जगातील प्राचीन विद्यापीठे तक्षशिला पाकिस्तानात तर नालंदा भारतात
डॉ सतीश कदम
janvicharnews.com
2017 -18 च्या एका शैक्षणिक अवहालानुसार आज संपूर्ण भारतात एकूण 903 विद्यापीठे, 41,435 महाविद्यालये तर 3 कोटी 66 लाख विद्यार्थी दरवर्षी पदवी घेत आहेत. भारताचे दुर्भाग्य म्हणजे यातील एकही विद्यापीठ जगातील पहिल्या 200 उच्चप्रतीच्या विद्यापीठाच्या यादीत नाही. आपण सहज वाचतो की, इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाची स्थापना इ. स. 1096 ला होऊन त्याने इंग्लंडला 28 राष्ट्राध्यक्ष दिले, तर केंब्रिज विद्यापीठ इ.स. 1209 चे असून आतापर्यंत या विद्यापीठातील 89 विद्यार्थ्याना नोबेल प्राईज मिळालेले आहे.
परंतु आपण हे विसरून जातो की, जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठे भारतात झालेली असून त्यात नालंदा आणि तक्षशिला ही दोन अतिशय संपन्न अशी विद्यापीठे होती. भारताच्या फाळणीनंतर नालंदा भारतातील बिहार राज्यात आहे तर तक्षशिला पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विद्यापीठाचा परिसर हा जागतिक पर्यटनासाठी संरक्षित करण्यात आलेला आहे.
तक्षशिला विद्यापीठ इ. स. पूर्व 800 ते इ. स. पूर्व 400 पर्यंत म्हणजे 1200 वर्षे अस्तित्वात होते. इ. स. पूर्व 327 म्हणजे 2600 वर्षापूर्वी सिंकदरने जेव्हा तक्षशिलेवर स्वारी केली तेव्हा तेथे बॅसिलियस हा राजा असून आंभी हा त्याचा पुत्र होता. इसवी सनाच्या पाचव्या शतकात हूण टोळ्यांनी आक्रमण करून तक्षशिला नष्ट केले. पुढे इंग्रजांच्या आगमनानंतर 1912 साली जॉन मार्शलने उत्खनन करून तेथे गाढलेल्या भीर, सिरकम आणि सिरमुख या तीन शहराचा शोध लावला. प्राचीन संदर्भानुसार राजा भरताचा पुत्र तक्ष नावावरून याला तक्षशिला नाव पडले. तक्षशिला गांधार देशाची राजधानी असून या विद्यापीठात वैद्यक, स्थापत्य, युद्धशास्त्र, राजनीतीसह अनेक विषयाचे शिक्षण दिले जात होते. याठिकाणी जगभरातील अनेक राजपुत्र शिक्षण घेत असून त्यांनी दिलेल्या मदतीतून गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जात असे. आर्य चाणक्य, आयुर्वेदाचा महान पंडित चरक यांनी तक्षशिलेत अध्यापन केले. अशोकाच्यारूपाने बौद्ध धर्माच्या चळवळीचे केंद्र म्हणून तक्षशिला प्रसिद्धीस पावले. तर बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या चळवळीस याठिकाणी मोठा राजाश्रय मिळाला. तक्षशिला परिसरात अनेक स्तूप सापडले असून त्यातील बहुतेक स्तूप हे सम्राट अशोकाने बनविलेले आहेत. इ. स. पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी शेकडो वर्ष अगोदर प्राचीन भारतात तक्षशिलासारखे नामांकित विद्यापीठ असावे हे समृद्ध भारताच्या प्रगतीचे ठळक उदाहरण आहे. याठिकाणी इंग्रजांनी केलेल्या संशोधनावरून तक्षशिला विद्यापीठ हे जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ मानले जाते. फाळणीनंतर ते पाकिस्तानच्या भूभागत गेलेले असल्याने रावळपिंडी पासून ते 45 किमी अंतरावर आहे. तक्षशिला सारखे बुद्धीचे केंद्र आपल्या भागात असूनही पाकिस्तानला शहाणपण मिळू शकले नाही हे त्यांचे दुर्दैव्य म्हणावे लागेल. तेथील अराजकतेमुळे जगभरातील पर्यटक तिथे जाणे टाळतात.
जगातील दुसरे प्राचीन मानले गेलेल्या नालंदा विद्यापीठाची स्थापना इ. स. 450 मध्ये पहिल्या कुमार गुप्त या राजाने केली होती. जवळपास 57 हेक्टर परिसरात याची व्याप्ती असून ते 12 व्या शतकापर्यंत जगातील एक नामवंत शिक्षण केंद्र होते. विशेष म्हणजे 7 व्या शतकात चीनचा विद्वान हू एन त्संग हा याचठिकाणी वर्षभर राहून शिकून गेलेला आहे. त्याने आपल्या प्रवासवर्णनात नालंदा विद्यापीठाविषयी अतिशय माहितीपूर्ण असे लेखन केलेले आहे. तर 1915 साली इंग्रजांनी याठिकाणी उत्खनन करून जगाला हा महान ठेवा माहित करून दिला.
