तुळजापुरात मंगळवारी साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार वितरण आणि कविसंमेलनाचे आयोजन
प्रतिनिधी : तुळजापूर
मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर व स्व. साहेबराव हंगरगेकर फाऊंडेशन, तुळजापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा दुसरा ” स्व. आ. साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार २०२६ ” ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांना २० जानेवारी रोजी प्रदान करण्यात येत आहे.
तसेच राज्यातील मान्यवर कवींचे “महाराष्ट्राची हास्यधारा” हे कवीसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
तुळजापूरचे माजी आमदार तथा स्वातंत्र्यसैनिक साहेबराव हंगरगेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रु. २००००/- , मानपत्र, सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे.
अशोक नायगावकर यांनी प्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे.
महाराष्ट्रासह परदेशातही विविध ठिकाणी त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम पार पडले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रीत कवी म्हणून सहभाग, सिंगापूर येथील विश्व मराठी काव्य संमेलनात अध्यक्ष, झी मराठी या वाहिनीवरील हास्य सम्राट या मालिकेचे परिक्षक, २०१४ मध्ये झी टॉकीज तर्फे मराठीतील पहिला स्टँड अप् कॉमेडी पुरस्कार, मिश्किली व कविता या कार्यक्रमाचे त्यांनी देशभरात सादरीकरण केले आहे.
मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सायं. ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हॉटेल स्कायलँड पार्किंग, नवीन बसस्थानकाजवळ तुळजापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांची उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्राची हास्यधारा या निमंत्रित कवींच्या संमेलनात अशोक नायगावकर, प्रशांत मोरे, नारायण पुरी, अविनाश भारती यांचा सहभाग असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रविंद्र केसकर करणार आहेत.
या पुरस्कार समारंभ आणि कविसंमेलनाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूरचे अध्यक्ष अमर हंगरगेकर, कार्यवाह विजय देशमुख यांनी केले आहे.
