Home इतिहासाच्या पाऊलखुणा तेलंगणातील अरे मराठा

तेलंगणातील अरे मराठा

0
तेलंगणातील अरे मराठा

तेलंगणातील अरे मराठा

डॉ सतीश कदम
वेळ आणि काळ कसाही असो मराठे ज्याठिकाणी जातील तेथे आपले अस्तित्व कायम ठेवतात. पानिपत युद्धानंतर गुलाम म्हणून बलुचिस्तान प्रांतात नेलेला बुग्ती मराठा मुस्लिम बनविला गेलातरी त्याने आपला बाणा आणी भाषा बदलली नाही. तीच अवस्था हरियणाच्या पानिपत परिसरात राहणारा रोड मराठा आपली मराठी अस्मिता जपत जगतोय. ज्याप्रमाणे दक्षिणेतून येणार्‍या सर्वांनाच मद्रासी म्हटले जाते त्याप्रमाणे उत्तर भारतातून दक्षिणेत येणार्‍याला आर्य म्हणजे अरे म्हटले गेले. यातील अरे म्हणजे आर्य. यात कुलीन मराठा शेतकरी असल्यास त्याला अरे मराठा म्हटले गेले. त्याला अरे क्षत्रिय, अरे वाडू या नावानेही ओळखले जाते. अरे मराठा समाज मोठ्या प्रमाणात तेलंगणातील वरंगळ आणि करीमनगर जिल्ह्यात असून हा भाग नांदेडपासून अगदी जवळ आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एवढे जवळ असूनही याविषयी लिखित स्वरुपात विशेष माहिती मिळत नाही. या दुर्लक्षित विषयावर उस्मानीया विद्यापीठाचे प्राध्यापक श्रीधर कुलकर्णी यांनी गावोगावी फिरून केलेले संशोधन मार्गदर्शक आहे.
चौदाव्या शतकात बहामनी सत्तेच्या कालखंडात पडलेल्या दुष्काळामुळे, व्यापारामुळे किंवा मध्ययुगातील मराठ्यांच्या स्वार्‍यात सहभागी होण्यासाठी हा मराठा याठिकाणी स्थलांतरित झाला असावा. याबाबत मतमतांतरे असून याबाबत त्यांना विचारल्यानंतर काही जाणकार सांगतात की, आमी कंन्दी आल्ते मन्ता? आमी गेल्तो कुट्ट ? इत्तंचु हातु. त्यानुसार आम्ही याचठिकाणचे असून प्राचीनकाळी इथले जंगल साफ करून वस्ती केली. याला पुष्टी देताना असे म्हटले की, भाषावार प्रांत रचनेपूर्वी तत्कालीन कर्नाटक म्हणजे आजचा तमिळनाडू, आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटक. प्राचीनकाळीतर हा भाग खानदेशात मोडत होता. धाराशिव जिल्ह्यातील कानेगाव गावातील शके 1180 च्या शिलालेखात कृष्णराव यादवांचा उल्लेख तेलंगराय स्थापणाचार्य असा केल्याने पूर्वी तेलंगणा भागही आपल्यातच मोडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा भाग मराठी भाषिककाबरोबरच होता असे म्हणता येईल. इ. स. 1290 च्या मैलंगी येथील शिलालेखात व म्हाइंमभट्टाच्या लिळाचरित्रात अरे शब्द आल्याने त्यांचे प्राचीनत्व बहामनीच्याही पलीकडे जाते. अरे मराठ्यांची आडनावे अडकने, अंबरडे, कदम, कलवाटे, कवडे, खवले, गुंड, चव्हाण, चेलके, देवकार, पकडे, पौरावरम, पुलीतारी, बॉसले, मोगडे, लकडे, सेलार, हणमकंडे, माचकपांडे, थोरगामे, हंबीरे याप्रमाणे असून तेथील माणसाला नाव विचारताच तो स्वत:चे नाव सांगून घरचे नाव म्हणत आडनाव सांगतो. मी मल्लक्का, घरचं नांवु सुरव्याचे, म्हाइर गोविंदपूर.
अरे मराठा कधी आला हे निश्चित सांगता येत नसलेतरी अरे मराठ्याने आपले क्षत्रियत्व टिकून ठेवलेले असून शेकडो वर्षापासून त्यांच्यातील जुन्या पाटिलकीचा रुबाब आजही कायम आहे. अरे मराठ्यात भुईघर म्हणजे जमीन मालक आणि मुसादार म्हणजे शेतमजूर असे दोन वर्ग असून जिरायत क्षेत्रात यांची मोठी वस्ती असून कितीही गरीबी असलीतरी तो हलकी कामे करत नाही. मग अरे मराठ्यासोबतचा अठरा पगड समाज गेला कुठे हा शब्द कायम राहतो. कारण मराठा भाषिक म्हणून इतर कुठलाही समाज तेथे आढळत नाही. कदाचित कालानुरूप तो तिथल्या समाजात विलीन झाला असावा. एवढेच नाहीतर अरे मराठ्यांना धर्म कार्यासाठी तेलंगी ब्राम्हणच लागतो. लग्नकार्यातील विधी सारखेच असलेतरी तांदूळ उत्पादक प्रदेश असलातरी अक्षदासाठी ज्वारीचा वापर करत असल्याने त्यांची मुळ वृत्ती कायम आहे. ज्वारी, बाजारी आणि कापसाची कोरडवाहू शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.
