद सापडते. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एका अदभूतपुर्व लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची 18 महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा सर्वसामान्य माणूस पेटून उठला होता. एका बाजूला संपूर्ण भारतदेश शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा आनंद घेत होता, त्यावेळी हैदराबाद संस्थांनातील जनता रझाकारांच्या क्रूर अत्याचाराला बळी पडत होती. निजामाला वारंवार सूचना देऊनही काही फरक पडत नव्हता. याउलट आतून पाकिस्तनशी संधान बांधून वेगळा देश होण्याचे स्वप्न पाहत होता.
अशावेळी 13 सप्टेंबर 1948 रोजी ले. जनरल राजेंद्रसिंहजी यांच्या नेतृत्वाखाली निजामाविरुद्ध ऑपरेशन पोलो नामक कारवाई करण्यात आली. देशांतर्गत लष्कर वापरणे योग्य नसते म्हणून याला पोलिस अॅक्शन म्हटले गेले. निजामाची फौज तशी इंग्रजांच्या तालावर नाचणारी असलीतरी त्यात फक्त बढाईखोरपणाच जास्त होता. भारतीय फौजेने सोलापूर, औरंगाबाद, आदिलाबाद, कर्नुल आणि वजीराबाद अशा पाच बाजूने हैद्राबादच्यादिशेने कूच केले. कुठलाही प्रतिकार न होता भारतीय सेना हैद्राबादमध्ये घुसली. त्यामुळे 16 सप्टेंबरला निजामाने हैद्राबाद रेडिओवर भाषण देत शरणागती पत्करून निजाम संस्थान अखंड भारतात विलीन होत असल्याचे घोषित केले. 224 वर्षाचे राज्य अवघ्या तीन दिवसात संपुष्टात आले. निजाम शरण आलातरी कासिम रझवीची वळवळ चालूच होती. शेवटी त्यालाही अटक करून विविध खटले दाखल असल्याने न्यायालयाने कासिम रझवीला 8 वर्षासाठी पुण्याच्या येरवडा तुरुंगात पाठविले. शिक्षा भोगल्यानंतर 1957 साली तो कायमचा पाकिस्तानला गेला. 1980 पर्यन्त भारत सरकार याला स्वातंत्र्यलढा मानायला तयार नव्हते. परंतु त्यानंतर या लढ्यातील स्वातंत्र्यवीरांचा योग्य तो सन्मान केला. विशेष म्हणजे यामध्ये अगदी मुस्लिम समाजासह अठरा पगड जाती व विविध संघटनांनी भाग घेतला होता.
17 सप्टेंबरला संस्थानचे प्रशासक म्हणून ले. जनरल ज्योयंतीनाथ चौधरी तर राजप्रमुख म्हणून हेच निजाम मीर उस्मानअलीखान यांची नेमणूक करण्यात आली. 1950 पर्यन्त या दोघांनी काम पहिले. वेळ आल्यावर काहीही होऊ शकते याची प्रचिती यावेळी आली. कारण सातवा निजाम हा जगातील पहिल्या तीन श्रीमंतापैकी एक असून त्यावेळी त्याची संपत्ति 236 अरब डॉलर एवढी असून आज भारतातील सर्वात श्रीमंत असणार्याप अंबानीची संपत्ती ही केवळ 40 अरब डॉलर आहे. फेब्रुवारी 1937 च्या टाईम मॅगेजीनच्या मुखपृष्ठावर निजामाचा फोटो छापून त्यात त्याच्या श्रीमंतीचा लेखाजोखा मांडला होता. निजामाच्या श्रीमंतीचे अनेक किस्से जगभर आजही चर्चिले जातात. ज्याची किंमत आज सुमारे 400 कोटी होईल असा जेकब नावाचा हिरा सहावा निजाम मीर महबूबअली आपल्या बुटाच्या टोकाला फॅशन म्हणून लावायचे. तर सातव्या निजामाकडे 50 रोल्स रॉईसचा ताफा होता. पुढे 1965 च्या भारत चीन युद्धासाठी आर्थिक मदत म्हणून निजामाने आपले 425 किलो सोने लष्करी फंडासाठी रिझर्व बँकेकडे दिले होते. खरंतर पोलीस अॅक्शनच्या अगोदरचा विचार केल्यास निजामाचे शासन बरे होते असेच म्हणावे लागेल. 1946 ला कासिम रझवीने मजलीसे इत्तेहाद मुसलमीनची सूत्रे हाती घेईपर्यन्त हिंदू मुस्लिम समाजात तेवढी तेढ नव्हती. मात्र रझवीने आपल्या समाजाला आणि निजामाला खोटी आणि पोकळ आश्वासने दाखविली. ‘नेहरू पटेल को आपके कदमोमे झुकवा देंगे हम’ या घोषवाक्याने डरकाळ्या फोडल्या. 1946 ते 48 दरम्यान रझाकारांनी सर्वत्र हैदोस घातला. निष्पाप अशा 23000 लोकांचे बळी गेले. लष्कराचा दंडुका पडताच कासिम रझवी पाकिस्तानला पळाला. मात्र अॅक्शननंतर रिअॅक्शन झाली. त्याचा राग मनात धरून लाखो मुसलमानांना त्याची किंमत चुकवावी लागली. एकट्या लातूर जिल्ह्यात 10,000 मुस्लिमांच्या कत्तली झाल्या. कासिम रझवीपासून सर्वांनीच धडा घेतला पाहिजे, अशाप्रकारचे लोक समाज बिघडवत असतात. त्यांना पळून जायला जागा आहे, परंतु सर्वसामान्यांचे काय ? हेच या संघर्षातून शिकले पाहिजे.