निमॅटोड (सूत्रकृमी) भविष्यातील संकटश्री.सतिश भोसले
नमस्कार शेतकरी बंधूनो,
आज आपण निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमी हे संकट सतत कश्या प्रकारे वाढत चालले आहे ते सविस्तर पाहणार आहोत. जर आपण वेळोवेळी योग्य नियोजन केले नाही तर ते भविष्यात एक मोठी अडचण होऊन बसेल.
१) निमॅटोडची सुरवात कुठून आणि कशामुळे होते.
२) निमॅटोडच्या प्रकार आणि अवस्था कशाप्रकारे वाढतात.
३) पिकामध्ये त्याचा प्रसार कसा होतो.
४) त्यामुळे अडचणी कश्या वाढतात.
५) निमॅटोड येऊ नये म्हणून उपाय योजना आणि आल्यावर उपाययोजना कश्या प्रकारे कराव्यात.
सर्वात महत्वाचे निमॅटोड म्हणजे काय??
सुत्रकृमी किंवा निमॅटोड हा शेती मधील सध्याचा सर्वाधिक चिंतेचा विषय झालेला आहे. ह्यांना राऊंड वर्म, ईलवर्म अशा नावांनी देखिल ओळखले जाते. भाजीपाला पिके, फळबागा, फुलशेती ह्यापैकी प्रत्येक क्षेत्रास निमॅटोडने बाधीत केलेले आहे.
निमॅटोडस् हे सुक्ष्मदर्शकाद्वारे दिसणारे अत्यंत लहान आकाराचे सुक्ष्म असे जीव आहेत. निमॅटोड हे सूक्ष्म आणि धाग्यासारखे लांबट असतात व सरासरी लांबी ०.२ ते ०.५ मि.मी. इतकी असते. निमॅटोड उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत, त्यांच्या निरीक्षणासाठी कमी क्षमतेच्या सूक्ष्मदर्शिकेचा वापर केला जातो. निमॅटोडच्या जगभरात किमान १० लाख प्रजाती आहेत, त्यापैकी आपण आता पर्यंत केवळ २०,००० ते २५,००० प्रजाती पुर्णपणे जाणुन आहोत. ह्या निमॅटोडच्या प्रजातींपैकी निम्म्याहुन अधिक हे परजीवी आहेत. मातीच्या १ चौरस मीटर क्षेत्रात २ ते १० लाख निमॅटोड असु शकतात. जगाच्या पाठीवरिल एकुण बहुपेशीय जीवांच्या दर ५ जीवांपैकी ४ जीव हे सुत्रकृमी आहेत आणि म्हणुनच पृथ्वीवरिल एकुण प्राण्यांच्या संख्येपैकी ८० टक्के संख्या हि सुत्रकृमींची असावी असा अंदाज आहे. समुद्रात, गोड्या पाण्यात, पर्वत शिखरांवर, उष्ण कटिबंधात, शीत कटिबंधात, प्राण्यांच्या शरिरात, वनस्पतींच्या मुळांत, जमिनीत अशा जवळपास सर्वच ठिकाणी निमॅटोड आढळुन येतात.
A) पिकांवर जगणारे मुख्यत्वे दोन प्रकारचे निमॅटोड येतात :-
१) पहिल्या गटातील निमॅटोड पिकाच्या मुळांमध्ये राहतात, आणि मुळांवर जगतात.
२) दुस-या गटातील निमॅटोड पिकाच्या मुळांवर जगतात मात्र जमिनीत राहतात.
B) पिकांवरील निमॅटोडच्या प्रमुख प्रजाती :-
1) रुट – नॉट निमॅटोड
2) सिस्ट निमॅटोड
3) लेजन निमॅटोड
4) रोनिफॉर्म निमॅटोड
5) सायटस निमॅटोड
6) बरोवींग निमॅटोड
C) पिकांवरील प्रादुर्भाव :-
जमिनीत वापरल्या जाणा-या हत्यारांतुन, चप्पल, बुट, तसेच प्रादुर्भाव ग्रस्त रोपांद्वारे, मातीद्वारे होतो. उबदार, बागायती परिसरात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येतो.
निमॅटोड जमिनीत अंड्यांच्या स्वरुपात सुप्तवस्थेत राहात. सहसा मादी हि मुळांतुन बाहेर निघत नाही, मुळांवरिल नरम पडलेल्या गाठीत ती अंडी देवुन राहते. मात्र नर मुळे सोडुन बाहेर पडतो. ज्यावेळेस वातावरण पोषक असते त्यावेळेस प्रामुख्याने मुळांच्या टोकाद्वारे प्रादुर्भाव होतो. मुळांवरिल गाठींमुळे पिकांस अन्नद्रव्ये व पाणी मिळत नाहीत, कधी कधी या गाठी 1 इंच इतक्या जाडीच्या बनतात. पिकाची वाढ कमी होते, अन्नद्रव्यांची कमतरता दिसु लागते.
