Home राजकीय घडामोडी शिवसेना,गुंडगिरी कडून गुन्हेगारी कडे!

शिवसेना,गुंडगिरी कडून गुन्हेगारी कडे!

0
शिवसेना,गुंडगिरी कडून गुन्हेगारी कडे!

शिवराम पाटील

  वास्तविक हकिकत आहे.कल्पनाविलास नाही.सडेतोड आहे.अनुनय मुळीच नाही.माझ्या गावातील एका शेतकरी ला दोन मुले होती.मोठा मुलगा शाळा शिकलाच नाही.त्याला उजेडात बसून अक्षरे वाचण्याऐवजी अंधारात जाऊन कपाशी वेचणे जास्त आवडायचे.रात्री बेरात्री कोणाच्याही शेतात जाऊन कपाशी वेचणे आणि दुकानावर विकून पैसा मिळवणे,खाऊपिऊची खरेदी करणे सवयीचे झाले.या पापात आईबापाला ही सहभागी करून घेण्यासाठी घरात तेलमीठ,गुडसाखर आणून चंगळमंगळ करणे अवलंबले.त्यामुळे आईबाबा खुष तर होत शिवाय कौतुक ही करीत.

 लहान मुलगा ज्याला उजेडात अक्षरे गिरवणे,वाचन करणे, शिक्षण करणे आवडत असे.त्यावर ज्ञानाचा परिणाम झाला.कष्ट आणि चोरीतील फरक कळू लागला.भाऊच्या चोरीबाबत वडिलांकडे तक्रार केली.तर वडिलांनी काठी मारून फेकली.पण चोरीला विरोध केला नाही.खाण्याचे व्यसन आणि चोरीची सवय लागल्यामुळे पुढे पुढे तर घरातीलच पैसे, दागिने चोरले.तेंव्हा बापाला खटकले.हा तर सराईत चोर बनला आहे,आता तर आपल्याच घरातील पैसे चोरू लागला.बापाला राग आला.त्याला घरातून हाकलून दिले.बोंबलू लागला कि माझा मुलगा गद्दार निघाला.आता काय उपयोग?

   बाळासाहेब ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वलय,प्रतिमा वापरून शिवसेना बनवली.पण यात साव कमी आणि चोर जास्त भरती केले.जरी ते गरीब असले तरी हाताळ होते.कोणी भंगार चोरणारा,कोणी कोंबडी चोरणारा,कोणी चोरून दारू विकणारा,कोणी रेती चोरणारा,कोणी तर शेतकऱ्यांचे ट्रैक्कर चोरुन रेती चोरणारा.महाराष्ट्रातील इतर चोरांच्या बाबतीत ऐकून किंवा वाचून माहिती झाली पण आम्ही जळगाव चे लोकांनी गुलाबराव चे प्रताप जवळून पाहिले आहेत.अंगावर भगवा घातला आणि कपाळावर गुंठाभर टिळा लावला तरीही हे पाप लपत नाही.हाणामारी,चाकूसुरी, गुंडगिरी, हेराफेरी जवळून पाहिली आहे.कदाचित बाळ ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना हे ज्ञात असलेच पाहिजे.संजय राऊत यांनासुद्धा.तरीही या माणसाला कार्यकर्ता,उपनेता,तोफ, आमदार, मंत्री, पालकमंत्री नियुक्ती दिली.आम्ही ठाकरेंकडे जसजशी तक्रार करीत होतो,तसतसे या माणसाला पदोन्नती देत होते.हे आश्चर्य!
  
सेकंड युती सरकारच्या काळात  गुलाबरावला खूप उशीरा  मंत्री बनवले.मला नाही वाटत फुकट बनवले असेल.पैशांची जमवाजमव पाहाता,तशीच शक्यता जास्त आहे.घास तोंडाजवळ नेला कि तोंड आपोआप उघडते.महाआघाडी सरकार बनवले तेंव्हा तर मंत्री नव्हे चक्क पालकमंत्री बनवले.ठाकरे साहेब,याच्यातील सत्य आम्हा जनतेला सांगितले पाहिजे,कळले पाहिले.याच पालकमंत्री ने कोरोनाकाळात औषधी व यंत्रसामुग्री चा निधी वरचेवर उडवला.जशी पहिली धारेची दारू बोटावरून उडते.याबाबतची इत्यंभूत, तंतोतंत माहिती आम्ही अजितदादा पवार, राजेश टोपे,उन्मेष पाटील,उद्धव ठाकरे, एकनाथ खडसे यांना दिली.पण एकानेही हूं कि चूं केले नाही.उन्मेष पाटील, गिरीश महाजन, सुरेश भोळे,शिरीष चौधरी,रक्षा खडसे, अनिल पाटील, किशोर पाटील,मंगेश चव्हाण हे तर डीपीडीसीचे सदस्य आहेत.यांची या अपहारावर सही आहे.पैकी फक्त चिमणराव पाटील यांनी या अपहार बाबत विधानसभेत आक्षेप नोंदवला.तेंव्हा हेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर आसनस्थ होते.तर अपेक्षा होती कि, ताबडतोब कारवाई करायला हवी होती.ठाकरे साहेब,का नाही केली?याचीही माहिती आम्ही जनतेला सांगणे आवश्यक आहेच.कारण तुम्हाला आमचे मत हवे आहे ना! तर मग विश्वास तर बसला पाहिजे, तुमच्यावर.तुम्ही किती खरे,किती खोटे,ते आम्हाला कळले पाहिजे ना! असे कसे? तुम्ही अंधारात परस्पर चोरांशी संगनमत कराल,चोराला मंत्री बनवाल,आणि तो तुम्हाला सोडून गेला तर पाचोरा येऊन रडत बसाल, आम्ही तुमचे सान्त्वन करू.इतके भोळे भाबळे मतदार कमी आहेत.ज्या आमदाराचे आडनांव भोळे आहे,तो सुद्धा भोळा राहिला नाही.तरीही तो चूप होता.का? कोणी दही खा.कोणी मही खा.कोणी लोणी खा.कोणी गोणी भरा.असाच कॉमन मिनीमम प्रोग्राम चालू होता.आजही चालू आहे.

