Home कृषी साक्षरता वनस्पतीचे पान (Plant Leaf) सविस्तर माहिती

वनस्पतीचे पान (Plant Leaf) सविस्तर माहिती

0
वनस्पतीचे पान (Plant Leaf) सविस्तर माहिती

वनस्पतीचे पान (Plant Leaf) सविस्तर माहिती
श्री.सतिश भोसले

नमस्कार शेतकरी बंधूनो,

janvicharnews.com

आज आपण वनस्पतीच्या एका महत्त्वपूर्ण अंगाविषयी जाणुन घेणार आहोत, जे की वनस्पतीच्या जडणघडणीसाठी खुप महत्त्वाची भूमिका बजावते. ते म्हणजे “वनस्पतीचे पान” होय. पान हे अनेक वनस्पतींचे सर्वांत सहज दिसणारे, खोडावरचे, महत्त्वाचे, सपाट व बाजूचे उपांग होय. पान हा वनस्पतीचा एक भाग आहे. या भागातून प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न बनवतात. पान सहसा हिरव्या रंगाचं असते. वैदिक वाङ्मयातपर्णही संज्ञा वनस्पतींच्या पान या अवयवास (पानास) वापरलेली आहे. पानांतील हिरवे द्रव्य (हरितद्रव्य) व त्यांची बहुधा मोठी असलेली संख्या यांमुळे वनस्पती किंवा जंगल अथवा शेत यांसारखे वनस्पतींचे समूह यांचे स्वरूप दुरूनही सहज कळते. सर्वच पाने हिरवी, लालसर, पिवळी किंवा झडलेली असताना एखाद्या वनस्पतीचे दृश्य निरनिराळे दिसते. पाने व खोड यांचे कलिकावस्थेत व नंतर निकटचे संबंध ध्यानात घेऊन त्या दोन्हींना मिळून प्ररोह म्हणतात आणि त्याचा उगम बीजी वनस्पतीत बी रूजताना त्यातील आदिकोरकापासून (अंकुराच्या वर वाढणार्या भागापासून) होतो. खोडावरची शेंड्याची कळी (अग्रस्थ कोरक) जसजशी वाढते तसतशी तीतून चिमुकली पाने व खोड हळूहळू साकार होतात; सर्वांत कोवळे भाग शेंड्याजवळ व जूने भाग क्रमाने खाली तळाकडे याप्रमाणे अग्रवर्धी अनुक्रम दिसतो. गाजर, मुळा व बीट यांच्या मुळांवर दिसणारी पाने वस्तुतः मुळांच्या टोकावर असलेल्या संक्षिप्त खोडावरच आलेली असून प्रत्यक्ष मुळांवर पाने कधीही येत नाहीत (अपवाद रताळे वगैरे). ती खोडावर विशिष्ट जागी (पेर्यांवर) विशिष्ट पद्धतीनुसार मांडलेली असतात. खोडाशी पानाने केलेल्या वरच्या कोनास बगल (कक्ष) व त्यात आढळणार्या कळीस (कोरक किंवा मुकुल) बगलेतील (कक्षास्थ किंवा कक्षस्थ) कली म्हणतात. पान बहुधा सपाट व पातळ असून त्यातील कठीण शिरांच्या विशिष्ट मांडणीमुळे त्याला आधार प्राप्त होऊन योग्य प्रकारे व प्रमाणात प्रकाश उपलब्ध व्हावा अशा स्थितीत ते खोडावर राहते. प्रकाशाच्या सान्निध्यात अन्ननिर्मिती करणे (प्रकाशसंश्लेषण) व नेहमी वनस्पतीतील वाजवीपेक्षा अधिक असलेला पाण्याचा अंश वाफेच्या रूपाने बाहेर टाकणे आणि गरजेप्रमाणे त्यावरील अतिलहान छिद्रातून म्हणजे त्वग्रंध्रांद्वारे ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकणे

इ. प्रक्रिया पानांच्याद्वारे चालतात व त्यांना अनुकूल अशी त्यांची अंतर्बाह्य संरचना, आकार व आकारमान असते. पानांचा उगम व विकास खोडावर किंवा फांदीवर शेंड्याकडे अतिसूक्ष्म आणि सतत विभाजन होत असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या (विभज्या) बाह्यस्तरावर (त्वचाजनक) प्रथम लहान उंचवटे बनून (आद्यपर्णे) होतो व पुढे त्यात मधली ऊतके (समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांचे-पेशींचे समूह) व शेवटी वाहक कोशिक किंवा वाहिन्या बनून ते पूर्ण बनते.

