Home महापुरुषांचे विचारविश्व महात्मा जोतीराव फुले यांचे स्वातंत्र्यविषयक विचार

महात्मा जोतीराव फुले यांचे स्वातंत्र्यविषयक विचार

0
महात्मा जोतीराव फुले यांचे स्वातंत्र्यविषयक विचार

महात्मा जोतीराव फुले यांचे स्वातंत्र्यविषयक विचार

डॉ.शिंदे आर.डी

   ‘स्वातंत्र्य’ ही आधुनिक जगातील एक महत्त्वपूर्ण राजकीय संकल्पना असून स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी जगात अनेक उलथापालथी घडून आल्या आहेत. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांतीच्या पाठीमागची मुख्य प्रेरणा ही ‘स्वातंत्र्या’ची संकल्पनाच होती हे ऐतिहासिक सत्य आहे. ‘स्वातंत्र्य’ या शब्दांमध्ये अशी जादू आहे की, ज्यामुळे मनुष्याला सतत त्याचे आकर्षण वाटते आणि त्याच्या प्राप्तीसाठी मनुष्य आपले सर्वस्व समर्पित करायला नेहमी तत्पर असतो. एका लेखकाने विनोदाने असे म्हटले आहे की, प्रेमामध्ये जसा दररोज टवटवीतपणा असतो अगदी तसेच स्वातंत्र्यातही दररोज टवटवीतपणा असतो. म्हणूनच  मनुष्य प्राण्याची ‘स्वातंत्र्या’संबंधीची उत्कट अभिलाषा कधीच आटत नाही व त्याबाबतचा पाठपुरावाही कधी थांबत नाही. याचे कारण असे की, मनुष्य प्राण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्वातंत्र्य’ असणे आवश्यक असते. व्यक्ती गरीब असो की श्रीमंत, शिक्षित असो की अशिक्षित, सुधारलेली असो की मागासलेली अशा सर्वांनाच आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी स्वातंत्र्य हवेहवेसे वाटते.स्वातंत्र्याशिवाय व्यक्ती विकासाची संकल्पनाच पूर्णत्वाला जात नाही. स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे मनुष्यत्वाचा अभाव! त्याला वरदान म्हणावे की शाप हे ‘स्वातंत्र्य’ आपल्याला हवेच आहे. 

   मूलतः स्वातंत्र्य ही एक भावना असून ती सर्व मानवांच्या, मानवी समूहांच्या हृदयात सतत वास करीत असते. स्वातंत्र्य हे या अर्थाने सर्वव्यापी (Universal) आहे असे म्हणता येईल. त्याला स्थळ, काळ, परिस्थिती याचे बंधन नसते. राजसत्ता असो की महाजनसत्ता, निरंकुशसत्ता असो की लोकसत्ता त्यात राहणाऱ्या सर्वांनाच स्वातंत्र्य मिळावे, स्वतंत्र जीवन जगता यावे अशी उत्कट इच्छा असते. स्वातंत्र्याच्या वातावरणातच प्रत्येक मनुष्याला आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांचा उपभोग घेता येतो. म्हणूनच आधुनिक राष्ट्र राज्याच्या अधिकारव्यवस्थेत ‘स्वातंत्र्या’च्या संकल्पनेस प्रमुख स्थान देण्यात आले आहे. विशेषतः लोकसत्ताक राज्य निर्माण झाल्यानंतर ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचे मूल्य अधिकच वाढले आहे.

 स्वातंत्र्याचा अर्थ आणि व्याख्या :- 

मराठीत ‘स्वातंत्र्य’ हा शब्द लिबर्टी व फ्रीडम या दोन्ही इंग्रजी शब्दांसाठी वापरण्यात येतो. काही लेखक ‘लिबर्टी’ (Liberty) साठी’बंधनमुक्तता’ आणि ‘फ्रीडम’ (Freedom) साठी ‘स्वातंत्र्य’ असे शब्द वापरतात. पण हा फरक सर्वमान्य नाही, आणि दुसरे असे की, मूळ इंग्रजी संज्ञामधील  अर्थभिन्नत्वाबद्दलही इंग्रजीत लिहिणाऱ्या अभ्यासकांत एकमत नाही. ‘लिबर्टी’ हा शब्दही इतक्या अनेक अर्थाने वापरला जातो की त्याची अर्थनिश्चिती अवघड होऊन बसते.  सबब आजमितीपर्यंत राज्यशास्त्रज्ञांमध्ये स्वातंत्र्याच्या व्याख्येविषयी एकवाक्यता होऊ शकलेली नाही. तरीही त्यातील मानुषी आशय लक्षात घेऊन अनेकांनी स्वातंत्र्याची व्याख्या निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे.  सामाजिकशास्त्राच्या ज्ञानकोशात स्वातंत्र्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.