D) निमॅटोडची निर्मीती अवस्था:-
निमॅटोडची मादी सरासरी 90 ते 100 अंडी पुंजक्यानने घालते. यांच्यामध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार आढळतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या आखूड, जाड अवस्था नर बनतात; तर लांबट, पातळ अवस्था माद्या बनतात. नर आणि मादी पिल्लाची वाढ चार अवस्थांमध्ये पूर्ण होते.
निमॅटोड चा जीवनक्रम हा 6 अवस्थांतुन जातो, पहिली अवस्था – अंडी अवस्था, 2 ते 5 अशा नंतरच्या 4 अवस्था ह्या अविकसीत अवस्था असतात, व शेवटची 6 वी अवस्था हि परिपक्व (प्रौढ) अवस्था असते. मादी हि तिन महिन्यांपर्यंत जिवंत राहु शकते व एकावेळेस 100 पर्यंत अंडी देते.
निमॅटोडच्या वाढीसाठी 13 ते 34 डिग्रि तापमान योग्य ठरते, जास्त योग्य 29 डिग्री आहे. उन्हाळ्याच्या उबदार वातावरणात निमॅटोडच्या कित्येक जाती अंडी अवस्थेतुन परिपक्व अवस्थेत 21 ते 28 दिवसांत पोहचतात.
1) भाजीपाला वर्गातील पिकांमध्ये :- टोमॅटो, वांगी, भेंडी, मिर्ची, वाटाणा, काकडी, कलिंगड, खरबूज, कारली इ.
2) फळ पिकांमध्ये :- केळी, *डाळिंब*, पेरू,
3)नगदी पिकांमध्ये :- ऊस,भुईमूग,
4) अन्नधान्य पिकांमध्ये :- तांदुळ, गहू, तूर, भुईमूग, इत्यादी पिकांमध्ये सुत्रकृमींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो.
E) पिकांवरील परिणाम :-
निमॅटोड या जंतूंमुळे पिक निस्तेज होते, पानांचा आकार लहान होतो, पाने पिवळी पडून वाळतात व पिकाची वाढ खुंटते, तसेच फुले येण्याचा कालावधी लांबतो, प्रादुर्भाव जास्त असेल तर बरेचदा पिक वाळून जाते. प्रादुर्भावग्रस्त पीक इतर रोगांना लवकर बळी पडते.
निमॅटोड प्रथम विकर स्त्रवतात. हे विकरं पेशींचे विघटन करतात. निमॅटोड या विघटीत पदार्थांचे आपल्या सुईसारख्या तीक्ष्ण अवयवांद्वारे रस शोषण करतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडांची वाढ खुंटते व ते सुकते. सुत्रकृमींनी (निमॅटोड) इजा केल्यामुळे बुरशी व जीवाणु जन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.
F) नियंत्रणाचे उपाय:-
निमॅटोड किंवा सुत्रकृमी हे अत्यंत वेगाने वाढणारे आणि अनेक पिकांवर हल्ला करण्याची क्षमता असल्या कारणाने नियंत्रणात आणण्यास कठिण असतात. सुत्रकृमींच्या निंयत्रणासाठी जैविक नियंत्रण, रासायनिक नियंत्रण तसेच पिक फेरपालट ह्यांचा एकात्मिक वापर करणे फायदेशीर ठरते. कोणत्याही एका पध्दतीवर अवलंबुन राहुन सुत्रकृमी किंवा निमॅटोड चे पुर्ण नियंत्रण मिळणे कठिण आहे. वाढीचा वेग हा अत्यंत जास्त असल्या कारणाने, आणि चपळ जुवेनाईल अवस्थांमुळे निमॅटोडचे १०० टक्के नियंत्रण मिळवणे तसे अत्यंत कठिण आणि खर्चिक काम आहे.
G) एकात्मिक नियंत्रण:-
सुत्रकृमींच्या निंयत्रणासाठी मशागत व जैविक नियंत्रण, रासायनिक नियंत्रण तसेच पिक फेरपालट ह्यांचा एकात्मिक वापर करणे फायदेशीर ठरते.