यामध्ये बहुधा पानाच्या टोकाचा भाग प्रथम पूर्ण होऊन नंतर मध्यभाग व शेवटी तळचा भाग पूर्ण होतो. याउलट क्रम काही नेचांत आढळतो. खोड व मूळ यांच्या विकासाशी तुलना केली असता पानांची वाढ सतत होणारी नसून पान हे फारच मर्यादित वाढीचे पार्श्विक उपांग होय, असे मानतात. काही शेवले व शेवाळी यांसारख्या साध्या वनस्पतींना पानासारखी व थोडीफार तशीच कार्ये करणारी उपांगे असतात; तथापि ती अत्यंत साधी असल्याने खरी पाने वाहिनीवंत (द्रव पदार्थ वाहून नेणार्या घटकांनी युक्त असलेल्या) वनस्पतींत (बीजुकधारी पिढीवर) आढळणारीच होत. त्याचा वरचा व खालचा पृष्ठभाग यांमध्ये रंग, त्यावरील लव (रोम) आणि छिद्रे म्हणजे पर्णरंध्रे यांत फरक आढळतो. पानांमध्ये असलेल्या शिरांमुळे त्याला आधार प्राप्त होऊन पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा अशा स्थितीत ते खोडावर राहते. खरी पाने फक्त संवहनी वनस्पतींवर असतात.

वनस्पतीच्या पानाचे भाग :-

1) पर्णपत्र :- पर्णपत्र हा पानाचा पसरट भाग असतो .

2) पर्णधारा :- पर्णपत्राची कडा म्हणजे पर्णधारा

कर्णधाराचे प्रकार- सलग, खंडित किंवा दंतेरी

3) पर्णाग्र :- पर्णपत्राचे पुढचे टोक म्हणजे पर्णाग्र.

पर्णाग्रचे प्रकार निमुळते, टोकदार व गोलाकार असे आहेत.

4) देठ :- काही पानांना देठ असतात तर काही पानांना देठ नसतात.

5) पर्णतल :- पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय.

6) उपपर्ण :- पानाच्या तळाशी असणारा छोटासा पानासारखा भाग म्हणजे उपपर्ण होय.

वनस्पतीच्या पानांचे दोन प्रकार पडतात :-

मुख्य प्रकार – साधे पान व संयुक्त पान

अ) साधे पान :-

या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते.

ब) संयुक्त पान :-

या पानांमध्ये मुख्य शिरे भोवती पर्णपत्र अनेक लहान-लहान परीक्षांमध्ये विभागलेले असते.

पानांची मांडणी :-

खोडावरील पानांच्या मांडणीनुसार पानांचे एकांतरित, आवर्ती, संमुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात.

पर्णपत्राच्या आकारानुसार गोलाकार, तरफदार, लंबाकार असे प्रकार पडतात.

शिराविन्यास :-

शिराविन्यास दोन प्रकारचा असतो.

1) जाळीदार शिराविन्यास :- पर्णपत्राच्या मध्यभागी एक जाड शीर असल्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागांमध्ये विभागले सारखे दिसते. या मुख्य शिरेला उपशिरा फुटलेल्या असतात आणि त्यांची जाळी तयार होते.

उदाहरणार्थ -द्विदल वनस्पतीची पाने -पिंपळ

2) समांतर शिराविन्यास :- पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या सुरुवातीपासून ते थेट टोकापर्यंत एकमेकांना समांतर असतात.

उदाहरण -एकदल वनस्पतीची पाने -मका

janvicharnews.com

पानांची संरचना :-

प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत प्रकाशग्रहण करणे, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन या वायूंची देवाणघेवाण करणे, बाष्प बाहेर टाकणे, खोडाकडून आलेले पाणी व क्षार वनस्पतीला पोहोचविणे आणि तयार झालेले अन्न इतर अवयवांकडे वाहून नेणे यांसाठी पानांची रचना झालेली असते. पानांचे संरक्षण करण्यासाठी तसेच पानांमधील पाण्याचे बाष्पीभवन मर्यादेबाहेर होऊ नये यांसाठी पानांच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागांवर पेशींचा स्तर असतो. या स्तरांना अधिचर्मम्हणतात. अधिचर्मावर क्यूटिनाचा स्तर असतो. दोन्ही अधिचर्मांच्या दरम्यान पर्णमध्योती असते. पर्णमध्योतीच्या पेशींमध्ये हरितलवके असतात. प्रकाशसंश्लेषणाचे कार्य याच स्तरात घडून येते. मात्र नेचे आणि बहुतेक सपुष्प वनस्पतींमध्ये पर्णमध्योतीचा स्तर दोन स्तरांमध्ये विभागलेला असतो; वरच्या बाजूचा (१) स्कंभ (पॅलिसेड) स्तर आणि त्याखालचा (२) स्पंजी स्तर. पानांच्या वरच्या बाजूचा मध्योती स्कंभपेशींनी बनलेला असतो. या स्कंभपेशी जवळजवळ व अधिक प्रमाणात असतात. खालच्या बाजूकडील मध्योती स्पंजी असून तेथे पेशी विरल असतात व त्यांमध्ये पोकळी असते. मध्योतीमध्ये संवहनी पूल असतात. त्यातून पाणी व इतर घटक मध्योतीभर दिले जातात आणि तयार झालेले अन्न वाहून नेले जाते. पर्णरंध्रे अधिक संख्येने खालच्या अधिचर्मामध्ये असतात. प्रत्येक पर्णरंध्राभोवती दोन रक्षक पेशी असतात. पर्णरंध्रामधून वायूंचे विसरण होत असते.