    ” व्यक्तीने वा समूहाने स्वतःच्या स्वत्वाचे दृढकथन करणे म्हणजे स्वातंत्र्य होय.”

  रामसे मूरच्या मते ” व्यक्तींना किंवा राष्ट्र, चर्च, कामगार संघटना यांसारख्या नैसर्गिक व समयस्फूर्त समूहांना आपल्या विचारांचे चिंतन, आविष्करण व त्यानुसार कृती करण्याचा, आपल्या अंगाच्या गुणांचा आपल्या पद्धतीने कायद्याच्या संरक्षणाखाली उपयोग करून घेण्याचा सुरक्षित अधिकार स्वातंत्र्यातून मिळतो. अट एकच की त्यांनी इतरांच्या अशाच अधिकाऱांना बाधा पोचवता कामा नये.”

 प्रो. लास्कीच्या मते “स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला संपूर्ण विकास करण्यास समान संधी मिळण्याची परिस्थिती निर्माण होणे होय.” ( “Liberty means the eager maintenance of that atmosphere in which men in have the opportunity to be their best servies.”)

     मॅकेनीच्या मतानुसार “स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनांचा अभाव नसून अनुचित बंधनाऐवजी उचित बंधनाची व्यवस्था होय.”

स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता जॉन स्टुअर्ट मिल यांनी आपले स्वातंत्र्यसंबंधीचे विचार ‘On  Liberty’ या ग्रंथात व्यक्त केले आहेत. त्याच्या मते,” व्यक्तीला राज्यकर्त्यांपासून आणि समाजाच्या हुकूमशाहीपासून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.”

      वरील व्याख्यांच्या विवेचनातील सार लक्षात घेता असे लक्षात येते की, स्वातंत्र्याचा आशय व्यक्तीपरत्वे आणि कालपरत्वे बदलत आलेला आढळतो. आज आपण ज्या अर्थाने स्वातंत्र्याची संज्ञा वापरतो तो अर्थ ग्रीक नगरराज्यांच्या काळात अज्ञातच होता. कारण व्यक्तींना राज्यसंस्थेविरुद्धही अधिकार असू शकतात हे त्याकाळी कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. राज्य व समाज या संज्ञा त्याकाळात समानार्थी वापरल्या जात असत. पण आज त्यात बदल झालेला दिसून येतो. आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी राज्य व समाज यांच्यात फोड केलेली आहेच; शिवाय व्यक्ती व समाज, व्यक्ती व राज्य यांच्यातही फोड करून स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. त्यामुळे दृश्य स्वरूपात स्वातंत्र्याचे नकारात्मक स्वातंत्र्य व सकारात्मक स्वातंत्र्य असे दोन मुख्य प्रकार आढळून येतात. त्यापैकी नकारात्मक स्वातंत्र्याचा आशय हा बंधनाचा अभाव असा एकांगी,आत्मलक्षी स्वरूपाचा आहे. म्हणूनच नकारात्मक स्वातंत्र्य हे विपर्यस्त समजले जाते. याउलट सकारात्मक स्वातंत्र्याचा आशय हा सर्वांगी व समष्टीलक्षी स्वरूपाचा असल्यामुळे सकारात्मक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे,असा विचार सर्वत्र रूढ व सर्वमान्य झाला आहे. आधुनिक लोकशाहीच्या काळात तर स्वातंत्र्याला एकंदर सर्व मानवी मूल्य व अधिकारांचा आधारस्तंभ मानले जाते.