1) मशागतीतून नियंत्रण व पिक फेरपालट:-
निमॅटोडग्रस्त जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरट करून दोन तीन महिने जमीन चांगली तापू द्यावी. जमिनीतील सूत्रकृमींच्या अवस्था उष्णतेने नष्ट होतात. त्याचबरोबर पिकांची फेरपालट ही करावी. भाजीपाला, आणि धान्य पिकांतील निमॅटोडची समस्या हि, निमॅटोड प्रती प्रतिकारक असणा-या पिकांचा पिक फेरपालट मध्ये वापर करुन काही प्रमाणात मिटवता येणे शक्य असते. मेलिडोगायनी जवानिका ह्या प्रजातीस प्रतिकारक असणा-या गाजर, मिरची, फुलकोबी, लसुण, कांदा, मुळा, गवार, मोहरी, टोमॅटो-कांदा, आणि प्रतिकारक टोमॅटो – भेंडी ह्यांचा वापर केल्यास मेलिडोगायनी जॅपोनिका ह्या प्रजातीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळते. आपल्या कडे निमॅटोड ची नेमकी कोणती जात पिकावर हल्ला करत आहे हे कळल्याशिवाय अशा प्रकारचा प्रयोग करणे हे जरा धाडसाचेच कार्य ठरेल. मेलिडोगायनी जवानिका, आणि मेलिडोगायनी ईन्कॉगिनिटा ह्या दोन्ही जाती महाराष्ट्रात आढळुन येतात. महाराष्ट्रात द्राक्ष, डाळींब, पानवेली, बटाटा, तंबाखु, चवळी आणि भेंडी ह्या पिकावर मेलिडोगायनी ईन्कॉगिनिटा जातीचा प्रादुर्भाव दिसुन येतो. तसेच मेलिडोगायनी जवानिका ह्या प्रजातीचा प्रादुर्भाव हा चवळी पिकांवर दिसुन येतो. मेलिडोगायनी अरेनारिया ह्या प्रजातीमुळे भुईमुग पिकाच्या मुळांवर गाठी तयार होतात. राहुरी कृषी विद्यापिठ, राहुरी आणि संगमनेर येथिल डाळिंब लागवडीत मेलिडोगायनी ईन्कॉगिनीटा आणि मेलिडोगायनी जवानिका ह्या दोघांचा प्रादुर्भाव दिसुन आलेला आहे.
* शेतात झेंडुच्या रोपांची लागवड केल्यास त्यामुळे देखिल निमॅटोड वर नियंत्रण मिळण्यास मदत होते. झेंडुच्या मुळांतुन स्रवणा-या अल्फा टर्थिनिल ह्या द्रव्यामुळे निमॅटोडच्या नियंत्रणात मदत मिळते असे आढळुन आले आहे. ह्या शिवाय गवार, मोहरी, आणि कांदा ह्या पिकांचा देखिल सुत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडुच्या रोपांसारखा फायदा होतो असे प्रात्यक्षिकेमध्ये आढळुन आले आहे.
2) जैविक उपाययोजना :-
सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी पॅसिलोमायसिस लिलासिनस ही बुरशी परिणामकारक आढळुन आली आहे. पॅसिलोमायसिस जैविक नियंत्रणात बुरशींच्या सोबत निंबोळी पेंड, करंज पेंड यांचा एकत्रीत केलेला वापर फायदेशीर ठरतो. निंबोळी पेंड व करंज पेंड हेक्टरी दीड ते दोन टन याप्रमाणे जमिनीत मिसळल्यास प्रभावी नियंत्रण होते.
ट्रायकोडर्मा हरजॅनियमच्या वापरामुळे देखिल मेलिडोगायनी जवानिका ह्या निमॅटोडच्या प्रजातीवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. ट्रायकोडर्माच्या चिटिनेझ ह्या एन्झाईममुळे निमॅटोडच्या वाढीवर नियंत्रण मिळते, तसेच पिकाची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यामुळे देखिल नियंत्रण मिळण्यात मदत मिळते.
3) रासायनिक नियंत्रण:-
निमॅटोड नियंत्रणात जमिनीत कार्बन डायसल्फाईडचा वापर धुरीकरण करण्यासाठी केला जातो. लागवडीपुर्वी कार्बन डायसल्फाईडचा वापर धुरीकरण करुन निमॅटोडचे नियंत्रण केले जाते.
पिकाच्या वाढीसाठी पोषक ठरतील अशा विविध प्रकारच्या सुक्ष्मजीवांच्या वापरातुन पिकास योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळाल्याने तसेच पिकाची स्वतःची नैसर्गिक अशी प्रतिकारकशक्ती वाढुन देखिल निमॅटोड नियंत्रणात अप्रत्यक्षरित्या फायदा होतो…!!!
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
*शेतकरी हितार्थ*
—-
*!! अन्नदाता सुखी भव: !!*
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
*”Agriculture is my Love, Passion, Culture & Life”*
*विचार बदला! जीवन बदलेल!!*
*Mr.SATISH BHOSALE*