  कांग्रेस चा वारसा सांगणारे शिरीष चौधरी येथे चूप का?भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन येथे चूप का?कधीकाळी पोलीस असणारे किशोर पाटील येथे चूप का?आम्ही निवडून दिलेले सुरेश भोळे येथे चूप का?२५९१ प्रेताच्या टाळूंवरचे लोणी खाणारा गुलाबराव पालकमंत्री का? हा तर आमचा कॉमन मॅन चा सवाल आहे.ही तर अनैतिकतेची मोठी कमाल आहे.आमची खात्री झाली आहे कि , गुलाबराव एकटा चोर नाही. जळगाव जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि खासदार यांच्या ओठाला प्रेतांच्या टाळूवरचे लोणी लागलेले आहे. अजून दिसत आहे.कोणाच्या दातात, कोणाच्या मिशीत,कोणाच्या दाढीत, कोणाच्या नाकात,कोणाच्या बोटात,कोणाच्या ओठात  ते चिकटलेले आहे.

  एकनाथ शिंदेंनी म्हणे ठाकरेंशी गद्दारी केली.ठाकरे साहेब,हे काही नवीन आहे का? वडिलांनी आणि तुम्ही सुद्धा अशीच निवडक माणसे सोबतीला घेतली असतील तर ते काय किर्तन ,भजन करणार का?ते सवयीप्रमाणेच चोरी,गद्दारी करणारच.एकनाथ शिंदेंनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही शिंदेंना जाऊन भेटलो.वाटले होते कि,हा माणूस साताऱ्याचा मराठा आहे.थोढेतरी छत्रपतींचे संस्कार असतील.कपाळावर मोठा टिळा आहे.धार्मिक प्रवृत्ती चा असू शकतो.बायको पोरं नातरं आहेत.कौटुंबिक चौकटीतील असू शकतो.सोबत देवेंद्र फडणवीस आहेत तर गुण नाही  वाण तर लागू शकतो.म्हणून सांगितले कि,या गुलाबराव ला मंत्री पद देऊ नका.यांनी कोरोनाकाळात अपहार केला आहे.म्हणून जळगाव जिल्ह्यातील २५९१माणसे तडफडून मेली आहेत.शिंदेंनी ऐकून तर घेतलेच पण निर्लज्जपणे उत्तर दिले कि,आमच्याकडे असा एकही माणूस नाही कि,ज्याने भ्रष्टाचार केला नाही.तर मग कोणाला मंत्री बनवू?सातारा, छत्रपती, शिवसेना,टिळा , कौटुंबिक वारसा असे सर्वच वितळून प्यालेली ही माणसे.शिंदेंनी सुद्धा गुलाबराव ला फक्त मंत्री नव्हे , जळगाव चा पालकमंत्री बनवला.म्हणे," ह्योच माणूस मंत्री पाहिजे." शिंदे वारंवार सांगतात कि, आम्ही हिंदुत्वासाठी ठाकरेंना सोडले.मुख्यमंत्री पदावरील माणसाने असे स्टेटमेंट देणे हेच असंविधानिक आहे.भगवा कपडा,लांबलचक टिळा,माळा,दाढी  हे हिंदुत्व नाही.हे तर हिंदुत्वाचे सोंग आहे.तुम्ही हिंदुत्वासाठी नाही सोडले तर चोरी करण्यासाठी सोडले.असे तर फक्त मी नाही, काशीचा ब्राह्मण ही सांगू लागला आहे.नागपूरचा ब्राह्मण मात्र चूप बसला आहे.म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी नागपूर च्या ब्राह्मण कडून राज्याभिषेक करून घेतला नाही.काशीचा ब्राह्मण बोलावून राज्याभिषेक करवून घेतला.

   मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी गुलाबराव ला मंत्री बनवणे, पालकमंत्री पदावर प्रमोशन देणे ,  मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन गुलाबराव च्या मंत्री पदाला विरोध करणे,तरीही जाणिवपूर्वक मंत्री बनवणे ही प्रक्रिया घडली.यावरून आम्ही निष्कर्ष काढतो कि, मुख्यमंत्री सुद्धा नियोजन बद्ध पद्धतीने भ्रष्टाचार करतात.हा असा भ्रष्टाचार फक्त जळगाव पोलीस स्टेशन, जळगाव कोर्ट, महाराष्ट्र विधानसभा , विधानपरिषद पर्यंत अडकून पडला होता.संजय राऊत यांनी आता चव्हाट्यावर आणला.जनमाणसात पसरवला.आता पोलीस,कोर्ट, विधानसभा यांच्याकडून न्यायाची अपेक्षा मावळली आहे.आता आम जनतेनेच  आपल्या मतपेटीतून न्याय दिला पाहिजे.ती आम जनता आम्ही आहोत.विधानमंडळ हेच चोरमंडळ बनले आहे,हे पुन्हा सिद्ध झालेले आहे.असे म्हणणाऱ्यावर हक्कभंग आणण्याची नैतिकता सुद्धा आता विधानसभेला उरलेली नाही.सत्ता आहे म्हणून कायद्याचा बडगा उगारू शकतात.पण जनता पायदळी तुडवल्याशिवाय राहाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here