 

महात्मा जोतीराव फुले यांचे स्वातंत्र्यविषयक विचार :-  

         महात्मा जोतीराव फुले हे काही राजकीय विचारवंत नव्हते. राजकीय विचारवंत असल्याचा त्यांनी कधी दावाही केला नाही. दुसरी बाब अशी की,  महात्मा जोतीराव फुले यांनी जॉन स्टुअर्ट मिल, प्रो.एच. जे. लास्की, इसाय बर्लिन वगैरे राजकीय विचारवंताप्रमाणे जाणीवपूर्वक सूत्रबद्ध पद्धतीने स्वातंत्र्यविषयक कोणताही सिद्धांत मांडला नाही. किंबहुना तार्किकदृष्ट्या त्यांनी आपले स्वातंत्र्यविषयक विचार एका विशिष्ट ग्रंथात शब्दबद्धही केले नाहीत. त्यांचे स्वातंत्र्यविषयक विचार तत्कालीन समाज व राजकीय व्यवस्थेच्या चिंतनातून, विविध ग्रंथातील लेखनातून आणि भाषणातून सार रूपाने व्यक्त झालेले आहेत. तरीही त्यांच्या विचारात एक प्रकारे तात्विक सुसंगती दिसून येते. त्यासंबंधीची विस्तृत चर्चा पुढीलप्रमाणे करता येईल.

     वास्तविक पाहता महात्मा जोतीराव फुले हे एक विजिगिषु (लढाऊ) वृत्तीचे सामाजिक कार्यकर्ते             (Social Activist) होते. त्यामुळे त्यांनी या देशातील परंपरेपासून चालत आलेल्या ब्राह्मणी एकाधिकारशाहीच्या गुलामीत खितपत पडलेल्या स्त्रीशुद्रातिशूद्रांना बाहेर काढून त्यांना स्वातंत्र्य बहाल करणे हे आपल्या कार्यसिद्धीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी जे तत्त्वज्ञान विकसित केले त्याला एकंदरीत सत्यशोधक तत्वज्ञान असे म्हटले जाते. सत्यशोधक तत्त्वज्ञानाची मदार निखळ बुद्धीप्रामाण्यवाद आणि विज्ञानवादावर अधिष्ठित आहे. त्यामुळे सत्यशोधक तत्त्वज्ञान समाजातील सर्वच प्रकारच्या नियतिवादाला विरोध करते. खुलेपणा व स्वातंत्र्य याला सर्वोच्च स्थान देऊन त्या आधारे एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणे हे सत्यशोधक तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट आहे. गुलामगिरी मग ती कोणत्याही प्रकारची वा स्वरूपाची असो ती अमानवीयच असते, असे जोतीरावांनी सत्यशोधक तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जगाला ठणकावून सांगितले आहे. आपल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकातील इंग्रजी प्रस्तावनेचा प्रारंभच जोतीरावांनी होमर यांच्या सुप्रसिद्ध वचनाने केला आहे.”The day that reduces a man to slavery takes from that half of his virtues.” याचा अर्थ असा की, ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्याच दिवशी त्याचे अर्धे सदगुण हिरावून घेतले जातात. गुलामी किंवा दास्यत्व किती वाईट आहे, हे या वचनावरून स्पष्ट होते. ‘गुलामाला गुलामीची जाणीव झाली की तो बंड करून उठेल’ या उद्देशानेच महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकातील प्रस्तावनेत होमर यांचे हे सुप्रसिद्ध वचन उद्धृत केले आहे. दुसरी बाब अशी की, महात्मा जोतीराव फुले यांनी ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ अमेरिकेतील  गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या सदाचारी लोकांना ( निग्रोंना ) अर्पण करून अमेरिकन सदाचारी लोकांचा कित्ता आपल्या देश बांधवांनी आपल्या देशातील शूद्र बांधवांस ब्राह्मण लोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात घ्यावा असे आवाहनही केले आहे. यावरून स्वातंत्र्याची ग्वाही देणारा व त्यासाठी आग्रह धरणारा ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ अत्यंत मोलाचा आहे. एका अर्थाने तो भारतीय स्त्रीशूद्रातिशूद्रांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाच (Declaration of Liberty)आहे.