वैष्णव सांप्रदायाचा प्रसार ज्ञानेश्वरापासून मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, तर अरे मराठा समाज विठ्ठल किंवा बालाजीला मानताना दिसत नाही. याचा अर्थ त्यांचे स्थलांतर तेराव्या शतकापुर्वी झाल्याचे स्पष्ट होते. अरे मराठा राजन्ना म्हणजे शिव, पोचम्मा आणि इरान्नाला मानत असल्याने तो शैववादी आहे. त्यामुळे विमलवाड्याचे राजराजेश्वराचे म्हणजे शिवाचे मंदिर त्यांच्यासाठी कुलदैवत आहे. शिवभक्ती म्हणजे अरे मराठ्यांच्या कुणबीपणाचे प्रतिक आहे. पोचम्मा नावाने देवीभक्ती करत असलेतरी तुळजापूरची अंबाबाई आमचं कुलदैवत, तुळजापूरला कदी जानं झालं नाइ असे ते आवर्जून सांगतात. तर आरतीतही तुळजाभवानीचा उल्लेख याप्रमाणे करतात, मराटी वंसु, उतपती करायीची, उक्षलवानी अंबाभवानी, तुलजापुरॉतु अवतार. धार्मिक बाबतीत काही असो परंतु तेथील संपूर्ण समाज हा छत्रपती शिवरायांना मानत असल्याने मध्ययुगातील राजकीय परिस्थितीचे त्यांना चांगलेच अवलोकन असावे हे स्पष्ट होते. त्यांच्या भाषाशैलीचा अभ्यास करताना स्पष्ट होते की, त्यांची भाषा मराठीच असलीतरी त्यात जुना बाज खूप आहे. त्यानुसार मई म्हणजे आई, बापू म्हणजे बाप, थोल्ला बापू म्हणजे चुलता, आता म्हणजे सासू, बनुजी म्हणजे आत्याची मुलगी किंवा नणंद, भावो म्हणजे बहिणीचा नवरा, भावा म्हणजे थोरला दिर, देर म्हणजे धाकटा दिर, लेकं म्हणजे पुत्र, कंत म्हणजे पती, म्हेऊनं याप्रमाणे मराठी नावे असलीतरी त्यात फरक आहे. बोलीभाषेतील इतर शब्दही जवळचे वाटायला लागतात. उदा. अंटी म्हणजे अंगठी, अंगोठी म्हणजे अंगठा, अज्जु म्हणजे अद्याप, अमी म्हणजे आम्ही, आबु म्हणजे प्रतिष्ठा, इज्जु म्हणजे वीज, गॉमु म्हणजे गाव, तम्मा म्हणजे तेव्हा, नुगडं म्हणजे लुगडं, पल्ली म्हणजे वाडी, ऐलाडू म्हणजे अलीकडे अलीकडे, अवग्गे म्हणजे अवघे खाल्लाकडं म्हणजे पुर्व तर वरलाकडं म्हणजे पश्चिम. त्यांचे दागिनेही आपल्यासारखेच बिगवाली, पोची, बिंदलु, मासपटा, तोडे, गोपु, मंगळसूत्र, मुद्या याप्रमाणे आहेत. त्यांच्या निवासस्थानाची रचनाही अगदी महाराष्ट्राप्रमाणे असून चौसोपी वाडा आणि त्यात ढेळज, त्यात देवळ्या, मधल्याबाजूला अंगण असते. मंदिरात दानपत्रासाठी गोल कनिंग ठेवत त्यावरून नवसाला कानगी शब्द रुढ झाला असावा. घराबाहेर जाताना जातो म्हणणे अशुभ मानून त्याऐवजी येतो असे म्हणतात.
अरे मराठ्यासारखे अनेक लोक हजारो वर्षापासून सध्याच्या मराठी भाषिकापासून दूर असलेतरी त्यांनी आपली संस्कृती अबाधित ठेवली असून या दोन जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. संघर्षासाठी तो पटकन एक होतो हे अरे मराठ्याचे वेगळे वैशिष्ट म्हणावे लागेल. अरेप्रमाणेच कोचीन आणि कसरगोड भागातील मराठा शेतकर्‍यांना मराटो म्हटले जाते. चेन्नई परिसरातील कारवार, बेल्लारी, अनंतपूर भागात मोठ्या प्रमाणावर मराठा असून तोही पारंपरिकपणे शेतीच करतो. त्यामुळे परवडत नसतानाही काळ्याआईची सेवा करून क्षत्रीयत्वाच्यारूपाने तो दात्याच्या भूमिकेत कायम असून ‘पळस गेला कोकणा, तरी त्याला तीन पाने चुकेनात’ ही त्याची अवस्था कायम आहे. एकट्या दिल्लीमध्ये 70 ते 80 हजार मराठी आहेत. तर रामेश्वर, काशी, जगन्नाथपुरी, काठमांडू येथील पुजारी अस्सल मराठी असून अशांचा शोध घेऊन मराठी भाषा व संस्कृति टिकविली पाहिजे. अरे मराठातर स्वत:ला जबाबदार घटक समजून नेहमी म्हणतो, थोल्ले कुलीचं आपन लोकु, ये मर्‍हाट जल्मु कशाला ? आणि म्हणून अरे मराठ्यात राष्ट्रासाठी जात हा शब्द वापरला जात असून मराठा जातीसाठी माती खातो ही म्हण त्यांना पूरक ठरते.