यावर झालेल्या संशोधनानुसार आणि तत्कालीन मुस्लिम इतिहासकार ‘ मिनाजुद्दीन सिराज’ याने 1206 साली लिहिलेल्या आपल्या ‘ तबायक ए नासिरी’ नावाच्या ग्रंथात नालंदा विद्यापीठाविषयी अतिशय छान लिखाण केलेले आहे. नालंदा या शब्दाची फोड, ना +आलम + दा = नालंदा याप्रमाणे असून याचा अर्थ होतो, ज्ञानरूपी भेटीला कुठलाही प्रतिबंध नसावा. बिहार म्हणजे ज्याने जगाला बौद्ध, जैन, गुरु नानक इत्यादि महापुरुष दिले ते ठिकाण. बिहारमधील पाटणा शहरापासून 90 किमी वर नालंदा हे छोटेसे ठिकाण असलेतरी जिल्ह्याला नाव मात्र नालंदा देण्यात आलेले आहे. भाजलेल्या लाल विटात बांधलेल्या या वास्तूचे अवशेष पाहिल्यानंतर मन थक्क करून जाते. आज साधारणपणे 800 x 1600 फुट लांबीचा हा परिसर पाहताना मन भूतकाळात गेले म्हणजे झाले.
कधीकाळी याठिकाणी 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून जवळपास 2000 शिक्षक त्यांना शिकवत होते. याची निवड पद्धत अतिशय कठीण असून मोठे दिव्य प्राप्त केल्यानंतरच येथे प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र 20 x 25 फुटाची स्वतंत्र खोली असून त्यातच स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली होती. येथे व्याकरण, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, विज्ञान अशा सर्वच शाखांचा यात अंतर्भाव होता. त्यामुळे चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया, तिबेट, नेपाळ, ग्रीस इत्यादी देशातील विद्यार्थी याठिकाणी येऊन शिक्षण घेत होते. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार येथे जवळपास 90 लाख पांडुलिपीतील हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ होते. या परिसरावर हीनयान पंथाचा पगडा होता. तरीसुद्धा येथे ज्ञान आणि विज्ञान अशा दोघांचा संगम होता. त्यामुळेच येथून राजा हर्षवर्धन, धर्मपाल, नागार्जुन, सारखे महान राजे शिकून गेले. जागतिक ज्ञांनाची दोन महान केंद्रे बौद्ध गया आणि महावीराचे पावापुरी याच परिसरात आहेत.
12 व्या शतकापर्यंत सर्वकाही छान होते. दिल्लीच्या गादीवर महंमद घोरीचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबकने पहिल्या मुस्लिम सत्तेची निर्मिती केल्यानंतर बिहार प्रांतातील त्याचा शिपाह सालार इख्तीयारूद्दीन मुहमद बिन बख्तियार खिलजी याने इ. स. 1193 मध्ये नालंदावर आक्रमण करून तो परिसर जाळून टाकला. कित्येक महिने तो परिसर आगीने धूपत होता. आज खंडहाराच्या स्वरुपात लाल विटातील नालंदा परिसर पाहताना मन हेलावून जाते. विशेष म्हणजे पाटण्यावरून नालंदाकडे जाताना अगोदर बख्तियारपूर नावाचे मोठे रेल्वे स्टेशन लागते त्याच्या पुढे गेले की नालंदा आहे. ज्याने नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केले त्याच्याच नावाने असलेल्या बख्तियारपूर नावाच्या रेल्वे स्टेशनकडे पाहिल्यानंतर सर्वधर्म समभावाची कीव येते.
नालंदा पाहिल्यानंतर प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटतो. या परिसराचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्षपणे नालंदा विद्यापीठाला भेट देण्याचा योग आला. बरेच काही नष्ट झाले असलेतरी बरेचकाही शिल्लक आहे. बस जे आहे ते पहाण्यासाठी पूर्व अभ्यासाची नजर हवी. पाकच्या अराजकतेमुळे इच्छा असूनही तक्षशिला या ठिकाणी जाता येत नाही याचे दु:ख आहे. गौतम बुद्ध, महावीर, गुरूनानकासारखे महापुरुष, अशोकासारखा सम्राट आणि चाणक्यासारखा बुद्धिवंत, चरकासारखा आयुर्वेदाचार्य याच मातीने दिले. साहजिकच बौद्ध, जैन, शीख या भारतातील मुख्य धर्माची स्थापना करणारे महापुरुष याच भागात जन्मले. ज्या बिहार राज्यात हा भाग मोडतो त्याची आजची अवस्था पाहिल्यानंतर कालाय तस्मै नम: एवढेच म्हणावे लागते.