     महात्मा जोतीराव फुले यांच्या मते स्वातंत्र्य ही मानवाची मूलभूत अशी नैसर्गिक प्रेरणा आहे. ही नैसर्गिक प्रेरणाच त्याला स्वत्वातील सूप्त अशा सर्जनशील शक्तीला आविष्कृत करण्यास प्रेरित करीत असते. तथापि त्यासाठी खुल्या वातावरणाची आवश्यकता असते. परंतु भारतात त्याचीच वाणवा होती हे लक्षात घेऊन जोतीरावांनी स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी क्रांतीची आवश्यकता प्रतिपादन केली. या संदर्भात ते म्हणतात की, “मनुष्य स्वतंत्र असल्यापासून तो आपले, सर्व मनुष्यमात्रांस जे सर्वसाधारण हक्क, सर्व जगाचा जो नियंता व सर्वसाक्षी परमेश्वरानें त्याला दिलेले असून केवळ स्वहिताकडेच ज्यांचे लक्ष्य, असे कृत्रिमी लोकांनी लपवून ठेविलें, तर त्यांपासून मागून घेण्यास कधी मागें सरणार नाही व त्यांचे हक्क त्यास मिळाले असतां त्यास सुख होतें. ज्याची त्यांस स्वतंत्रता देऊन त्यास जुलमी लोकांचे अन्यायी जुलमांपासून सोडवून सुखी करणें हाच काय तो, त्यांचे ( क्रांतिकारकांचे ) धाडसाचे ( जीवावरचे व धोक्याचे ) कार्य आहे.” असे असतानाही महात्मा जोतीराव फुले यांनी हे काम आपल्या शिरावर घेतले यातून त्यांचा क्रांतिकारकपणा सिद्ध होतो. 

     ‘मुक्तमानव’ हे महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनाचे स्वप्न होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी १९ व्या शतकातील सर्वार्थाने बंदिस्त अशा भारतीय समाजव्यवस्थेत शिक्षणाचे सार्वत्रिकरण, विधवा पुनर्विवाहास चालना, सती तसेच बहुपत्नीत्व प्रथेला विरोध, सत्यशोधक विवाह पद्धत अशा काही समाजक्रांतिकारक कार्याद्वारे स्वातंत्र्याच्या क्षेत्रात एक फार मोठी आघाडी उघडली होती. महात्मा फुले यांच्या मते, निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला जन्मतःच स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या ठायी नैतिक व कायदेशीरदृष्ट्या स्वातंत्र्य असणे अभिप्रेत आहे. याविषयी ते म्हणतात की,”आपणा सर्वांच्या निर्मिकानें एकंदर सर्व प्राणिमात्रांस उत्पन्न करतेवेळीं मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी निर्माण केला आहे आणि त्यास आपापसांत सारखे हक्काचा उपभोग घेण्यास समर्थ केला आहे आणि याच कारणास्तव प्रत्येक मनुष्य गावांतील व मुलखांतील अधिकाराच्या जागा चालविण्याचा अधिकारी आहे.” यावरून महात्मा फुले यांना मानवी स्वातंत्र्याप्रति किती कळकळ होती, हे स्पष्ट होते.

       मानवी जीवनातील स्वातंत्र्याचे स्थान आणि महत्त्व लक्षात घेता प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळातील, निसर्गशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ मानवाला अनुक्रमे निसर्ग व समाजसंस्था यांपासून जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दृष्टीने न्यूटन,गॅलिलिओ,डार्विन, आईन्स्टाईन,प्लेटो,ॲरिस्टॉटल यांच्यापासून ते जॉन स्टुअर्ट मिल, हेरॉल्ड लास्की, टी. एच. ग्रीन, एल.टी. हॉबहाऊस, बार्कर, बर्ट्रान्ड रसेल यांच्यापर्यंत सर्वचजण मानवी स्वातंत्र्याला अनुकूल अशी समाजसंस्था निर्माण करण्यात गढून गेलेले आहेत.यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. इतिहासाने हे सिद्ध केले आहे की,  ‘मानवी इतिहास हा एक प्रकारे स्वातंत्र्याची कहाणीच आहे.’ (Human history is a story of liberty.) भारतीय वंशातील थोर समाजक्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले यांनीही आपल्या जीवितकार्याचा प्रवास स्वातंत्र्याच्याच दिशेने सुरू केला होता.   आपल्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथातील वैचारिक मांडणीत त्यांनी ज्या आर्य- अनार्यांच्या सत्ता संघर्षाचा पैलू उजेडात आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याच्या मुळाशी ‘स्वातंत्र्यासाठी चाललेला संघर्ष’ हीच मुख्य प्रेरणा होती. इतिहासातील काही घडामोडींच्या आधारे जोतीरावांनी असे विश्लेषण मांडले आहे की, “बळीस्थानांत (हिंदुस्थानांत) इराणी आर्यभटांच्या आक्रमणापूर्वी येथील क्षत्रिय लोकांचा राज्यकारभार बळीराजाच्या तत्त्वाप्रमाणे (प्रजासत्तात्मक) पद्धतीनेच चालत होता. परंतु आर्यभटांच्या आक्रमणानंतर त्यांचे प्रजासत्ताक राज्य मोडकळीस आले व आर्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली. त्यांची ही एकाधिकारशाही मोडीत काढून येथील मूळच्या क्षत्रियांना स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी निर्मिकाने आरबस्थानातील हजरत महंमद पैगंबराचे अनुयायी या देशात पाठविले. परंतु तेही पुढे भोगविलासी बनल्यामुळे महाकुशल इंग्रजांनी मुसलमानांच्या पगड्यांवर घन मारून हा देश सहज आपल्या बगलेंत मारला.” हा पूर्वइतिहास सांगण्याच्या पाठीमागे जोतीरावांचा हेतू येथील मूळ क्षत्रियांना पराधीनत्वाची व सत्तेच्या अभावी होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे हाच होता. या संदर्भात एका अखंडात पुढे ते असेही म्हणतात की,