वनस्पतीच्या पानांची कार्ये :-

पाने हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करून अन्नाच्या स्वरूपात साठविण्याचे कार्य करतात. या क्रियेत पाण्याच्या रेणूचे विघटन होऊन ऑक्सिजन वायू निर्माण होतो (प्रकाशसंश्लेषण). श्वसनक्रियेत हवेतील ऑक्सिजन पानांवरील पर्णरंध्रांमार्फत आत घेतला जाऊन तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पानांद्वारे बाहेर सोडला जातो. पाने वनस्पतींनी मुळांद्वारे शोषलेले पाणी व क्षार खोडातून सर्व अवयवांपर्यंत नेण्याचे कार्य तसेच जास्तीचे पाणी बाष्परूपात वातावरणात सोडण्याचे कार्य करतात (बाष्पोत्सर्जन).

वनस्पतीच्या पानांचे आयुष्य :-

खोडावर पाने किती काळ टिकतात, त्यानुसार त्याचे वर्णन करतात.

(१) पर्णपाती :- ही पाने कमी काळ व केवळ एका ऋतूपर्यंत असतात. बहुधा हिवाळ्यात ती गळतात.

(२) पानझडी:- या प्रकारात पाने वर्षभर असतात. दरवर्षी मार्चमे महिन्यांत नवीन पालवी येते.

(३) सदाहरित :- या प्रकारात पाने एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहतात.

पान प्रकाशसंश्लेषणाचे स्त्रोत:-

वनस्पतीची पाने हे वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषणाचे प्राथमिक उदाहरण आहे. पान हा वनस्पतीचा एक भाग आहे. या भागातून प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न बनवतात. पान सहसा हिरव्या रंगाचं असते. प्रकाशसंश्लेषण प्रामुख्याने पानांमध्ये घडते. हे हरितलवक नावाच्या विशेष पेशी घटकात घडते. पानाला एक देठ आणि पाते असते. पाता रुंद असतो, त्यामुळे तो प्रकाशसंश्लेषण होत असताना सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. हरितलवक, ज्यात प्रकाशसंश्लेषण होते, त्यात हरितद्रव्य असते. हरितद्रव्य सूर्याची प्रकाश ऊर्जा शोषून घेते. पर्णछिद्रे नावाची छोटी रन्ध्रे कार्बन डायऑक्साइड पानात यायला आणि ऑक्सिजन बाहेर पडायला मदत करतात. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत निर्माण झालेला पिष्ठमय पदार्थ ग्लुकोस हे पाने, फुले, फळे, बीज निर्माण करण्यासाठी ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जातो.

पानांमध्ये हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलखेरीज कॅरोटिनाइड्स, क्झॅंथोफिल, ॲंथोसायनिन यासारखी पिवळ्या आणि तांबड्या रंगांची रसायनेसुद्धा असतात. एरवी क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे इतर रंग झाकले जातात. जेंव्हा क्लोरोफिल नष्ट होते तेंव्हा इतर द्रव्यांचे रंग दिसायला लागतात. काही झाडे फॉलच्या काळात लाल रंगाचे ॲंथोसायनिन तयारही करतात. या द्रव्यांमुळे निर्माण होणारे रंग एकमेकात मिसळून त्यांच्या प्रमाणानुसार रंगांच्या वेगवेगळ्या असंख्य छटा तयार होतात…!!!

…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!

* शेतकरी हितार्थ *

—-

*!! अन्नदाता सुखी भव: !!*

*काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो*

*”Agriculture is my Love, Passion, Culture & Life”*

*विचार बदला! जीवन बदलेल!!*