“तुम्ही मूळचे क्षेत्रपती, झाली कोण गती, तालुनी पाही ।।

अतीरथी बुडविले किती, नाहीं ज्या गती, सत्तेच्या पायीं।।

पराधीनत्व असे वाईट, मुलांचे नीट, दिसत नाहीं ।।”१०

    या दु:स्थितीचा गुलामांनी गंभीरपणे विचार करावा व स्वातंत्र्यासाठी बंड करून उठावे असे आवाहनही जोतीरावांनी उपर्युक्त अखंडातून येथील क्षत्रियांना केले आहे. यावरून जोतीरावांना स्वातंत्र्याची किती आस होती हे स्पष्ट होते. मानवी जीवनातील स्वातंत्र्याचे महत्त्व विशद करताना जोतीराव म्हणतात की,”मनुष्याला स्वातंत्र्य असणे ही फार मोठी जरुरीची गोष्ट आहे व ती ज्यांच्याकडे नाही त्यांना ती मिळून देण्यास झटणे हे प्रत्येक सज्जनाचे कर्तव्य आहे. ( मनुष्य हा शब्द जोतीरावांनी या ठिकाणी सर्व स्त्री-पुरुष या अर्थाने वापरला आहे ) मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हा मनांत आलेले विचार बोलून अथवा लिहून स्पष्ट रीतीने इतर लोकांस दाखवितो. परंतु मनुष्यास मोठ्या महत्त्वाचे आणि लोकांना हितावह असे आपले विचार किंवा मतें स्वातंत्र्याच्या अभावी दुसऱ्यास कळविता येत नाहींत व म्हणून काही काळाने ते लयास जातात.”११ या ठिकाणी जोतीराव फुले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जोरकसपणे समर्थन करताना दिसतात. जोतीरावांच्या मते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्ती विकासाकरिता अत्यंत आवश्यक असते. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय सत्याचा शोध लागत नाही. कारण व्यक्तीचे मत सत्य-असत्य, अर्धसत्य, अर्धअसत्य यापैकी एका प्रकारचे असते. सत्य विचार जर दडवून टाकण्याचा प्रयत्न केला तर तो संपूर्ण मानवजातीला हानिकारक ठरतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, सत्याच्याही अनेक बाजू किंवा रुपे असतात. ज्या एक दुसऱ्याच्या विरोधी नसतात, परंतु एकमेकांना पूरक असतात. आपलेच म्हणणे सत्य आहे असे समजणे संकुचित दृष्टीचे द्योतक आहे, आपल्यालाच फक्त सत्य माहित आहे असा दावा निरर्थक किंवा पोकळ स्वरूपाचा असतो. अशा स्थितीत सर्वांना जर विचार आणि भाषण स्वातंत्र्य असले तर सत्य काय आहे हे निश्चित करता येईल. विचारांच्या देवाण-घेवाणीतून सत्य कोणते हे समजू शकेल व असत्याचा त्याग आणि निरनिराळ्या व्यक्तींच्या विचारातील सत्यांश एकत्रित केल्यास अंतिम सत्याचे स्वरूप निश्चित करता येईल. श्रेष्ठतम विचारच मानवी कल्याणाकरिता उपयोगी असतात. म्हणून अभिव्यक्त होण्याची प्रत्येकाला संधी दिली गेली पाहिजे नव्हे स्वतंत्र विचार व्यक्त करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. महात्मा फुले यांचे हे स्वातंत्र्यविषयक विचार आणि स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता जॉन स्टुअर्ट मिल यांचे स्वातंत्र्यविषयक विचार यांच्यात या ठिकाणी साधर्म्य असल्याचे आढळून येते. जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो की,”If all mankind minus one were of one opinions mankind would be no more justified in silencing that one person than he, if he had the power, would be justified in silencing mankind “१२ मिल कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीला त्याचे विचार प्रकट करण्यास रोखणे समाजाकरिता हानिकारक आहे असे म्हणतो. मिलच्या मते, मानवी इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येईल की, सत्ताधारी वर्गाने ज्या व्यक्तीचा विचार दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच व्यक्तीने नवीन विचारांना जन्म दिला आहे. मिल या संदर्भात सॉक्रेटिस आणि येशू ख्रिस्तांचे उदाहरण जगासमोर ठेवतो. सत्ताधारी वर्गाने सॉक्रेटिस आणि येशू ख्रिस्तांच्या विचारांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. एवढे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी या व्यक्तींनाच नष्ट केले. परंतु मानवतेच्या इतिहासाने हे सिद्ध करून दिले की, या व्यक्तींचे विचार सत्य, योग्य आणि विवेक पूर्ण होते उलट त्या वेळच्या सत्ताधारी वर्गाचे विचार असत्य होते. तो वर्ग नीती भ्रष्ट होता. समाजाने त्या व्यक्तींच्या विचारांची अवहेलना करून एकंदर संपूर्ण मानवजातीचा अपमानच केला आहे. भारतातही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. चार्वाक, बुद्ध, कर्ण ,एकलव्य वगैरे प्रतिभावंतांचा ब्राह्मणशाहीने अमानुष छळ करून भारतीय समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर ठेवले होते. या पार्श्वभूमीवर जॉन स्टुअर्ट मिल यांच्या समकालीन असलेल्या महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय उपखंडात प्रथमच स्वीकारलेल्या स्वातंत्र्यविषयक भूमिकेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते.

    महात्मा जोतीराव फुले यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून ओळखला जातो. त्यात त्यांनी ‘सत्यवर्तन करणाऱ्या विषयीचे जे काही नियम सांगितले आहेत; त्यातून त्यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारांचे तेजोवलय पूर्णांशाने प्रकट झाल्याचे जाणवते. त्यातील काही वानगीदाखल नियम येथे उद्धृत केले आहेत.

 नियम क्रमांक १. 

आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यांने एकंदर सर्व प्राणिमात्रांस उत्पन्न केले. त्यापैकी स्त्री-पुरुष हे उभयता जन्मतःच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र केले आहेत, असें कबूल करणारें त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

 नियम क्रमांक ६. 

आपल्या सर्वांच्या निर्मिकानें एकंदर सर्व स्त्री-पुरुषांस सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहेत. त्यांतून एखादा मानव अथवा कांही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करूं शकत नाहीं व त्याप्रमाणे जबरी न करणाराही, त्यांस सत्यवर्तन करणारें म्हणावेत.

 नियम क्रमांक ७. 

आपल्या सर्वांच्या निर्माण कर्त्यांने एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. ज्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याहि तऱ्हेचें नुकसान करिता येत नाहीं, अथवा जे कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवाचे हक्क समजून इतरांस पीडा देत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

 नियम क्रमांक १०. 

आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्यांच्या व्यवस्थेवरून एकंदर जे सर्व स्त्री-पुरुष दुसऱ्याच्या धर्मासंबंधी मतांवरून अथवा राजकीय संबंधीं मतांवरून त्यांस कोणत्याहि प्रकारे नीच मानून त्यांचा छळ करीत नाहींत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.

     उपर्युक्त नियमाद्वारे जोतीरावांनी नैसर्गिक स्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि वरील सर्व स्वातंत्र्याचा पाया असलेल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा विचार करत व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विस्तार सामुदायिक स्वातंत्र्यापर्यंत केला आहे. सर्वांच्या स्वातंत्र्याचा विचार करत असताना स्वातंत्र्याची ‘समान वाटणी’ व ‘समान लाभ’ वितरित करणे ही या नियमांची मूळ प्रेरणा आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या मते स्वातंत्र्याची निर्मिती ही अधिकारापासून होते.अधिकाराशिवाय स्वातंत्र्याची कल्पनाच करणे व्यर्थ आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनाचा अभाव नसून व्यक्तीविकासाकरिता आवश्यक अशा वातावरणाची निर्मिती करणे हे आहे. अशा वातावरणाची निर्मिती करताना उचित बंधनाची व्यवस्था केल्याने स्वातंत्र्याचा अजिबात संकोच होत नाही. महात्मा जोतीराव फुले यांची स्वातंत्र्यासंबंधीची हि भूमिका सकारात्मक स्वातंत्र्याच्या पैलूला महत्त्व देते. जोतीराव फुले हे केवळ सकारात्मक स्वातंत्र्याचा आशय व्यक्त करूनच थांबत नाहीत. तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पर्यायी सामाजिक संस्थेची  (सत्यशोधक समाजाची) स्थापना करून त्याद्वारे स्वातंत्र्यापासून वंचित असलेल्या अनेक सामाजिक घटकांना स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षणाची समान संधी, सत्तेचे विकेंद्रीकरण, मानवी विकासाचे शाश्वत प्रारूप, धर्मनिरपेक्षता आणि पर्यावरणीय विकास अशा पंचसूत्री कृतिकार्यक्रमाची ( Action Plan ) आखणी करून त्याच्या अंमलबजावणीसाठी मानवी प्रयत्नांची संघटनात्मक साखळी उभी करतात. महात्मा फुले यांनी केलेल्या या संघटीत प्रयत्नामुळेच देशातील वंचित-उपेक्षित समाज घटकांना ‘मोकळा श्वास’ घेण्याचा अवकाश मिळाला हे इतिहास सिद्ध आहे. त्यामुळेच महात्मा फुले यांच्या प्रति अशा वंचित-उपेक्षित (स्त्रीशूद्रातिशूद्र ) समाज घटकांच्या मनामनांत अपार कृतज्ञतेची भावना दिसून येते.

 https://janvicharnews.com/280/https:/ गांधीचे योगदान

      ‘मुक्तमानव’ हे महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवित कार्याचे अंतिम ध्येय होते. त्यामुळेच त्यांनी आरंभिलेल्या मानवमुक्ती लढ्याला गती देण्यासाठी जे सत्यशोधक तत्त्वज्ञान विकसित केले. त्या तत्त्वज्ञानात त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याचा आशय कुठेच फिका पडू दिला नाही. तत्कालीन प्रस्थापित समाजव्यवस्थेबद्दलच्या आत्यंतिक असमाधानाच्या पार्श्वभूमीवर महात्मा जोतीराव फुले यांनी स्वातंत्र्यासाठी जो काही संघर्ष छेडला होता तो आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शकाचीच भूमिका बजावतो आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारांची परिणामकारकता व संभवरार्भता ( Potentiality) एवढी जबरदस्त आहे की, प्रत्येक नवीन युगात तिचे नवोन्मेष नवीन क्रांतीचे मार्गदर्शन करू शकतात. क्रांती ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. अशा क्रांत्यांची साखळी जन्माला घालण्याची शक्ती महात्मा जोतीराव फुले यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारात दडलेली आहे हे ऐतिहासिक सत्य आज उजागर झाले आहे. त्यामुळे वर्तमान पिढीतील सामाजिक व राजकीय कुटप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अनपेक्षितपणे सर्व अभ्यासक व संशोधकांचे लक्ष ‘फुलेवादा’कडे वळले आहे. विशेष हे की, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ‘मानवी अधिकारांच्या जाहीरनाम्यात’ तसेच ‘भारतीय संविधानात’ महात्मा जोतीराव फुले यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारांचे प्रतिबिंब आढळून येते, ही बाब मानवी राजकीय जीवनातील महात्मा फुले यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारविश्वाचे महत्व अधोरेखांकित करणारी आहे.